नवीन लेखन...

रक्तरंजित आघातातून उभे राहिलेले पवित्र स्थान – सोरटी सोमनाथ

सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे.

एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे.

वेदकाळात सोमराज या राजाने सोमनाथ (शंकर ) यांचे सुवर्ण मंदीर बांधले. पुढे शिवभक्त रावणाने तेथे रौप्यमंदीर उभारले, तर पुढे श्रीकृष्णाने चंदनाच्या लाकडात मंदीर साकारले .

ई.सं. पूर्व २९५ ते २१९ या काळात चंद्रगुप्त व चाणक्य यांनी बौध्द धर्माच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी व वैदिक धर्माचा प्रसार प्रभावीतपणे करण्यासाठी सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. उत्तम शिल्पकारांकडून अनेक देवदेवतांच्या मूर्ती,हिरे, माणके मोती यांनी सजविल्या. मंदिरांच्या प्रवेशद्वाराशी २०० मण वजनाची संपूर्ण सोन्याची घंटा जड सोन्याच्या साखळीने लटकवली. हजारो ब्राम्हण एका वेळी वेदपठणास बसू शकतील असा सभामंडप व त्यासाठी शेकडोंनी उच्च शिक्षित ब्राम्हण,गायक,व वाद्यकलाकारांची नियुक्ति केली.

डोळे दिपवून टाकणारया ऐश्वरयाची कीर्ती जगभर पसरली. अनेक प्रवासी भेटी देत. त्या मध्ये अरेबिक प्रवासी अलबरूनी याच्या भेटीने सोमनाथची कीर्ती मुस्लीम जगात पसरली. आणि तेथूनच सोमनाथ मंदिराचा सूडाचा प्रवास सुरु झाला. इ. सं. १०२४ सालापासून गझनी महमद, अल्लाउद्दिन खिलजी, महमद बेगडा व औरंगजेब अशा मुस्लीम कर्दनकाळानी हे पवित्र स्थान ९ वेळा उध्वस्त केले. दरवेळेस कोट्यावधी हिरे माणक्यांची लुट,हजारो नागरिकांची कत्तल,स्त्रियांवरील अमानुष अत्याचार,शेकडो वर्षे नियमितपणे असे सत्र चालू होते.

१७८३ मध्ये अहिल्याबाई होळकरांनी नवीन दगडी मंदीर जवळच बांधले. भारत स्वतंत्र झाल्यावर या देवळाचा जुना रक्तरंजित इतिहास पुसून टाकण्याच्या उद्देशाने पहिल्या देवळाच्या जागी समुद्रकाठावर नवीन वास्तू उभारण्याचे शिवधनुष्य गुजराथचे सुपुत्र व भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल, काकासाहेब गाडगीळ व मुन्शी यांनी यशस्वीपणे कोणाचीही पर्वा न करता धडाडीने उचलले. मुहूर्त बांधणीचा दिवस होता ११ मे १९५१. सकाळी ९.४६ मिनिटे, ( इतिहास नोंदीप्रमाणे बरोबर याच दिवशी याच वेळी शेकडो वर्षापूर्वी गझनीने शिवलिंग तोडले होते. ) नवीन मंदिराचे नामकरण झाले ‘ जय सोमनाथ मंदीर ‘ यामुळेच ‘सौराष्ट्रे सोमनाथच शैलेमल्लिकार्जुनम” हा श्लोक भारतभर दुमदुमला आहे.

ज्या जागेवर जुन्या मंदिराच्या चौथर्याचे अवशेष मिळाले,त्याच जागेवर नवीन मंदिराची उभारणी झाली, जुन्या शैलीतील पिंगट कीरमिजी दगड दूरच्या प्रांतातून आणला गेला.मंदीर पूर्वमुखी, भव्य प्रवेशद्वार, बाजूनी पसरलेला अथांग अरबी समुद्र,पुढील बाजूस भव्य शुभ्र् मार्बलची फरशी असलेला सभामंडप, अगदी ७/८ हजार माणसे उभी राहू शकतील इतकी जागा, मंदिराच्या चौथरया पर्यंत बरेच अंतर चालावे लागते. त्याची लांबी १२५ फुट व रूंदी ११५ फुट, नक्षीकाम केलेल्या खांबांच्या रांगाच्या रांगा,जागोजागी विविध देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती, सर्व पायऱ्या व फरशीला वापरलेला मऊ,शीतल संगमरवरी दगड , आणि वर नजर टाकताच डोळ्यांच्या कक्षेत न मावणारा घुमट. १५० फूट उंच.गाभारा व समोरचा सभामंडप ७५ फूट लांब व ५० फुट रुंद. त्याच्या प्रवेशद्वारास लावलेले जाड चांदीचे आवरण, गाभार्याच्या मध्यात हिरे माणकांनी मढवलेले ज्योतिर्लिंग,त्याच्या मागे चांदीचा सोमनाथाचा मुखवटा,शेषफणा,एका बाजूस नखशिखांत दागीन्यानी मढवलेली आदिशक्ती पार्वती,उजव्या हातास ब्रम्हदेव,डाव्या बाजूस विष्णू, प्रवेशद्वाराजवळ मारुती व गजानन,हे सर्व पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो.ध्यानात बसण्यास भरपूर जागा,कुठेही हार,फुले, तीर्थ नाही,सगळीकडे वर्णनातीत स्वच्छता. संध्या आरतीच्या वेळी हातात मोठाली पेटती निरांजने घेतलेले सेवक.साथीला सुखद घंटानाद,कर्णमधुर आरतीचे सुरात तल्लीन झालेले भक्तगण आपण जय सोमनाथ दर्शनाने धन्य होतो.

पहिल्या मजल्यावर सोमनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास कृष्णधवल फोटो व विविध तक्त्या स्वरुपात दिल्याने अभ्यासकांना पर्वणीच आहे.बाहेरील पटांगणाच्या एका भागात १२ ज्योतिर्लिंग दाखविलेल्या उत्तम प्रतिकृती,व महाभारता पासून स्वातंत्र्य काळापर्यंत घडलेल्या महत्वाच्या घटनांचे मूर्ती स्वरुपात उभारलेले देखावे, त्यावर सोडलेले रंगीत लाईट,आपण अनोख्या विश्वात रममाण होतो.

सोरटी सोमनाथ मंदीर लाईट आणि साउंड शो हा भारतातील पहिल्या ५ उत्तम शो मधील गणला जातो.तासभराचा हा कार्यक्रम मन्दिरासमोर व सागराच्या पार्श्वभूमीवर आहे. बसण्याची उत्तम आसने,साथीला थंड गार समुद्रावरची हवा,सुरवातच मुळी सागर आपल्याशी संवाद साधत होते.पुराणकथा, राजे, नर्तकी,नाच गाणी, गझनीच्या स्वाऱ्या,लुटालूट,उध्वस्त मंदीर,हे सर्व पाहताना आपण इतिहासात हरवून जातो. हा अतिशय उत्तम श्रवणीय कार्यक्रम मुंबईच्या प्रसिद्ध पत्रकार विमला पाटील यांनी अनेक कलाकारांच्या मदतीने २००३ मध्ये तयार केला होता, त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले होते. हा कार्यक्रम हिंदी, इंग्रजी, व गुजराथी मध्ये असून त्याचे कथन अमरीश पुरी, हरीश भिमाणी,कबीर बेदी,दर्शन जरीवाला व परेश रावल यांच्या आवाजात साकारलेले आहे.हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, त्या करता एक रात्र राहणे गरजेचे आहे.

मंदिराच्या पश्चिम तटावरील वाळू किनारी एक स्तंभ उभारलेला असून त्यावर एक बाण दक्षिण दिशेकडे दाखवलेला आहे, तेथे लिहिलेले आहे ‘या खांबापासून थेट दक्षिण ध्रुवा पर्यंत पृथ्वीचा कोणताही भूप्रदेश येत नाही,’ हे मंदिराचे भौगोलिक महत्व.

मंदिरात शिरण्यापूर्वी कॅमेरा सकट सर्वच गोष्टी लॉकरला जमा कराव्या लागतात,अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था,पण त्रास अजिबात नाही. प्रत्येक जागी जय सोमनाथ म्हणत होणारे स्वागत,संपूर्ण परिसरच इतका मोठा आणि स्वच्छ, कुठेही गर्दी नाही,स्वागतास शेकडो स्वयंसेवक,एक अनोखे देवस्थान पहिल्याचा आनंद क्षणोक्षणी मिळतो.आपल्या देशात अशीही देवस्थाने आहेत खरच भारत महान आहे हे पटते.

प्रभासपाटण हे प्राचीन नगर समुद्र काठावरील असून या ठिकाणी सोमनाथ मंदिराची स्थापना झाली. हे एके काळचे प्रसिद्ध बंदर,जेथून पर्शियन गल्फ,ग्रीस पर्यंत व्यापार चालत असे.नागार्जुन हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ या गावातील, ज्याने वैद्यकीय शास्त्रावरील मोलाचे ग्रंथ लिहिले होते, जे गझनीच्या स्वाऱ्यात लुटले गेले. त्यांचा अलुबरनी या अरब विद्वानाने अभ्यास करून त्यांचे अरबी भाषेत भाषांतर केले व त्यामुळे भारतीय चिकित्सा पद्धतीचे युनानी औषध पद्धतीत रुपांतर झाले.आज या छोट्या गावाची बाजारपेठ मंदिराला लागून असलेल्या छोट्या बोळात आहे.यामधील एका जुन्या वाड्यात सोमनाथ मंदिराच्या उत्खननाच्या वेळी मिळालेले अनेक अवशेष एकत्रित करून त्याचे उत्तम मांडणी असलेले प्रदर्शन आहे.मधील चौकात बुद्धकालीन मौर्य राज्याच्या विविध मूर्ती,तुटलेल्या कमानी,प्राणी, पक्षी,कोरीव दागिने असलेले रेखीव दगड,जुने मंदिराचे उध्वस्त झालेले स्तंभ,पुतळे, खिडक्या, दरवाजे, त्या वरील नक्षीकाम छाती दडपून टाकणारे हे अवशेष पाहिल्यावर मंदीर किती भव्य असेल याची कल्पना येते .हिरे माणके सोने तर लुटून नेलेले, ते तर औषधालाही शिल्लक नाहीत.

नवीन मंदीर बांधण्याच्या वेळी धार्मिक सोहळा फार थाटात झाला होता.जगातील सर्व महत्वाच्या नद्या व सप्त समुद्राचे पाणी आणि विविध देशातील माती आणलेली होती. ते सर्व बाटल्यात नावानिशी ठेवलेले आहेत, हे एक महत्वाचे आकर्षण आहे.दुर्मिळ इतिहासाची दखल घेण्यासारखी ही जागा पाहताना मन भरून येते.

प्रभासतीर्थ त्रिवेणी संगम ( कपिला,हिरण्या,व गुप्त सरस्वती ) अशा तीन नद्या व समुद्र असा संगम असल्याने पाणी खारट,बाजूनी लांब घाट,ज्या जागी श्रीकृष्णाचा देह विसर्जित केला त्यामुळे त्याचे महत्व,तेथे लक्ष्मी नारायण मंदीर व गीता मंदीर जेथे गीतेचे १८ अध्याय कोरलेले आहेत.

सोमनाथ पासून ८ किमी अंतरावर भालक तीर्थ मंदीर ,जेथे श्रीकृष्णाला पारध्याचा चुकून बाण लागून त्यांचे देहावसान झाले ती जागा.तेथील आडवी मूर्ती आणि त्यावरील भाव ,जवळच असलेल्या पादुका एकूणच मन प्रसन्न करणारे वातावरण आहे.

सोमनाथ मंदीर जेथे वसलेले आहे ते गाव सोरटी आधुनिक,उत्तम रस्ते नवीन रेल्वे स्टेशन राजेशाही हॉटेल्स,आग्रहानी जेवण वाढणारे कर्मचारी,शाही जेवणाचा पाहुणचार घेत जय सोरटी सोमनाथ दर्शनाची सांगता होते.

— डॉ. अविनाश वैद्य
भ्रमण ध्वनी ९१६७२७२६५४

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

1 Comment on रक्तरंजित आघातातून उभे राहिलेले पवित्र स्थान – सोरटी सोमनाथ

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..