दूरदर्शन सुरु झाल्यानंतर घराघरांत ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही आले. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रसारण चोवीस तास नव्हते. ठराविक वेळी ‘सह्याद्री’ मुंबईवरुन मराठी व दिल्लीवरुन राष्ट्रीय कार्यक्रम दाखवले जायचे.
अगदीं सुरुवातीला सरकारी जाहिराती असायच्या त्यानंतर कमर्शियल जाहिराती सुरु झाल्या. त्यासुद्धा प्रमाणात असायच्या. आजच्यासारखा त्यांचा भडीमार नसायचा. ‘वाॅशिंग पावडर निरमा’ची जाहिरात खूप वर्षं पाहिलेली आहे, त्यामुळे ती तोंडपाठ झाली होती.
‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही राष्ट्रीय एकात्मतेवरची सरकारी जाहिरात तर अप्रतिमच होती, अनेकदा पाहूनही तिची गोडी कधीही कमी झाली नाही. तशीघ शिक्षणावरील ‘पूरब हे सूरज उगा, फैला उजियारा..’ या जाहिरातीमध्ये एक ज्येष्ठ गृहस्थ सकाळी फिरायला जाताना झोपडीत रहाणाऱ्या मुलाला पाटीवर अक्षर काढून दाखवतो असं दाखवलं होतं.
त्यावेळी मालिका मोजक्याच होत्या. आशयपूर्ण होत्या. त्यामध्ये सारखा जाहिरातींचा ब्रेक नव्हता. ‘कुर्रम, कुर्रम’ ही ‘लिज्जत’ पापडची जाहिरात मजेशीर होती. सुटींग-शर्टींग कंपन्यांच्या जाहिराती असायच्या. ‘जो अपनी बीवी से करते है प्यार, वो ‘प्रेस्टीज’ से कैसे करें इन्कार’ ही प्रेशर कुकरची जाहिरात गाजलेली होती. त्यावेळी वाॅशिंग पावडर ही ‘सर्फ’च होती. त्या जाहिरातीत ‘उडान’ मालिकेत काम करणारी कविता चौधरी ही माॅडेल होती. सौंदर्य साबण ‘लक्स’ने तमाम हिंदी सिने तारकांचा ठेकाच घेतलेला आहे. त्यावेळच्या हेमामालिनी पासून आजच्या करिना पर्यंत सर्व तारकांनी टबमध्ये बसून आपल्या सौंदर्याचं ‘रहस्य’ लक्स साबणच आहे, हे तोंडाला फेस येईपर्यंत सांगत आलेल्या आहेत. ‘कैलास जीवन’ची देखील जाहिरात त्यावेळी कार्टून मध्ये होती. औषधांच्या दुकानात एक माणूस वेगवेगळी अनेक औषधं दुकानदाराला मागतो, दुसरी स्त्री त्याने सांगितलेल्या सर्व व्याधींवरती एकच औषध ‘कैलास जीवन’ मागते. विको टर्मरिक क्रिम या स्वदेशी कंपनीची जाहिरात जी थिएटरमध्ये पहायला मिळायची तीच टीव्हीवर लागत असे. त्यामध्ये आई आपल्या मुलीला लग्नात हळद लावते असं दाखवलं होतं. आई होती सिनेअभिनेत्री उमा भेंडे व मुलगी होती मृणाल कुलकर्णी. अशा अनेक ब्लॅक अँड व्हाईट जाहिराती मनात घर करून बसलेल्या आहेत.
तंत्रज्ञान प्रगत झाल्यावर भारतात रंगीत टीव्ही आला. त्यावेळी मोठ्या आकाराचे डब्बा टीव्ही होते. चित्र जरी रंगीत दिसत असले तरी स्किनवर सूक्ष्म आडव्या लाईन्स या दिसायच्याच. रंगीत प्रक्षेपणामुळे टीव्ही वरील जाहिराती वाढल्या. ‘निरमा’ची जाहिरात तर त्याच जिंगलसह नव्या आकर्षक स्वरुपात पहायला मिळाली.
एकवीसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच डिजीटल तंत्रज्ञान आले. मोठ्या आकाराचे डिजीटल टीव्ही बाजारात आले. भरमसाठ चॅनेल चोवीस तास पहायला मिळू लागली. प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेत मालिका निर्मिती होऊ लागली. साहजिकच उत्पादकांनी जाहिरातींचा पाऊस पाडायला सुरुवात केली.
आता मालिका वीस मिनिटांची व जाहिराती दहा मिनिटांच्या असं समीकरण झालंय. चित्रपटाच्या ब्रेकमध्ये सलग पाच पाच मिनिटे जाहिराती असतात. त्या पाच मिनिटांत एकाच वेफर्सची जाहिरात चार वेळा पहावी लागते. शेवटी त्या जाहिरातीचा उबग येतो आणि आपण साहजिकच दुसऱ्या चॅनेलवर जातो.
अमिताभ बच्चनने एक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली आहे हे सर्वांना माहीत आहेच. आता तो शेकडो जाहिरातींतून समोर येतो. पोलिओ डोसच्या जाहिरातीपासून कोरोनाच्या उपदेशापर्यंत तोच सर्वांच्या पुढे आहे. आजपर्यंत त्याने सर्वाधिक केलेल्या जाहिराती बद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये जायलाच हवे.
पंचवीस वर्षांपूर्वी व्हीआयपी बॅग कंपनीची टीव्ही वर जाहिरात लागत असे. एक भारतीय सैनिक सुट्टीवर घरी येतो. त्यांची पत्नी त्याचं स्वागत करते. त्याचा मुलगा त्याला सॅल्युट करतो. सुट्टी संपल्यावर तो पुन्हा निघतो. या जाहिरातीत पत्नीचं काम केलेली तरुणी होती आजची आघाडीची हिंदी सिने अभिनेत्री विद्या बालन! जाहिरातीत काम करुन नावारूपाला आलेले अनेक कलाकार आज यशाच्या शिखरावर आहेत.
सध्याच्या टीव्हीवरील काही जाहिराती पहाताना ती करणाऱ्यांच्या बुद्धीमतेची कींव करावीशी वाटते. सायकलच्या चेनमध्ये अडकलेली दहा रुपयांची नोट काढताना त्या मुलाचा गणवेश खराब होतो, मात्र नोट करकरीतच राहते. डेटाॅल साबणाचे महत्त्व सांगण्यासाठी मुलांना चिखलात लोळावं लागते. संतूर साबण हा फक्त ‘मम्मीऽ’ साठीच राखीव आहे. ‘डॅडीऽ’ म्हटलं तर कदाचित त्याचा फेस होणार नाही !
काही जाहिराती अप्रतिमच होत्या…’कॅडबरी’ची सासू सुनेची. दोघी गॅलरीतून मिरवणूक पहात असतात. नंतर दोघीही मैत्रिणींप्रमाणे मिरवणुकीत सामील होऊन नाचतात. मोती साबणाची दिवाळी मधील जाहिरात. ‘उठा, उठा ‘मोती’ साबणाने स्नान करण्याची वेळ झाली.’ आता चालू असलेली कोरोना विषयावरील ब्रुक बाॅण्ड चहाची जाहिरात. मृणाल मुलासाठी चहा करताना नवऱ्याला सांगते, ‘त्याला एकटं रहायला सांगितलंय, एकटं पाडायला नाही.’ ती क्वारंटाईन केलेल्या मुलाच्या दाराशी चहाचा कप ठेवते आणि दारावरची बेल वाजवते. कोलगेट कंपनीची फक्त निवेदनातून दाखवलेली ताजी जाहिरात. एका हाॅटेलमथ्ये विधवा आई कोरोनाच्या एकटेपणावर मात करताना स्वतः लग्नाचा निर्णय घेऊन पतीसह आपल्या मुलीला व जावयाला बोटातील अंगठी दाखवून पुनर्विवाह ठरविल्याचं ‘कोलगेट स्माईल’ करुन दर्शवते.
डेटाॅल कंपनीची एक जाहिरात मुलाचे आपल्या आईवरचे उत्कट प्रेम दाखवते. एक सहा वर्षांचा मुलगा आईला वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी पैसे साठविलेला मटका फोडतो. त्याचे तुकडे वेचताना आईच्या बोटाला जखम होते. ती पाहून तो मुलगा कापसाने जखमेवर डेटाॅल लावतो. त्यावर आई त्याला विचारते की, तुला पैसे पाहिजे होते तर मला मागायचे.. त्यावर मुलाने दिलेल्या उत्तरावर आई मुलाला मिठीत घेते.
उत्तान अंग प्रदर्शन करणाऱ्या जाहिरातींच्या वाळवंटात अशा मोजक्या जाहिराती मनाला सुखविणाऱ्या आनंददायी हिरवळच वाटतात….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२५-८-२०.
Leave a Reply