वर्ष १९५७… वाईजवळच्या धोम गावातून पुण्यात आलेला एक शाळकरी मुलगा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर रद्दी आणि काही जुनी पुस्तके घेऊन बसू लागला. त्यातूनच पंचवीस रूपये भाड्याने टपरी घेतली. पुढे जुन्या पुस्तकांच्या विक्रीबरोबरच नवी पुस्तकेही विकण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. होताहोता पहिले पुस्तक प्रकाशित केले आणि ही वाटचाल तब्बल पन्नास वर्षे करीत तो आज आघाडीचा पुस्तक प्रकाशक व पुस्तक विक्रेता बनला आहे.
‘उत्कर्ष प्रकाशन’च्या सुधाकर उर्फ सु. वा. जोशी यांची ही कहाणी. प्रकाशन जगतात “सु. वा” या नावाने प्रसिद्ध असलेल्या जोशी यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती, तसंच पुस्तकांवरील जिवापाड प्रेम याच्या जोरावर हा महाकाय पसारा उभारला. .
लक्ष्मी रस्त्यावरील हा संसार कालांतराने त्यानी डेक्कन परिसरात हलवला. त्यांची धडपड पाहून एका पुणेकराने त्यांना खोके भाड्याने दिले. पानशेतच्या पुरात मात्र त्याची दोन-तीन कपाटे भरलेली पुस्तके वाहून गेली. नंतर डेक्कन येथेच त्यांना कायमस्वरूपी जागा मिळाली.
१९७१ मध्ये पहिले पुस्तक प्रकाशित केले ते म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांचे “कोवळे दिवस”. पुस्तकांची त्यांची आवड पाहून त्यांच्याकडे कवयित्री शांता शेळके, गंगाधर गाडगीळ, रविंद्र पिगे वगैर साहित्यिक नियमितपणे येत असत. त्यांचीही काही पुस्तके जोशींनी प्रकाशित केली.
सुनील गावसकरचे ‘सनी डेज’, गंगाधर गाडगीळ यांचे ‘खडक आणि पाणी’, व्यंकटेश माडगूळकरांचे ‘ काळं आई’, वसंत पटवर्धनांचे ‘आर्य’ अशा अनेक गाजलेल्या पुस्तकाचा त्यात समावेश आहे.
आतापर्यंत त्यांनी तब्बल पंधराशे पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. सुमारे वीस लाख रुपयांची पुस्तके ते दरवर्षी विकतात.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply