नवीन लेखन...

मराठी वाङ्मयातील ग्रामीण कादंबरी

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला वीणा सानेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 


महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा लाभलेली १९८८ साली प्रकाशित झालेली कृष्णराव भालेकरांची ‘बळीबा पाटील’ आणि १९९३ साली प्रसिद्ध झालेली धनुर्धारी यांची ‘पिराजी पाटील’ यांच्या उल्लेखाविना मराठीतील ग्रामीण कादंबरीचा आलेख पूर्ण होणार नाही. १९२० ते १९४० या कालखंडात गाधींजींच्या ‘खेड्याकडे चला’ या धारणेच्या आणि मार्क्सवादी जीवनसृष्टीच्या प्रभावातून ग्रामीण कादंबरीला नवी प्रेरणा मिळाली. १९४० च्या टप्प्यावर तिच्यावर स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचा प्रभाव पडला तसेच तिच्या अभिव्यक्तीला फडके प्रणीत लेखनतंत्राची रंजनवादी जोड मिळाली. १९५० ते १९६० च्या दशकात श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर आणि गो.नी. दांडेकर यांनी ग्रामीण कादंबरीला प्रादेशिकतेचे परिमाण दिले. हे परिमाण इतके गडद होते, की त्यामुळे ‘प्रादेशिक कादंबरी’ हे स्वतंत्र नामाभिधान मराठीत निर्माण झाले. कादंबरीतून साकारणारा प्रदेश हा कादंबरीतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचा अविभाज्य भाग बनणे हे प्रादेशिक कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य ठरले.

चि. त्र्यं खानोलकरांचे वेगळेपण असे, की खानोलकरांच्या कादंबऱ्यांनी या चौकटीपलीकडचे वेगळेपण शोधले. त्यांच्या कादंबऱ्यांमधून कोकणचा प्रदेश मुखर झालेला असला तरी मानवी मनाच्या तळघरातील भावभावनांच्या विकृतींचे चित्रण हे त्यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य ठरले. ‘रात्र काळी घागर काळी’ (१९६३), ‘अजगर’ (१९६५), “कोंडुरा’ (१९६६), ‘अगोचर’ (१९७५) इत्यादी खानोलकरांच्या कादंबऱ्या जीवनाचे विलक्षण शोकात्म दर्शन घडवतात.

साधारणतः १९६० नंतरच्या काळात एकूण भारतीय जीवनात अनेकविध स्वरूपाचे बदल होऊ लागले महानगरांचा अतिशय वेगाने विकास सुरू झाला. त्याचवेळी ग्रामीण जीवनात मात्र पडझड सुरू झाली. जुनी ग्रामव्यवस्था खिळखिळी होऊन अनेकविध प्रकारचे ताणतणाव जन्माला येऊ लागले. नव्या यंत्रयुगाने खेड्यापाड्यात प्रवेश केला. ग्रामजीवनातील ही वेगवेगळ्या स्तरावरची पडझड आणि स्थित्यंतरे अविष्कृत करणाऱ्या कादंबऱ्या या काळातल्या प्रारंभीच्या दशकात प्रकाशित झाल्या. उद्धव शेळके यांची ‘धग’ (१९६०), शंकर पाटील यांची ‘टारफुला’ (१९६४), रा. रं. बोराडे यांची ‘पाचोळा’ (१९७१), आणि आनंद यादवांची ‘गोतावळा’ (१९७१) या कादंबऱ्यांमधून , तडे गेलेल्या ग्रामजीवनातील माणसांच्या जगण्याचा चिवट संघर्ष उभा राहिला. १९६३ साली प्रकाशित झालेली मनोहर तल्हारांची ‘माणूस’ आणि १९६५ सालची हमीद दलवाईंची ‘इंधन’ या कादंबऱ्या माणसाच्या माणूसपणाला प्रश्न विचारणाऱ्या ग्रामीण कादंबरीच्या प्रवाहातील महत्त्वाच्या कादंबऱ्या ठरतात. सत्तर ते ऐंशीच्या दशकात गांधारी’ ना. धों. महानोर (१९७३),’शिदोरी’ – व. ह. पिटके (१९६९), ‘वावटळ’ – व्यंकटेश माडगूळकर (१९६४), ‘नटरंग’ आनंद यादव (१९८०),’रैन-‘ महादेव मोरे (१९७१) या ग्रामीण जीवनाची स्पंदने टिपणाऱ्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतरच्या एका खेड्याची कथा, ग्रामीण भागातील सत्तास्पर्धा, गांधीजींच्या मृत्युनंतर गावात उसळलेला विध्वंस, साखर कारखान्यातील कामगारांच्या व्यथा-वेदना, कलेसाठी नाच्याचे आयुष्य स्वीकारलेल्या एका कलावंताची परवड इत्यादी विषय या कादंबऱ्यांमधून समोर आले. महाराष्ट्रात राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या १९७५ नंतर काही महत्त्वाचे बदल घडले. १९७२ सालच्या दुष्काळाचे नैसर्गिक संकट हा महाराष्ट्रातील ग्रामजीवनावर झालेला फार मोठा आघात होता. २५ जून १९७५ रोजी सुरू झालेली राष्ट्रीय आणीबाणी तसेच केंद्रापासून पंचायत स्तरापर्यंत झिरपत गेलेली नियंत्रणे, उफाळलेला क्षोभ आणि भीती, १९७७ आणि १९८० साली बदलत गेलेली सत्तासमीकरणे या सर्वांचेच पडसाद ग्रामीण भागातही उमटले.

१९७२ च्या आसपास दलित पँथरचा जन्म झाला. याच सुमारास श्रमिक संघटना, कष्टकरी संघटना, श्रमिक मुक्ती संघटना इत्यादी शोषित वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संघटना पुढे आल्या. वसंत आबाजी डहाके यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील १९६० नंतरच्या अशांत आसमंताविषयी लिहिताना महाश्वेतादेवी यांच्या खालील वाक्याचा संदर्भ दिला आहे.

‘झाडाची मुळे जशी जमिनीत खोल गेलेली असतात तशीच साहित्याची मुळेदेखील जीवनात रुतलेली असली पाहिजेत. शेतकरी, मजूर, भूमिहीन मनुष्य यांचे जीवन आणि संघर्ष हा साहित्याचा विषयाअसण्याची गरज याच काळात प्रबळ झाली.’

१९८० नंतरच्या मराठी ग्रामीण कादंबरीच्या बाबतीत नागनाथ कोतापल्ले यांनी मांडलेले निरीक्षण महाश्वेतादेवींच्या वरील विधानांना पूरक ठरेल असेच आहे. ते म्हणतात, “एकंदरीत १९८० नंतर ग्रामीण जीवनातील संघर्ष अटीतटीच्या पातळीवर येऊन पोचलेले आहेत. त्यामुळे १९८० नंतरची मराठी ग्रामीण कादंबरी सामाजिक जीवनाचा अधिक गांभीर्याने वेध घेऊ लागलेली दिसते” नागनाथ कोतपिल्ले साहित्यचा अन्वयार्थ महल, पवित्र शिंग हाऊस, पुणे आ. १, १९९६ पृ, १५१

ग्रामीण भागात वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू झालेल्या परिवर्तनाचा वेग १९८० नंतर अधिकच वाढला. त्याबरोबरच तेथील प्रश्नांचे स्वरूपही बदलत गेले. या प्रश्नांचा शोध घेणाऱ्या कादंबऱ्या या काळात निर्माण झाल्या. ‘तणकट’ या राजन गवस यांच्या कादंबरीतून दलित-सवर्ण संघर्षाचे चित्रण आले तर विजय शिरसाट यांच्या ‘कुस्ती’ आणि ‘काळगर्भ’ या कादंबऱ्यांमधून दलितांमधला अंतर्गत संघर्ष उभा राहिला. विकासाची कामे उभी राहतात तेव्हा त्यामुळे विस्थापित झालेल्या माणासांच्या प्रश्नांची विदारकता ओधिकच भेदक होत जाते हे विश्वास पाटील यांच्या ‘झाडाझडती’ मधून व्यक्त झाले. त्यांच्याच ‘पांगिरा’ मधून आणि रा.रं. बोराडे यांच्या ‘चारापाणी’ मधून पाणी आणि चारा यांच्या तुटवड्यातून उभ्या राहणाऱ्या प्रश्नांची तीव्रता अधोरेखित झाली. शेतकऱ्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरलेल्या सहकारी चळवळीच्या पोटात लपलेल्या दुबळ्या जागांमुळे शेतकऱ्यांना किती दुःख सोसावे लागते? याचे चित्रण वासुदेव मुलाटे यांच्या ‘विष-वृक्षाच्या मुळ्या’ या कादंबरीतून दिसून येते. राजन गवस यांच्या ‘धिंगाणा’ या कादंबरीतून ग्रामीण भागातील राजकारणांच्या चरकात पिळल्या जाणाऱ्या युवापिढीचे चित्र उभे राहते. ग्रामीण भागातील साहित्य चळवळींची स्पंदने राजन गवस यांच्या ‘कळप’ आणि रंगनाथ पाठारे यांच्या ‘रथ’ मधून उमटली. सावकारी पेशात अडकत गेलेल्या एका शेतकरी कुटुंबाची परवड बाबाराव मुसळे यांच्या ‘हाल्या हाल्या दु दू दे’ या कादंबरीतून उभी राहते तर रवींद्र शोभणे यांच्या ‘कोंडी’ मधून आर्थिक शोषणामुळे होणारी गरीब शेतकऱ्यांची घुसमट व्यक्त होते. रा. रं. बोराडे यांच्या ‘झोंबी’, ‘नांगरणी’, आणि ‘घरभिंती’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील युवकाचा आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष साकार होतो. उत्तम बंडू तुपे यांच्या ‘चिपाड’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी देखील ग्रामीण तरुणाच्या वाताहतीचा विषय आला आहे. ऊसतोड कामगारांच्या दुःखाचे चित्रण करणाऱ्या ‘कोयता’ आणि ‘कुणाच्या खांद्यावर’ या अनुक्रमे सरदार जाधव आणि बा. ग. केसकर यांच्या कादंबऱ्या, विस्थापितांच्या व्यथांचे चित्रण करणारी त्र्यंबक असरडोहकरांची ‘काळी आई’ शहरीकरणामुळे खेड्यांतील सुपीक जमीन कशी नष्ट होत आहे याचे चित्रण करणारी मोहन पाटील यांची ‘बस्तान’, पंचायतराज येऊन सत्तेपासून वंचित राहिलेल्या सामान्य माणसाचे जीवन चित्रित करणारी मोहन पाटलांची ‘खांदेपालट’, खरेदी विक्रीच्या व्यवहारात नाडल्या जाणाऱ्या गरिबांची व्यथा व्यक्त करणारी आनंद पाटील यांची ‘कागद आणि सावली’ या कादंबऱ्यामधून बदलत चाललेल्या खेड्यांमधील सर्वसामान्य माणसांच्या जिण्याचा वेध घेतलेला दिसतो. तर भीमराव वाघचौरे यांनी ‘रानखळगी’ मधून शेतकऱ्यांच्या जीवनाशी अतूटपणे जोडल्या गेलेल्या दुष्काळाच्या प्रश्नाला स्पर्श केलेला दिसतो. शंकर सखाराम यांची ‘एसई.झेड’, जी ग्रामजीवनात आलेल्या एसईझेड च्या प्रश्नाला वाचा फोडते.

१९७० नंतरची ग्रामीण कांदबरी रूढ वास्तववादाच्या वाटेने जाताना दिसली तरी ती समाजातील स्थित्यतरांशी निकटचे नाते सांगते नि त्याचवेळी ग्रामीण साहित्याच्या चळवळीच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावते हे विसरता येत नाही. गेल्या दहा वर्षांत प्रकाशित झालेल्या सदानंद देशमुखांच्या ‘तहान’, ‘बारोमास’ राजन गवस यांची ‘तेणकट’, गणेश आवटेंची ‘भिरुड’ रमेश इंगळे उत्रादकरांची ‘निशाणी डावा अंगठा’, जी. के. ऐनापुरेंची ‘अभिसरण’, राजन खान यांची ‘जातवान आणि विनशन’ या कादंबऱ्या मराठीतील ग्रामीण कादंबरीची वाटचाल सूचित करतात.

— वीणा सानेकर

#Rural Novels in marathi Literature

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..