नवीन लेखन...

टेनिस चाहत्यांच्या मनात घर करणारी रशियन ब्यूटी मारिया शारापोव्हा

मारिया शारापोव्हाचा जन्म १९ एप्रिल १९८७ रोजी झाला.

वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने आजवर ९ ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती.२०१६ मध्ये रक्तात मेल्डोनियम या प्रतिबंधीत औषधाचे अंश मिळाल्याने २०१८ पर्यंत तिच्यावर कुठल्याही स्पर्धेत खेळण्याची बंदी आहे.

महिला टेनिसपटूंमध्ये सर्वाधिक ग्लॅमरस म्हणून मारिया शारापोवाचे नाव घ्यावे लागेल. परंतु केवळ सौंदर्यामध्येच समाधान मानणारी ती शोभेची बाहुली नाही. मारिया शारापोवाने तिच्या सौंदर्यावर कर्तृत्वाचा साज चढवलेला आहे. तिचे दुसरे फ्रेंच ओपन आणि पाचवे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद तिच्या कर्तृत्वाची साक्ष पटवते. शारापोवाने विम्बल्डन अजिंक्यपद पटकवून ग्रँड स्लॅमच्या वाटचालीला सुरुवात केली. त्यावेळी तिचे ते विजेतेपद ‘फ्लूक’ मानले गेले होते. पण ती खेळली आहे आणि सातत्याने जिंकलीही आहे, याचे श्रेय तिच्या इच्छाशक्तीबरोबरच स्टॅमिनालाही द्यावे लागेल. शारापोवाच्या काळात टेनिस गाजवणाऱ्या अनेक जणी एकतर निवृत्त झाल्यात किंवा अस्ताला निघाल्या आहेत. मुख्य म्हणजे महिला टेनिसमध्ये मोजक्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. अशा परिस्थितीत शारापोवासमोरील आव्हान अधिकच खडतर आहे. २००४ मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर मारिया शारापोवाने २००८ मध्ये अमेरिकन ओपन आणि २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्या. मग २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकून तिने विविध कोर्टवरील बहुपैलुत्व सिद्ध केले. सेरेना किंवा व्हीनसच्या तुलनेत तिने फार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या नाहीत. मात्र, मारिया शारापोवा केवळ एक प्रसिद्ध टेनिसपटू नाही. ती आता जगातील एक अव्वल सेलेब्रिटीही बनलेली आहे. कॅमे-यांचा झोत सतत तिच्यावर असताना तिने आपली टेनिस कारकीर्द केवळ सांभाळली आहे असे नव्हे, तर फुलवलीदेखील आहे. ताकदीपेक्षा तिच्या खेळाचा भर नजाकतीवर अधिक असतो. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी तिने पहिले ग्रँड स्लॅम अजिंक्यपद जिंकले तेही विम्बल्डनमध्ये. इतक्या लहान वयात पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर कारकीर्द आणि व्यक्तिमत्त्व भरकटण्याची शक्यता असते. शारापोवाने ते होऊ दिले नाही. दुर्दैवाने जानेवारी २०१६ मध्ये शारापोव्हाच्या रक्तात मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचे अंश आढळून आल्याचे मार्च २०१६ महिन्यात स्पष्ट झाले होते. शारापोव्हाने पत्रकार परिषदेत स्वतः या घटनेची कबुली दिली होती. जानेवारी २०१६ पासून वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी अर्थात वाडाने मेल्डोनियमवर बंदी घातली होती. मात्र त्याविषयी माहिती देणारा ईमेल आपल्याकडून वाचायचा राहून गेला असे स्पष्टीकरण शारापोव्हाने दिले होते. १८आणि १९ मे रोजी एका स्वतंत्र खंडपीठासमोर शारापोव्हाची सुनावणी झाली. शारापोव्हाने जाणूनबुजून मेल्डोनियमचे सेवन केले नसल्याचे आयटीएफने स्पष्ट केले आहे. मात्र नियमांचा भंग केल्यामुळे शारापोव्हावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली.

या कारवाईनंतर ती पुन्हा कोर्टवर उतरली पण दुखापतीमुळे ती खेळात सातत्य दाखवू शकली नाही. परिणामी क्रमवारीत तिची घसरण होत राहिली. मारिया शारापोव्हाने २६ फेब्रुवारी २०२० रोजी निवृतीची घोषणा केली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..