सातत्य नेमके कशात हवे
रोज कशाच्या आहारी जावे
सातत्याने सेवन करावे
सुविचारांचे!
कठीण ते योग्य वागणे
सोप्पे ते व्यसन करणे
मग दुष्परिणाम भोगणे
सातत्याने !
अर्थ–
सातत्य नेमके कशात हवे, रोज कशाच्या आहारी जावे, सातत्याने सेवन करावे, सुविचारांचे!
(आजकाल इंटरनेट चा जमाना असल्यामुळे सातत्य हे व्यायाम, प्रत्यक्ष गप्पा, मैदानी खेळ या पेक्षा वेब सिरीज, पब जी सारखे बसून लढायचे खेळ, फेबु वरच्या वैचारिक गप्पा आणि टीका टोचणी यात जास्त आले आहे. पूर्वी जी तरुण पिढी सुट्टीचा दिवस पुस्तनकांमध्ये सातत्याने घालवायची आजची तीच तरुण पिढी सुटीचा दिवस नाक्यावर व्यसनं करण्यात घालवतात आणि ह्यात सातत्य टिकून असतं.)
कठीण ते योग्य वागणे, सोप्पे ते व्यसन करणे, मग दुष्परिणाम भोगणे, सातत्याने!
(आजकाल फास्ट लाईफ झाल्यामुळे सर्वांकडे शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही, काही प्रमाणात गार हवेत जाऊन उठाबशा काढण्यात लोकं धन्यता मानतात पण त्याच्या जोडीला अपेयपान, अभक्ष्य भक्षण, गल्ली गल्लीतील धुरांडी यांचा विपरीत परिणाम होऊन त्या तात्पुरत्या व्यायामाचा काही उपयोग होत नाही. समर्थ म्हणतात की उत्तम साधक होण्यासाठी तुमच्या आयुष्यात साधनेचं सातत्य हे हवंच, त्याशिवाय तुम्हाला तुमच्या शरीरावर, मनावर अधिराज्य गाजवणे जमणार नाही. तुम्ही जे काम करत असाल त्यात सातत्य राखणे गरजेचे आहे. व्यायाम सुरू करून जर काही दिवसात अंग दुखी मुळे तो सोडून दिला तर पुढे मिळणारे फायदे कसे मिळणार. योग्य आहार घ्यावा म्हणून बाहेरचे खाणे सोडले पण कधीतरी खायचे म्हणून बकसुरा सारखे खायचे त्याला काही अर्थ नाही. समर्थ म्हणतात की तोंडाच्या दोन्ही कर्मावर जर नियंत्रण राखता आले तर तुमच आयुष्य दीर्घायुषी झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यातही सातत्य हवे केवळ कधीतरी मनातली घाण वाट्टेल तशी इतरांवर गाळून मग मौन धारण करण्याला काय अर्थ? समर्थांच्या जगण्यातले सुकर्मांचे सातत्य त्यांना एका थोर शक्तीरूपाकडे घेऊन गेलं. आपण निदान आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करण्यात सातत्य राखले तर निदान चांगला माणूस म्हणून तरी नक्की आणि अभिमानाने जगू यात शंका नाही.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply