इराकचे एकेकाळचे हुकुमशहा सद्दाम हुसेन यांचा जन्म २८ एप्रिल १९३८ रोजी बगदाद जवळील तिकरित या गावी झाला.
सद्दाम हुसेन हे १९७९ ते २००३ अशा दोन दशकांहून अधिक काळ इराकच्या अध्यक्षपदी राहिले. त्यांच्या कारकीर्दीतील अखेरचा काळ अत्यंत वादळी ठरून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
किशोरावस्थेतच विद्रोही बनून बगदादच्या तत्कालीन ब्रिटिश सत्तेविरोधी आंदोलनात सामील झालेले सद्दाम पुढे १९५६ मध्ये बाथ सोशालिस्ट पक्षात सामील झाले. पुढे ब्रिटिश राजवट उलथवून अब्दुल कासिम याने बगदादचा कब्जा घेतला तेव्हा सद्दाम हे अब्दुलचे साहाय्यक होते. ३१ वर्ष वय असताना सद्दाम हुसेन यांनी जनरल अहमद अल बक्र यांची सत्ता हस्तगत केली. व सद्दाम हुसेन स्वत: अध्यक्षपदी झाले.
सद्दाम यांना दोन मुले उदय आणि कुसय. यातला उदय थोरला. अस म्हणतात की सद्दाम हुसेन हे भारताचा मोठा फॅन होते. सद्दाम हुसेन प्रोग्रेसिव्ह विचाराचे होते. त्यांच्या काळात मुलीना शिक्षणासाठी बंदी नव्हती. मुली आधुनिक कपडे घालू शकत होत्या, नोकरी करू शकत होत्या. इंदिरा गांधीसारखी महिला भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करते याचे त्यांना आश्चर्य वाटायचं. इंदिराजी जेव्हा इराक दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्यांची सुटकेस सुद्धा सद्दाम हुसेन यांनी उचलली होती. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला पाठींबा देणारा सद्दाम हुसेनच होते. अस म्हणतात की भारताच्या प्रेमातुन त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचं नाव उदय ठेवलं. सद्दाम यांचा मुलगा उदय हा सद्दाम नंतर येणारा तानाशाह समाजला जात असे. सद्दाम यांच्याकारकीर्दीत उदय ने अनेक लोकांच्या हत्या करविल्या. स्त्रियांवर अत्याचार, हत्या, जबरदस्तीने खंडणी वसूल करणे असे अनेक गंभीर आरोप उदय वर होते. इराकच्या महिला ऑलिम्पीयन्स आणि महिला फुटबॉल पटूंच्या बलात्काराचे आरोपही उदयवर होते. आपल्या पित्याच्या पर्सनल टेस्टरची देखील उदयने हत्या केली होती. २००३ साली अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये उदय मारला गेला.
१९८० साली बगदादने इराणशी सुरू केलेल्या युद्धात सद्दामने अमेरिकेची मदत घेऊन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले. हे इराण-इराक युद्ध काहीही निर्णय न होताच संपले. १९८२ मध्ये सद्दामनी त्यांना विरोध करणाऱ्या दुलजली खेडय़ातल्या शियापंथीय १५० लोकांचे शिरकाण करून १९९० साली तेलसंपन्न कुवेतवर हल्ला करून आखाती युद्धाची सुरुवात केली. या वेळी अमेरिकेने कुवैतची बाजू घेऊन बगदादवर तीन आठवडे बॉम्बफेक करून सद्दाम हुसेनला कुवैतवरचे आक्रमण मागे घेण्यास भाग पाडले. आखाती युद्धामध्ये पराभूत होऊनही सद्दाम हुसेनचा बगदादवरचा अंमल चालूच राहिला आणि सद्दामनी कुवैत आणि अमेरिकेला अधूनमधून आव्हाने देण्याचा प्रकार चालूच राहिला. त्यावर अमेरिका आणि ब्रिटन यांच्या संयुक्त फौजांनी २००३ साली इराकवर हवाई कारवाई करून बगदाद उद्ध्वस्त केले. त्यांनी बाथ या सत्ताधारी पक्षावर बंदी घालून सद्दाम हुसेनना अटक केली आणि निवडणूक घेऊन नवे हंगामी सरकार आणले. या हंगामी सरकारने सद्दामवर १५० शियापंथीय लोकांना ठार मारणे, रासायनिक अस्त्रे बाळगणे आणि अमानवतावादी कृत्ये करणे असे आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरला. हे आरोप सिद्ध होऊन त्यांना २००३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली व सद्दाम हुसेन यांना बगदादमध्ये ३० डिसेंबर २००६ रोजी फाशी देण्यात आली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply