यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे शिकणे. जीवन हे शिक्षण आहे असे माना आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. प्रत्येक दिवशी काही तरी नविन शिका. ते कसे शिकाल? त्यासाठी तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणा. तुमच्या विचारांची व्याप्ती वाढवा. तुमचे स्वत:चे क्षितीज वाढवा. त्यामुळे होईल काय की तुम्ही वृध्द होणार तर नाहीतच, उलटपक्षी सदैव चिरतरुणच राहाल.
वृद्धापकाळ किंवा म्हातारपण त्या लोकांमध्येच येत असते, ज्यांच्यामध्ये चांगले मिळविण्याची आशा मावळते, तसेच जे लोक त्यांच्यामध्ये असणा-या चौकसबुद्धीला सोडचिट्टी देतात. प्रत्येक तीन ते चार वर्षांनी आपण नव-नविन विषयाला अनुसरा किंवा हात घाला. मग तो कोणताही विषय असो. जसे जपानी भाषा शिकणे, अर्थशास्त्र शिकणे, इतिहास शिकणे वगैरे वगैरे. ह्या तीन चार वर्षात तुम्ही त्याच्यावर प्राविण्य मिळवू शकणार नाहीत, परंतू तुम्ही निश्चितच तो विषय समजू शकाल. त्यासाठी पुस्तकांवर प्रेम करा. पुस्तके वाचा. वाचन वाढवा आणि त्यातूनच नव-नविन विषय शिकण्याचा प्रयत्न करा.
एका तज्ञांना एकदा विचारले गेले की, “तुम्ही केंव्हा वाचता?” त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला की, “मी केंव्हा वाचत नाही? ते पुढे म्हणाले, “सकाळी उठल्यावर, नाश्ता करताना, संध्याकाळी, रात्री म्हणजेच ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल, त्या त्या वेळेस मी वाचन करीत असतो. मग तो विषय कोणताही असो.”
बरेच माणसे ही त्यांचे शालेय शिक्षण किंवा विद्यापिठीय शिक्षण संपल्यावर वाचन करावयाचेच सोडून देतात. विश्वास बसत नाही ना? बरीच माणसे, आपला अमूल्य वेळ हा टी. वी. बघण्यात घालवितात. परंतू मोठ्या माणसांच्या चरित्र वाचनात मात्र घालवीत नाहीत. तर ब-याच माणसांनी आपल्या मनाची कवाडेच बंद करून घेतलेली असतात. ते नविन विचारांना आपल्या जीवनात थाराच देत नाहीत किंवा चांगल्या विचारांचा पाठपुरावाच करीत नाहीत.
एकादे पुस्तक वाचतांना, त्यातुन मिळणा-या एका कल्पनेने किंवा विचाराने तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलू शकते. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमची इतरांशी सुसंवाद साधण्याची पद्धत बदलू शकते. एकाद्या पुस्तकात वाचलेली कल्पना तुम्हाला तुमचे आयुष्य वाढविण्यास मदतच करील. तुमच्या आयुष्यात आनंद भरेल किंवा तुम्हाला तुमचा व्यापार-उदीम वाढविण्यास मदत देखील करील. याचाच अर्थ, तुम्ही घरातून बाहेर पडताना एखादे पुस्तक हातात घेवूनच बाहेर पडा आणि सदैव वाचत रहा. वाचन करता करता आपल्या ज्ञानात भर घालीत जा. ते ज्ञान कधी ना कधी आपल्या उपयोगाचे आहे, हे आपणास कळून येईल व त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग देखील होईल.
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply