अग रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि आता तू घरी येतेस. वाटेत गाडीचा प्रॉब्लेम झाला होता म्हणुन उशीर झाला. मग फोन करून सांगितले असते तर.. अग आज्जी मी आता लहान नाही. मनात म्हटलं म्हणूनच काळजी वाटते. अरे नऊ वाजेपर्यंत कसे काय खेळता दिवे लागले की घरी यायचे. आज्जी उलट याचवेळी मस्त वाटत खेळायला.
इति नातू कुणीही आडवत नाहीत म्हणून. आज्जीला काही समजत नाही असाच समज आहे. त्यामुळे गप्प बसणे भाग आहे. खरच हे सगळे आमच्या पिढीला समजतच नाही. मुलाला व सुनेला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. म्हणून मोठय़ा अभिमानाने कौतुकाने पहिल्यांदा मुलांच्या कडे गेल्यावर सुनेने गोड गोड भाषेत समज दिली होती ती ही आई तुम्ही गावी असतांना गोष्ट वेगळी होती पण आता इथे या सोसायटीत कुणालाही बोलायला जाऊ नका. आणि कुणालाही घरी बोलावून घेऊ नका. घरातील गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. सगळे छान आहे असे म्हणत जा आणि हो मावशीबाई कडे दुर्लक्ष केले तर जास्त चांगले होईल. बरोबर आहे ना मी काय थोडीच इथे राहणार आहे. आणि एकदा तर.. बाबा इथे रिक्षेवाल्यांशी घासाघीस करु नका. जेवढे सांगितले तेवढे पैसे देऊन टाका. अरे पण… बायकोने खूण केली तसे ते गप्प बसले..
योगायोगाने आता गाव सोडून मुलाकडे राहणे आले. आणि बऱ्याच गोष्टी समजल्या पण काही बोलता येत नाही आणि बघवत नाही म्हणून कधी तरी असे न राहवता बोलले जाते आणि गोड भाषेतील लेक्चर ऐकून घ्यावे लागते. हे सगळे काय आम्हाला समजत नाही का. पण आम्ही कुठे उच्च शिक्षण घेऊन नोकरी केली आहे? कुणाला घरातील गोष्टी सांगाव्यात.
कुणा कडे दुर्लक्ष करायचे. घासाघीस कुठे करायची. हे सगळे आम्हाला पण समजते. आमच्या काळी तर बाहेर जायचे नव्हतेच पण आम्ही मात्र मुलांना सातच्या आत घरात अशी समज दिली होती. आणि तसेही खरेच आहे की आम्ही नवऱ्याने जे कमावून आणले ते जपून समजून घेऊन आहे त्यात आनंद व समाधान मानून राहिलो. नाती टिकवून ठेवली. घरातील भांड्याचा आवाज बाहेर जाऊ दिला नाही. आणि आता मुली सुशिक्षित. आधुनिक विचारणीच्या. आर्थिक स्वातंत्र्य असलेल्या आहेत. म्हणून बाकी सर्व शिकलो पण खोटे खोटे वागणे बोलणे. गोड शब्दात समज देणे आणि बऱ्याच काही गोष्टी शिकलो नाही म्हणून म्हटलं सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी सच है दुनिया वालो हम है अनाडी. बरोबर आहे ना हे गाणे? गप्प बसून राहणे हे सुद्धा एक हुशार पणच आहे. मला वाटते की तुम्हालाही जमले आहे..
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply