नवीन लेखन...

सागरी सुरक्षा आणि कोळी बांधव

भारताच्या समुद्रकिनार्‍यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्‍या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात.

आंतरराष्ट्रीय कायद्या प्रमाणे समुद्र किनार्यापासून २० नॉटीकल माईल्स पर्यंतच्या समुद्राला टेरिटोरिअल वॉटर्स म्हणजे त्या देशाचा समुद्र मानला जातो. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी इतर देशांना आपल्या देशाची परवानगी घ्यावी लागते. २० नॉटीकल माईल्सपासून ते २०० नॉटीकल माईल्सपर्यंतचा समुद्राला “एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमीक झोन” असे म्हटले जाते. यामध्ये मिळणारे तेल, गॅस व इतर धातू हे आपल्या देशाचे असतात. यामुळे या समुद्राचे रक्षण करणे हे आपल्याला गरजेचे असते. आपल्या सुरक्षा संस्था म्हणजे नौदल, कोस्टगार्ड, समुद्र पोलिस, कस्टम्स या आपल्या समुद्रहद्दीत गस्त घालत असतात. पण आपल्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमीक झोनची व्याप्ती इतकी मोठी आहे की, नौदल, कोस्टगार्ड, पोलिस व कस्टम्स यांनी गस्ता करूनही आपल्याला पूर्णतः सुरक्षा मिळणे कठीण आहे. यासाठी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणारे ४० लाख मच्छिमार व त्यांच्या अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्या बोटी हे जर आपल्या सुरक्षा यंत्रणाचे डोळे व कान बनले तर आपण आपल्या सागराची सुरक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो.

निर्मनुष्य किनार्‍यावर रिटायर्ड पोलिस किंवा सैनिक यांना वसवण्याची गरज

पण यासाठी संपूर्ण समुद्रकिनार्‍याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. असे कित्येक समुद्रकिनारे आहेत जेथे कोणीही राहात नाहीत. म्हणजे तो किनारा निर्मनुष्य आहे व सुरक्षेच्या दृष्टीने तो उघडा पडलेला आहे. त्यामुळे अशा निर्मनुष्य किनार्यावर कोळी बांधव, रिटायर्ड पोलिस, कोस्टगार्ड किंवा सैनिक यांना वसवण्याची गरज आहे. यामुळे किनार्याचा कोणताही भाग हा निर्मनुष्य राहणार नाही. एका सरकारी अहवालात असे नमूद केले आहे की आपल्या समुद्रात हजारो छोटी बेटे आहेत. येथे कोणीही राहात नाहीत. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या समुद्रामध्ये खांदेरी-उंडेरी ही बेटे आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली जायची. पण आज इथे फक्त एक रडार लावलेले आहे. अशा अनेक बेटांवर कोणीही जात नाही. अशा बेटांचा वापर दहशतवादी शस्त्रे,दारुगोळा,स्फ़ोटक साठवण्याकरीता करू शकतात. त्यामुळे अशा समुद्रात आणि किनार्याजवळ असणार्या बेटांचे रक्षण करणेही जरूरीचे आहे. नितिन गडकरी यांनी असे जाहीर आहे की अशा अनेक बेटांचा पर्यटनासाठी खास पद्धतीने विकास केला जाईल. असे झाल्यास आपोआपच त्या बेटांवर थोडी वस्ती तयार होईल आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणे जास्त सोपे होईल. त्याचप्रमाणे अशा बेटांचा, तेथे राहणार्या लोकांचा व आजूबाजूच्या परिसराचा नकाशा तयार करण्याची गरज आहे आणि हे नकाशे प्रत्येक पोलिस स्टेशन तसेच सागरी सुरक्षेसाठीच्या संस्थांना देण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या कित्येक समुद्रकिनार्यावर रस्तेच नाहीत. किनार्यापर्यंत रस्ते बांधण्यात आले तर किनार्याचे रक्षण जास्त सोपे होईल.

सागरी सुरक्षेकरिता १०९३ टोलफ्री नंबर

याचबरोबर आता आपण समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या आपल्या कोळी बांधवांचा आपल्या किनार्याच्या संरक्षणासाठी कान व डोळ्यासारखा वापर कसा करता येईल ते पाहू.सध्या नौदल, कोस्टगार्ड व पोलिस हे थोड्या प्रमाणात आपल्या कोळी बांधवांचा उपयोग करत आहेत. या सर्व संस्था दोन महिन्यातून एकदा मासेमारीसाठी जाणार्या कोळी बांधवांना भेटुन त्यांना सागरी सुरक्षेबाबतची माहिती देत असतात. तसेच या भागातील स्थानिक नेत्यांचे फोननंबर हे नौदल, कोस्टगार्ड व पोलिसा यांच्याकडे देण्यात आले आहेत. जर गुप्तहेर संघटनेकडून एखाद्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर ताबडतोब ती माहिती त्या भागातील कोळी बांधवांपर्यंत पोहोचवता येते. सध्या मात्र अशी माहिती फक्त कोळी बांधवांच्या नेते मंडळींपर्यंत पोहोचवली जात आहे. पण पुढील काळात अशी माहिती जास्त कोळी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. सागरी सुरक्षेकरिता १०९३ हा टोलफ्री नंबर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू करण्यात आलेला आहे. याद्वारे जर कोणाही नागरिकाला सागरी सुरक्षेबाबत काही माहिती द्यायची झाल्यास तो थेट माहिती जॉईन्ट ऑपरेशनल सेंटरला(जेओसी) देऊ शकतो. आपल्या सर्व किनार्यावर राहणार्या नागरिकांना आव्हान आहे की, त्यांनी या टोलफ्री नंबरचा वापर करून आपल्या सागरी सुरक्षेबाबत जास्तीत जास्त माहिती जेओसीला पुरवावी.

मल्टिपर्पज आयडेंटीटी कार्ड सर्वांना देण्याची गरज

याचबरोबर सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी सर्व कोळी बांधवांना व किनार्यावर राहणार्या नागरिकांना मल्टिपर्पज आयडेंटीटी कार्ड (एम.पि.आय.सी.) देण्यात येत आहे. यामुळे समुद्रात गस्ती घालताना नौदल, कास्टगार्ड किंवा पोलिस हे आपल्या भागात मासेमारी करणार्या बोटी व त्या बोटींवरील मासेमारी करणारे हे आपल्या देशाचेच नागरिक आहेत याची खात्री करू शकतील. ही सर्व बायोमेट्रिक आयडेंटी कार्ड असल्यामुळे त्यातला माहितीत बदल करणे सोपे नाही. मात्र, एका अहवालाद्वारे फक्त ७० टक्के नागरिकांनाच अशी कार्ड मिळाली असल्याचे समजते. अपेक्षा आहे की, लवकरात लवकर अशा प्रकारचे कार्ड हे उरलेल्या नागरीकांना मिळावीत. त्याचबरोबर सर्व मासेमारी बोटींना रजिस्टर केले जात आहे, पण हेही काम शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. अपेक्षा हीच आहे की मासेमारी बोटींचे रजिस्ट्रेशनही लवकरात लवकर व्हावे.

गरज आहे अ‍ॅक्शनेबल इंटिलिजन्सची

आपला समुद्रकिनारा खूप मोठा असल्यामुळे गरज आहे ती अ‍ॅक्शनेबल इंटिलिजन्सची, म्हणजे कधीतरी, कुठेतरी, केव्हातरी दहशतवादी हल्ला होणार ही फारशी उपयुक्त माहिती नसते. पण नेमकी माहिती मिळाली उदा. रायगड किनार्याला शेखाडीला आज रात्री काही सामान उतरवले जाणार आहे तर ते थांबवणे शक्य आहे. यासाठी गरज आहे ती आपल्या गुप्तहेर संस्थांशिवाय सगळ्यांनी आपले कान आणि डोळे उघडे ठेवण्याची. आज समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या कोळी बांधवांना त्यांनी जास्त कोणावर लक्ष ठेवावे याची माहिती देणे हे गरजेचे आहे. नौदल, कोस्टगार्ड, पोलिस, कस्टम्स यांच्या सर्व मिळून शंभर ते दीडशे बोटी समुद्रात गस्त घालत असतात. जर सगळेच कोळी बांधव आपले कान व डोळे बनले तर आजून दोन ते अडीच लाख बोटींचा वापर आपण समुद्रगस्तीसाठी करू शकतो. या बोटींबरोबर समुद्रात जाणारे ४० लाख कोळी बांधव हे आपले कान व डोळे बनू शकतील. यामुळे आपली सागरी सुरक्षा ही फारच उत्कृष्टरित्या केली जाऊ शकते. मात्र त्यासाठी गरज आहे ती कोळी बांधवांना नेमके काय शोधायचे आहे हे सांगण्याची आणि कशा प्रकारची माहिती त्यांनी आपल्या जेओसीला दिली पाहिजे.

कोळी बांधवांना नेमके काय शोधायचे हे सांगण्याची गरज

समुद्रातील जेट्टीवर किंवा लँडींग पॉईन्टला कोणतीही अनोळखी बोट आली तर त्याची माहिती लगेचच दिली जावी. तसेच मासेमारी कोणत्या भागात होते याचे काळीबांधवांना चांगलेच ज्ञान आहे. तसेच कोणत्या भागात मासेमारी होत नाही हेही त्यांना माहिती असते. अशा भगात जर एखादी बोट दिसल्यास किंवा त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास त्यांचीही माहिती द्यायला हवी. तसेच रात्रीच्या वेळी कोणत्याही बोटी टॉर्चच्या साहाय्याने काही सिग्निल द्यायचा प्रयत्न करत असतील किंवा एका बोटीमधून दुसर्या बोटीत सामान चढवले जात असेल किंवा एका बोटीतून दुसर्या बोटीत माणसे बदलली जात असतील तर अशी हालचालही संशयास्पद आहे. काही वेळा तस्कर मंडळी आपले सामान हे कोळी लोकांच्या बोटीतून किनार्यावर नेण्याचे प्रयत्न करतात. यासाठी जास्त पैशांचे आमिष दाखवले जाते. २६/११ च्या हल्ल्यानंतर अनेक टीव्ही चॅनल्सनी अशा प्रकारे खोटे सामान किनार्यावर आणण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व टीव्ही चॅनल्सना यात यश मिळाले. यावरून असे दिसते की, आपलेच काही नागरिक हे अशा प्रकारच्या जास्त पैशांच्या आमिषाला बळी पडलेले आहेत. टाईम्स नाऊ, सीएनएन/आयबीएन, एनडी टीव्ही,इंडिया टुडे यांनी तयार केलेले अशा प्रकारचे व्हिडिओ हे आपल्याला यु-ट्यूबवर आजही पाहायला मिळतात.

कोळी बांधवांची एक होमगार्ड बटालियन

प्रत्येक भागात राहणार्या कोळी बांधवांची भाषा ही वेगवेगळी असते. त्यामुळे यांना आपल्या भाषेबरोबर हिंदी व इंग्रजीचे ज्ञान देणे आवश्यक आहे. ज्यामुळे मिळालेली गुप्त माहिती ते पटकन जेओसीकडे पोहचवू शकतील. तसेच जेओसीमध्ये काम करणार्या नौदल, कोस्टगार्ड, पोलिस यांना तेथील स्थानिक भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. असे स्थानिक भाषेचे ज्ञान असणारे कर्मचारी जेओसीमध्ये असले तर स्थानिकांकडून मिळणारी माहिती घेणे सोपे होवू शकते. थोडक्यात समुद्र किनार्यावर राहणार्या कोळी बांधवांना आपल्या सागरी सुरक्षेचा भाग बनवले गेले तर आपली सागरी सुरक्षा अधिक मजबूत होऊ शकते. एक महत्त्वाची शिफारस अशी आहे की, महाराष्ट्राला लाभलेला ७८० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. या किनार्यावर राहाणार्या कोळी बांधवांची एक होमगार्ड बटालियन किंवा सागरी सुरक्षा बटालियन तयार केली तर इथे राहणार्या कोळी बांधवांना काम तर मिळेलच पण गुप्त माहिती गोळा करण्याच्या कामात आपल्या गुप्तहेर खात्याला मदतही होऊ शकते. तसेच यामुळे आपला सागरी किनार जास्त सुरक्षित होऊ शकेल. अशी आशा करून या की, अशा प्रकारच्या सागरी सुरक्षा बटालियन किंवा सागरी गुप्तहेर माहिती बटालियन सरकार लवकरात लवकर तयार करेल.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..