वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी “फॅशन आयकॉन‘ म्हणून ओळखल्या जाणारी गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून साधना यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते.
साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली. १५ वर्षांच्या साधनाला महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली. १९५८ मध्ये “अबाना‘ या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता.
प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा ‘स्क्रीन’ मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना आपल्या अभिनय प्रशिक्षण शाळेत प्रवेश दिला, आणि ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. त्या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे ‘साधना कट’ या नावाने खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. त्यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.
मनोज कुमारसोबत त्यांनी केलेल्या “वो कौन थी‘ चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. मा.साधना यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply