(ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त..बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..)
‘साडेसाती’ म्हणजे काय? -भाग १ ला. (पूर्वार्ध)
काल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी त्या सर्वाना सांगितले. काही फोन मात्र लक्षणीय होते व त्यांना उत्तर देणं मला आवश्यक वाटलं म्हणून मी हा लेख लिहित आहे. फोनवरून विचारलेल्या या शंका बहुतेकांच्या मनात असतात म्हणून मी शंका निवारणाचा माझ्या कुवतीप्रमाणे व माहितीप्रमाणे प्रयत्न करतोय.
अनेकांनी मला साडेसाती म्हणजे नक्की काय अशी विचारणा केली. आणि हा प्रश्न आगदी रास्त आहे.
‘साडेसाती’ म्हणजे सरळ अर्थाने बघू गेल्यास एकूण साडेसात वर्षाचा कालावधी. ‘साडेसाती’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असल्यास प्रथम प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीतून होणारे भ्रमण म्हणजे काय हे ही समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात मी हे सोप्या भाषेत परंतू ढोबळमानाने समजावून द्यायचा प्रयत्न करेन.
सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवतीच्या भ्रमणाचा / फिरण्याचा एक ठराविक कालावधी असतो. हा कालावधी सूर्याभोवतीच्या ३६० अंशात (गोलाकार) मेष ते मीन अशा बारा राशीत विभागलेला आहे. सूर्याभोवती भ्रमण करताना हे सर्व ग्रह वर्षाला ह्या बारा राशीतून भ्रमण करतात अशी कल्पना केली आहे. प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती भ्रमण करण्याची कक्षा वेगवेगळी असल्याने आणि प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून ठराविक अंतरावर असल्याने, प्रत्येक ग्रहाचा प्रत्येक राशीतून सूर्याभोवती भ्रमण करण्याचा कालावधीही साहजिकच वेगवेगळा आहे. आपण राशी शिकलो नसलो तरी सुर्य/ग्रहमाला आपण पूर्वी कधीतरी शाळा-कॉलेजात शिकलो आहे त्यामुळे हे लक्षात येईल.
चंद्राचं भ्रमण –
चंद्र हा जरी पृथ्वीचा उपग्रह असला तरी चंद्राला ज्योतीषशास्त्राने ग्रह मानला आहे आणि भ्रमणाचा सर्वात कमी कालावधी चंद्राचा आहे. चंद्र स्वतःभोवती व पृथ्वीभोवती भ्रमण करत असतो हे सर्वांनाच माहित आहे. पृथ्वी जसजशी सूर्याभोवती भ्रमण करते तसा पृथ्वीसोबत चंद्रही सूर्याभोवती भ्रमण करतो हे ही आपल्याला समजू शकतं. अशा चंद्राचा एका राशीतून भ्रमणाचा कालावधी साधारणत: २.२५ (सवा दोन) दिवसांचा आहे.
चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्म राशी मानण्याची भारतीय ज्योतिषशास्त्राची परंपरा आहे. सर्वात जास्त वेगवान चंद्र असल्याने चंद्राला मनाची उपमा दिली आहे. मन जसं कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी पोहोचतं किंवा कोणताही विचार करतं अन मनाला भारती-ओहोटीही येते तसाच चंद्रही दर दोन-अडीच दिवसांनी आपले रूप आणि राशी बदलतो आणि म्हणून माणसाची राशी चंद्रावरून पाहण्याची आपली प्रथा आहे. चंद्र मनाप्रमाणे चंचल आहे. चंद्राला स्त्री व जलतत्वाचं मानलं जातं..
आपले सण चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतात म्हणून सणाचे दिवस मागेपुढे होतात. अधिक महिनाही चंद्रभ्रमणाचं फल आहे. साडेसातीचा आणि चंद्राचा जवळचा संबंध आहे म्हणून हे लक्षात ठेवावं..!
सूर्य भ्रमण –
सूर्य कुठेही भ्रमण करत नसला तरी आपल्याला सूर्य रोज उगवताना व मावळताना दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून पाहताना सूर्य भ्रमण करतो असे आपल्याला दिसते. सूर्य स्थिर असून प्रत्यक्षात पृथ्वी फिरत असते म्हणून आपण सूर्य बुडाला किंवा उगवला असे म्हणत असतो. ज्य्तोतीषशास्त्रात याला पृथ्वीभ्रमण न म्हणता सूर्य भ्रमण असे म्हणतात व सूर्याचा प्रत्येक राशीतून भ्रमणाचा कालावधी एक महिन्याचा असतो. एक वर्षात सूर्य सर्व १२ राशींचे भ्रमण पूर्ण करतो असे मानले जाते. मकर संक्रांति हे याचे उत्तम उदाहरण. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांत न चुकता येते. आपल्या इतर सणाप्रमाणे ही तारीख मागे-पुढे होत नाही कारण मकर संक्रांति म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि तो दर वर्षी न चुकता त्याच दिवशी होतो. दरवर्षीच्या १४ जानेवारीपर्यंत सूर्य सर्व राशी फिरून मकर राशीत प्रवेश करतो. मतर राशीत सूर्याने केलेले संक्रमण म्हणून मकर संक्रांत..
ज्योतिष शास्त्रात सूर्य व चंद्र हे दोन महत्वाचे घटक असल्याने वर शक्य तेवढं विस्ताराने लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. शनि हा साडेसातीशी संबंधीत असल्याने त्याच्याबद्दल पुढील भागात विस्ताराने लिहीन. बाकी इतर ग्रहांचा राशी भ्रमणाचा वार्षीक कालावधी थोडक्यात देत आहे.
बुध ८८ दिवसांत यर्व १२ राशीतून भ्रमण करतो म्हणजे एका राशीत बुध साधारणत: ७-८ दिवस असतो. ग्रहांच्या भ्रमणाची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने हा कालावधी जास्तीत जास्त १७-१८ दिवसाचा होतो. हा कालावधी चंद्राखालोखाल बुध वेगवान असल्याने चंचल वृत्तीचा मानला गेला आहे, तो त्याच्या या एका राशीत कमी दिवस राहाण्याच्या सवयीमुळे.
शुक्र २२५ दिवसांत सुर्य प्रदक्षिणा म्हणजे १२ राशीतून भ्रमण पूर्ण करतो. म्हणजे शुक्र एका राशीत सामान्यत: १८ ते जास्तीत जास्त २४-२५ दिवस असतो.
मंगळ सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: ६८७ दिवस घेतो. १२ राशींना ६८७ दिवस म्हणजे एका राशीत कमीत कमी साधारणत: ४५ दिवस ते जास्तीत जास्त ५७-५८ दिवस म्हणजे ढोबळ मानाने दोन महीने मुक्कामाला असतो.
तर गुरू सुर्य एका प्रदक्षिणेला १२ वर्षाचा कालावधी घेतो. याचा अर्थ गुरू एका राशीत एक वर्षभर असतो.
गुरूनंतर येतात शनीनहाराज, जे एका सूर्य प्रदक्षिणेला अदमासे २९-३० वर्ष घेतात. सूर्याभोवतालच्या १२ राशीतून भ्रमण करण्यासाठी ३० वर्ष तर एका राशीत मुक्राम २.५ वर्ष होतो.
गुरूपर्यंतचे हवेहवेसे वाटणारे ग्रह फार तर वर्षभरात मुक्काम हलवतात आणि नको असलेला शनीसारखा पाहूणा मात्र २.५ वर्ष राहातो. नुसती २.५ वर्ष असती तरी आपण ढकलली असती परंतू तो ७.५ वर्ष पिडणार या ‘समजूतीने’च आपण खलास होतो. ही ७.५ वर्षांची भानगड काय आहे हे पुढील भागात समजावतो. ते नीट कळावं यासाठी हा लेखनप्रपंच..!
हर्षल, नेपच्यून प्लुटो हे एका राशीत अनुक्रमे ७, १६ व २४ वर्ष राहातात पण आपल्याला या ग्रहांचा साडेसाती या विषयात अभ्यास करण्याची आवश्यकता नाही.
-नितीन साळुंखे
9321811091
www.astroganesh.in
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply