सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारक अनावरणा चा कार्यक्रम दि. 3 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. या कर्यक्रमात राज ठाकरे सहित सचिन तेंडुलकर आणि त्याचा बालपणीचा सहकारी व मित्र विनोद कांबळी एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमातील सचिन-विनोदच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सचिन ची नजर विनोद कांबळीवर पडली तसा तो त्याला भेटायला विनोद जवळ गेला असता विनोद ने काही क्षण सचिन कडे पाहत शून्यात असल्यासारखा बघत असल्याचे दिसले. काही वेळाने त्याने सचिन ला ओळखले व अक्षरशः हात पकडून त्याला जवळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. यावेळेस विनोद कांबळीला बोलणंही कठीण ठरत होतं पण त्याचा उत्साह बराच होता. मात्र विनोद ची ही अवस्था पाहून अनेकांना त्याची दया येत होती.
कार्यक्रमा दरम्यान विनोद कांबळी ला आपले मत मांडण्याची विनंती केली असता विनोद ने अडखळत ‘ सर जो तेरा चकराये या दिल डुबा जाये ‘ हे सरांचे आवडते गाणे सादर केले.ज्याच्यासाठी साधे बोलणे कठीण आहे, त्याने चक्क एखादं गाणे गाऊन दाखवणे फार मोठी बाब होती. यावेळेस विनोदने सचिनसह उपस्थितांचे मन जिंकले आणि सचिनने आपल्या मित्रासाठी टाळ्या देखील वाजवल्या.
देशातील प्रसिद्ध क्रिकेटपटुंच्या यादीमध्ये विनोद कांबळीच्याही नावाचा समावेश केला जातो. त्याच्या नावावरून अनेक रेकॉर्ड्स आहेत.कांबळीने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कित्येक सामने खेळले आहेत. सचिन तेंडुलकर आणि विनोदची जोडी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती.पण कांबळीने क्रिकेटविश्वातून खूप लवकर संन्यास घेतला. कारणं काहीही असली तरी आजही कांबळी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे, आजही त्याची जादू चहात्यांमध्ये कायम आहे. दुसरीकडे विनोद कांबळीची प्रकृती सध्या ठीक नाही. अशा एका आजाराने त्याला ग्रासलंय की तो ठीक संवाद ही साधू शकत नाही आणि चालणंही कठीण ठरतंय.
– भैय्यानंद वसंत बागुल
Leave a Reply