( रक्षाबंधनाच्या निमित्तानें : बालकाव्य )
रुसू नको गऽ ताई, फुगवुन् गाल तुझे तू नको बसू
फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।
नको रागवू ताई , होती गंमत ही खेळामधली
चिडले कोणी तर डावातिल मजा निघुन जाते सगळी
राग कधी नाकाच्या नकट्या शेंड्यावरती नये असू ।।
फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।
फुगवलेस तू गाल, तरी अंदाज मला आला इतका
केवळ आहे ढोंग सर्व हे, राग तुझा आहे लटका
आता ताई, खोटे खोटे डोळे अपुले नको पुसू ।।
फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।।
रुसव्याचा हा फोड फुगा, सांगतो जोडुनी हात तुला
नाहींतर अस्साच फुगा मग फुगवावा लागेल मला
खुद्कन ओठांमधुनी आता पहा निसटले कसे हसू ।।
फुगा फोडुनी रुसव्याचा हा ओठी आले गोड हसू ।।
– – –
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply