नुकताच आपण सर्वांनी गणपती उत्सव मोठया आनंदात साजरा केला. दरवर्षी पेक्षा ध्वनी प्रदूषण कमी झाले असे म्हणावयास लागेल. मुंबईतील सर्व श्रीगणेशउत्सव मंडळांचे अभिनंदन. परंतू खेदाने म्हणावयास लागेल की पुनार्मिलापाच्या वेळी निघालेल्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण जरा जास्त होते कदाचित बेंजोमुळे असेल. पुढच्यावर्षी यात नक्कीच सुधारणा होईल अशी आशा आहे. असो.
आज अश्विन प्रतिपदा, आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल आणि अगदी थेट दिवाळी पर्यंत आपण सण साजरे करणार आहोत पण ते करताना आपल्यालाकडून वायू आणि ध्वनी प्रदूषण कसे होणार नाही किंवा कमीतकमी होईल याची काळजी घ्यायला पाहिजे.
रूढी, प्रथा आणि परंपरेने साजरे केले जाणारे उत्सव आणि सण आपण दरवर्षी आनंदाने साजरे करत आलो. परंतू मध्यंतरीची चार-पाच दशकं उत्सवांचे रंग बदलतांना दिसले. याला स्पर्धा, प्रतिष्ठा, अर्थ यांच्या बेरजा, वजाबाक्या, भागाकार आणि गुणाकारांचे गणित बिघडवताना कुठेतरी जाणवले. यात सामाजिक आणि राजकीय चढ-उतारांचाही बराच प्रभाव जाणवतो.
आजपासून मुंबईत दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक नवरात्री उत्सवाला प्रारंभ होईल. सार्वजनीक उत्सव नागरिकांत एकोपा आणि देशभक्तीची भावना दृढ करण्याच्या हेतूने सुरु झाला. परंतू काही वेळा अनावधानाने वाजंत्रीवाद्याच्या (उदा.बेंजो, कच्छिबाजाच्या) कर्णकर्कश आवाजाने ध्वनी आणि फटक्याने ध्वनी-वायू प्रदूषण होताना आपणा बघतो.
सध्या देशाच्या सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्याची जाणीव सर्वच नागरिकांना आहे आणि त्याचे उत्तर परवाच आपल्या शूर सैनिकांनी दिले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! परंतू अश्या सार्वजनिक उत्सवात जमलेल्या गर्दीचा आणि अफवांचा फायदा काही देशविघातक शक्ति आपला इप्सित हेतू साध्य करण्याचा प्रयत्नात असतात. तरी उत्सव साजरा करताना आपण जागृक राहणे गरजेचे आहे. तसेच काही अक्षेपाहार्य निदर्शनास आल्यास संबधित खात्यांना त्याची सूचना देणे आपले कर्तव्य आहे.
सण आणि ऊत्सव प्रथा व परंपरेनुसार साजरे करायलाच पाहिजेत यात वाद नाही, पण ते साजरे करताना त्याचा ध्वनी आणि वायू प्रदुषणाचा परीणाम आपल्या परिसरातील वरीष्ठ नागरीक, आजारी माणसे, तान्ही मुले यांना होणार नाही याचीही काळजी आपणच घ्यायला पाहिजे ना? बघा पटतय का? अमूक एका वयात खरोखरच कर्णकर्कश आवाज नाही सहन होत कारण सहनशिलता नैसर्गिकरीत्या कमी झालेली असते.
उत्सवादरम्यान वरील गोष्टिंचे भान ठेवताना आपण कुठेतरी कमी पडताना दिसतो याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तरी ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वच नागरिक आणि सार्वजनिक मंडळे यावर्षी नक्कीच सकारात्मक भूमिका बजावतील अशी आशा आहे. जय जगदंब जय दुर्गे !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply