आठ श्लोकांचे हे ‘त्रिपुरसुंदरी अष्टकम्’ (षोडशी त्रिपुरसुन्दरी अष्टकम्) स्तोत्र आदि शंकराचार्यांनी पृथ्वी वृत्तात (ज स ज स य ल गा) रचले आहे.
त्रिपुरसुंदरी म्हणजे सर्वोत्कृष्ट सौंदर्य. तिन्ही लोकात सुंदर. तथापि त्रिपुर याचा अर्थ विविध अभ्यासकांनी अनेक प्रकारे अर्थ लावलेला दिसतो. त्रिपुर म्हणजे त्रिगुणात्मक शिव आणि त्याची अर्धांगिनी ती त्रिपुरसुंदरी. कालिका पुराणात शिवाचे शरीर तीन भागात कल्पून त्याला त्रिपुर असे संबोधले आहे. काही अभ्यासकांनी त्रिपुर चा संदर्भ तीन नाड्या (सुषुम्ना,पिंगला आणि इडा) तसेच देवी मंत्रातील तीन अक्षरांशीही लावला आहे. त्रिपुरसुंदरी हे कालीचे रक्तवर्ण रूप आहे. त्रिपुरसुंदरी ही संपत्ती, ऐश्वर्य, भोग आणि मोक्ष यांची प्रमुख देवता आहे. दशमहाविद्यां (महात्रिपुरसुन्दरी, षोडशी,ललिता,लीलावती,लीलामती,ललिताम्बिका,लीलेशी,लीलेश्वरी,ललितागौरी व राजराजेश्वरी) मध्ये काही मोक्षदानात तर काही भोगदानात अधिक परिणामकारक आहेत, पण त्रिपुरसुंदरी दोन्ही समानतेने प्रदान करते.
कदम्बवनचारिणीं मुनिकदम्बकादम्बिनीं
नितम्बजितभूधरां सुरनितम्बिनीसेविताम् ।
नवाम्बुरुहलोचनां अभिनवाम्बुदश्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ १॥
मराठी- जी कदंब वृक्षांच्या राईमधून विहार करते, जी मुनींच्या समूहासाठी (ज्ञानाचा) वर्षाव करणारी मेघमाला आहे, जिच्या नितंबांच्या गोलाईने पर्वतांना हरविले आहे, देवांच्या स्त्रिया जिची सेवा करतात, जिचे डोळे टवटवीत कमळांप्रमाणे आहेत, जी नवीनच तयार झालेल्या (सजल) मेघांप्रमाणे सावळी आहे, जी त्रिनेत्र शंकराची सहचारिणी आहे अशा त्रिपुरसुंदरीच्या ठायी मी आसरा घेतो.
टीप- येथे आचार्यांनी संपूर्ण विश्वामध्ये त्रिपुरसुंदरीचा विहार असतो या अर्थाने कदंब राई, तसेच मुनीजनांसाठी मेघमाला म्हणजे मुनीजनांवर ज्ञानाचा वर्षाव करणारी असा प्रयोग केला आहे.
कदंब वनि हिंडते, घन मुनी जना सिंचना
नितंब हरवी नगां, नत सुरस्त्रिया पूजना ।
नवीन कमला परी नयन, मेघश्यामा जरी
शिवा सहचरी, पदे त्रिपुर सुंदरीची बरी ॥ १
कदम्बवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं
महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणीम् ।
दयाविभवकारिणीं विशदलोचनीं चारिणीं
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ २॥
मराठी- जी कदंब वृक्षांच्या राईमध्ये निवास करते, जिच्या हाती सुवर्ण वीणा आहे, जिने अत्यंत मौल्यवान रत्नांची माळ घातली आहे, जिचे वदन अत्यंत तेजाने झळाळत आहे, (शरणागतांवर) करुणा करून त्यांना ऐश्वर्य प्रदान करणारी, जिचे डोळे शांत व तेजस्वी आहेत, जी सतत भ्रमण करते, जी त्रिनेत्र शंकराची सहचारिणी आहे अशा त्रिपुरसुंदरीच्या ठायी मी आसरा घेतो.
कदंब वनि राहते, कनक बीन हाती, सरी
अमूल्य मणी, नेत्र शांत वदनी झळाळी खरी ।
करी कणव, वारूणी, विभव दान दासावरी
शिवा सहचरी, पदे त्रिपुर सुंदरीची बरी ॥ २
टीप- दुस-या ओळीतील ‘वारुणी’ चे, पार्वती व अमृत असे दोन अर्थ अभ्यासकांनी घेतले आहेत. सर्वसामान्यांना माहीत असलेला मद्याशी संबंधित अर्थ येथे लागू होत नाही हे उघडच आहे.
कदम्बवनशालया कुचमरोल्लसन्मालया
कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया ।
मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया
कयाऽपि घननीलया कवचिता वयं लीलया ॥ ३॥
मराठी- जी कदंबवृक्षांच्या वनात (या विश्वात) राहते, जिच्या वक्षस्थळावर माळा रुळत आहेत, जिचे वक्ष पर्वतांसमान (भव्य) आहेत, जिच्या महान दयेचा प्रवाह खळाळत असतो, जिचे गाल (वारुणीप्राशनाने) वारुणीसारखे लाल झाले आहेत, जिचे गाणे गुणगुणणे मंजुळ कर्णमधुर आहे, अशा कोणा मेघश्याम लीलेमुळे आम्हाला सुरक्षिततेचे कवच लाभते.
टीप- येथे ‘गुरुकृपा’ चा अर्थ काही अभ्यासकांनी गुरु-शिष्य परंपरेतील गुरुकृपा असा लावला आहे, तर काहींनी ‘गुरू; चा अर्थ महान,थोर असा घेऊन देवीची महान कृपा असे म्हटले आहे.
कदंब वनि कार्य, हार रुळतो सुवक्षावरी
नगा सम स्तनी महान करुणा खळाळे खरी।
पिऊन मधु गाल लाल, उमटे स्वरी माधुरी
अम्हास घननीळ खेळ कवचास दे सत्वरी ॥ ३
कदम्बवनमध्यगां कनकमण्डलोपस्थितां
षडम्बुरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम् ।
विडम्बितजपारुचिं विकचचन्द्रचूडामणिं
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ ४॥
मराठी- जी कदंब वनाच्या अंतर्भागात जाते, जी सुवर्णाच्या गोल आसनावर विराजमान आहे, जी नित्य सिद्ध जनांसाठी (प्रकाश देणारी लखलखती ) वीज आहे, (लालबुंद) जास्वंदीच्या फुलाची जी चेष्टा करते, जिने केशरचनेवर चंद्र धारण केला आहे, जी त्रिनेत्र शंकराची सहचारिणी आहे अशा त्रिपुरसुंदरीच्या ठायी मी आसरा घेतो.
कदंब वन अंतरी, कनक गोल पीठा वरी
मुनीस नित चंचला, स्थित सहा सरोजी बरी !
टवाळ कुसुमा जपा, कुमुदकांत केसांवरी
शिवा सहचरी, पदे त्रिपुर सुंदरीची बरी || ४
कुचाञ्चितविपञ्चिकां कुटिलकुन्तलालंकृतां
कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् ।
मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं
मतङ्गमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥ ५॥
मराठी- आपल्या वक्षस्थळाजवळ जिने वीणा धरली आहे, कुरळ्या केसांचा बटांनी जिच्या चेहेर्या ची शोभा वाढली आहे, जी कमळामध्ये राहते, दुष्ट प्रवृत्तीचा जिला राग येतो, जिचे डोळे मधु पिण्यामुळे लालसर झाले आहेत, जी मदनाचा शत्रू शंकराला मोहित करते, अशा गोड भाषण करणाऱ्या, मतंग ऋषींच्या मुलीच्या चरणी मी आसरा घेतो.
खट्याळ कच दागिनेच, ह्रदयी सुवीणा धरी
निवास कमळात, राग खल मानसाचा करी |
सुनेत्र मद जेवि लाल, हर संयमा जी हरी
मधाळ वचने, मतंग मुलिच्या पदा मी धरी || ५
स्मर प्रथम पुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलाम्बरां
गृहीतमधुपात्रिकां मदविढणर्नेत्राञ्चलाम् ।
घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ ६॥
मराठी- जी रक्तासारख्या लाल ठिपक्यांचे निळे वस्त्र नेसली आहे, जिने मदनाचे (नाग केशराचे) पहिले फूल घातले आहे, जिष्या हातात मधु भरलेला पेला आहे, मधु प्राशनाने जिच्या डोळ्यांच्या कडा अस्थिर झाल्या आहेत, जिचे स्तन भरीव आणि उन्नत आहेत, जिची (फुलांची)वेणी गळून पडली आहे, जी सावळी आहे, जी त्रिनेत्र शंकराची सहचारिणी आहे अशा त्रिपुरसुंदरीच्या ठायी मी आसरा घेतो.
निळे वसन लाल बिंदु, सुमना स्मराच्या धरी
न नेत्र मधु सेवने स्थिर, मधूर प्याला करी |
उभार स्तन उंच, माळ गळली जिची भूवरी
शिवा सहचरी, पदे त्रिपुर सुंदरीची बरी ॥ ६
टीप- येथे ‘स्मर-प्रथम-पुष्पिणीं’ चा अर्थ लावण्यात अभ्यासकांत थोडी मतभिन्नता दिसते. काहींनी त्याचा अर्थ देवी ‘कामदेवाचे पहिले फूल’ आहे असा केला आहे. ‘स्मर-पुष्प’ याचा अर्थ मदन(Vangueria Spinosa- मराठी नाव अळू किंवा हेळू, संस्कृत नाव नागकेशर) पुष्प असाही करता येईल. तर काहींनी ‘स्मरेत् प्रथम पुष्पिणीम्’ असा पाठभेद घेऊन ‘त्रिभुवन स्वरूप लतेवर आलेले पहिले फूल’ असे देवीचे वर्णन केले आहे. तसेच ‘रुधिरबिन्दुनील-अंबर’ याचा अर्थ ‘अशुद्ध निळसर रक्ताच्या रंगाचे वस्त्र’ असा केलेला दिसतो !
सकुङ्कुमविलेपनां अलकचुम्बिकस्तूरिकां
समन्दहसितेक्षणां सशरचापपाशाङ्कुशाम् ।
अशेषजनमोहिनीं अरुणमाल्यभूषाम्बरां
जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकां ॥ ७॥
मराठी- जिने अंगावर केशराची उटी लावली आहे, जिच्या केशकलापाला कस्तुरीचा सुगंध येतो, जिच्या डोळ्यातून मंद हास्य ओसंडत आहे, जिने बाण,धनुष्य, फास, अंकुश धारण केले आहेत, जी सर्व जनांना आकर्षित करते, जिने लाल रंगाच्या माळा, दागिने व वस्त्रे परिधान केली आहेत, जी जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तेजस्वी आहे, अशा अंबिकेचे मी जप विधीचे वेळी स्मरण करतो.
उटी तनुस केशरी, दरवळे कचा कस्तुरी
सुहास्य नयनी, धनुष्य शर आर दोरी करी | (आर- अंकुश,पराणी)
करी वश जगा, फुले वसन लाल भूषा बरी
जपेसम प्रभा, जिची जपविधीत अंबे स्मरी ॥ ७
टीप- हा श्लोक भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचा ‘ललिता सहस्रनाम’ तसेच ‘ललिता त्रिशती’ या स्तोत्रांच्या ध्यान श्लोकांतही समावेश आहे.
पुरन्दरपुरंध्रिकां चिकुरबन्धसैरंध्रिकां
पितामहपतिव्रतां पटपटीरचर्चारताम् ।
मुकुन्दरमणीमणीं लसदलङ्क्रियाकारिणीं
भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् ॥ ८॥
मराठी- इंद्राची पत्नी जिची वेणी गुंफणारी सेविका आहे, जिला कौशल्यपूर्ण रीतीने ब्रह्मदेवाची पत्नी चंदनाची उटी लावण्यात मग्न होते, जिला श्रीविष्णूची पत्नी रत्नांनी चमकत्या दागिन्यांनी मढवते, जिची स्वर्गातील स्त्रिया सेवा करतात, अशा त्या जगन्मातेची मी आराधना करतो.
सुरेंद्र सखि सेविका बनुनिया कचा सावरी
विरंचिरमणी रमे सजविता उटी केशरी |
हिरे जडित दागिने चढविते रमा त्यावरी
जिची बटिक देवता समुह, अर्चना मी करी || ८
। इति त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् संपूर्ण ।
***************************
धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
छान माहिती दिली
साक्षात त्रिपुरसुंदरी आम्हाला दिसली!
श्री शंकराची सहचारिणी त्रिपुरसुंदरी माताचे विविध अंगी अर्थपूर्ण दर्शन घडले छान अर्थ