हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
‘द मॅन हु वुड बी द किंग’, ‘पॅसेज टु इंडिया’ सारख्या चित्रपटांमधून त्यांचे काम जगाने पाहिले. ‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘गांधी’, ‘दिल’, ‘जब प्यार किसीसे होता है’ सारख्या अनेक बॉलिवूडपटांतून कधी वडिलांच्या, कधी काकांच्या भूमिकेतून समोर आलेले चरित्र अभिनेता सईद जाफरी अशी त्यांची लोभसवाणी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. अभिनेत्री आणि लेखिका मेहरुनिसा (मधुरी जाफरी) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र १९६५ मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
मधुरी यांच्यापासून मीरा, झिया आणि सकिना जाफरी अशा तीन मुली असून त्याही अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. सईद जाफरी यांनी अनेक सिनेमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. यात शतरंज के खिलाडी, गांधी, राम तेरी गंगा मैली, दिल, अजुबा, हिना या सिनेमांचा समावेश असून त्यातील त्यांच्या विशेष भूमिका गाजल्या. राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये सईद जाफरी यांची भूमिकाही नजरेत भरणारी होती. सईद जाफरी यांचे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply