भारताचे माजी क्रिकेटपटू सदू शिंदे यांचा जन्म १८ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई येथे झाला.
सदाशिव गणपतराव शिंदे उर्फ सदू शिंदे हे भारताकडून एकूण ७ कसोटी सामने खेळले.आपल्या ते कारकीर्दीत ७९ प्रथम श्रेणी सामने खेळले. शिंदे प्रथम चर्चेत आले ते म्हणजे १९४३- ४४ च्या दरम्यान. त्यांनी महाराष्ट्राकडून खेळत असताना मुंबईविरुद्ध १८६ धावा देत ५ बळी घेतले. परंतु, शिंदे यांची ही कामगिरी मुंबईतील विजय मर्चंटच्या तिहेरी शतकामुळे (३५९ नाबाद) फारशी चर्चिली गेली नाही.
सदू शिंदे यांचे वडील बांधकाम ठेकेदार होते. मुंबईत जन्म झाला असूनही ते पहिला रणजी सामना महाराष्ट्राकडून खेळले होते. क्रिकेट खेळत असतानाच ते बाँबे सचिवालयात क्लार्कची नोकरी करत होते. त्या नंतर १९४६ च्या इंग्लंड दौर्याससाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. या दौर्यांवर त्यांनी एकूण ३९ बळी घेतले. परंतु हे विकेट्स त्यांनी कसोटीत घेतल्या नव्हत्या. त्यांनी या दौर्यावर फक्त एकच कसोटी खेळली.
लॉर्ड्समध्ये खेळलेल्या या कसोटी सामन्यात त्यांची फलंदाजी त्यांच्या गोलंदाजीपेक्षा जास्त चर्चेत होती. शिंदे यांनी शेवटच्या विकेटसाठी रूसी मोदीबरोबर ४३ धावांची भागीदारी केली. तरीही त्यांना काही खास करता आले नाही आणि पुढील पाच वर्षांत त्यांनी फक्त एक कसोटी सामना खेळला. १९५१- ५२ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या कसोटी सामन्यात शिंदे यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जेवणानंतर गोलंदाजीला आलेल्या शिंदे यांनी डॉन केन्यॉनला त्रिफळाचित करुन आपले खाते उघडले. यानंतर, त्यांनी जॅक रॉबर्टसन आणि डोनाल्ड कॅर यांना बाद केले. शिंदे यांनी पहिल्या ८ षटकांत केवळ १६ धावा देऊन ३ गडी बाद केले. नंतर इंग्लंडचा डाव २०३ धावांवर संपुष्टात आला. त्यामध्ये शिंदे यांनी ६ गडी बाद केले.
पहिल्या डावात भारताने आघाडी घेतली आणि सामना सहज आपल्या बाजूने करून घेतला खरा, पण इंग्लंडच्या दुसर्याल डावात भारतीय संघाने अत्यंत खराब क्षेत्ररक्षण केले. असे म्हटले जाते, की त्या दिवशी केवळ शिंदेंच्या गोलंदाजीवर भारताने ७ गडी बाद करण्याची संधी गमावली. विशेषत: यष्टीरक्षक नाना जोशी आणि बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या दत्ताजीराव गायकवाड यांनी त्या दिवशी अतिशय खराब क्षेत्ररक्षण केले. इंग्लंडने कसा तरी सामना वाचविला. परंतु, पहिल्या डावातील चांगल्या कामगिरीचा फायदा शिंदे यांना झाला आणि १९५२ च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघात त्यांना स्थान मिळाले. या दौर्यानवर सुभाष गुप्ते यांच्या जागी शिंदे यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले होते.
कारकिर्दीतील ७ कसोटी सामन्यांमध्ये शिंदेने एकूण १२ बळी घेतले. यात त्यांनी ८५ धावाही केल्या. यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या ही १४ धावा होती, तर सरासरी १४.१६ होती. अशाप्रकारे ते भारताचे आणि जगातील पहिले असे क्रिकेटपटू होते, ज्यांची सर्वोच्च धावसंख्या ही सरासरीपेक्षाही कमी होती. घरगुती क्रिकेटमध्ये शिंदे महाराष्ट्र, मुंबई आणि बडोदाकडून खेळले. प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी २३० गडी बाद केले आहेत.
मा. शरद पवार हे त्यांचे जावई होत. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह बारामतीत झाला. प्रतिभाताईंचे माहेरकडे नाव जिजा असे होते. शरद पवारांच्या लग्नापुर्वीच १२ वर्ष आधी सदू शिंदे यांचे निधन झाले होते. पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर पुणे महापालिकेतर्फे दिवंगत क्रिकेटपटू सदू शिंदे यांच्या नावाने २०१८मध्ये तळजाई टेकडीवर क्रिकेटचे मैदान उभारण्यात आले.
सदू शिंदे यांचे २२ जून १९५५ रोजी निधन झाले. तेव्हा ते ३१ वर्ष व ३०८ दिवसांचे होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ: इंटरनेट/ विनायक धुमाळ.
पुणे.
Leave a Reply