माझ्या पाचवीच्या पुस्तकात शेर्पा तेनझिंगचा पाहिलेला फोटो मला अजूनही आठवतोय.. आज तेनझिंग नोर्गेनं, स्वर्गाची मोहिम फत्ते करुन छत्तीस वर्षे झालेली आहेत. हिमालयातील एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत ‘सागरमाथा’ म्हणतात. हिमालयाची भव्यता, तेथील क्षणाक्षणाला बदलणारा निसर्ग, डोळे दिपवून टाकणारे नैसर्गिक सौंदर्य यांचा विचार करुन प्रत्येक गिर्यारोहकाचं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न असतेच..
एडमंड हिलरीच्या आधी कित्येकांनी एव्हरेस्टला, पादाक्रांत करण्यासाठी धडका दिल्या.. मात्र यश मिळाले ते या दोघांनाच! २९ मे १९५३ साली, खडतर प्रयत्नांनंतर या दोघांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. ते दोघे फक्त पंधरा मिनिटेच शिखरावर होते. त्यावेळी हिलरीने काढलेला शेर्पा तेनझिंगचा फोटो, संपूर्ण जगाच्या स्मरणात राहिला..
त्यानंतर तेनझिंग, दार्जिलिंग येथील हिमालीयन माऊंटेनिअरींग इन्स्टिट्युटचे डायरेक्टर होते. १९७८ मध्ये त्यांनी ‘तेनझिंग नोर्के ॲडव्हेंचर्स’ ही गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केली. भारत सरकारने १९५९ साली तेनझिंग यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले. १९७८ साली ‘तेनझिंग नोर्गे सन्मान पदक’ देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
तेनझिंग यांनी एकदा मुलाखतीत सांगितले होते की, ‘ओझीवाहू हमालापासून सुरुवात करुन, अनेक पदके लटकवलेला कोट घालून, विमानातून ठिकठिकाणी प्रवास करुन, मिळणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तीकर भरण्याची चिंता करणारा एकमेव असा, मी पहिलाच शेर्पा असेन…’
एका सामान्य ओझी वहाणाऱ्या हमालाच्या नशिबात, एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं भाग्य लिहिणाऱ्या चित्रगुप्ताचं, खरंच कौतुक वाटतं.. आज या गोष्टीला एकोणसत्तर वर्षे झालेली असली तरी शेर्पा तेनझिंगला विसरणं कदापि शक्य नाही… त्यांचा तो हसरा चेहरा प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरलेला आहे.. तो पाचवीत पाहिलेला रंगीत फोटो अजूनही स्मरणात आहे… आजपर्यंत शेकडो गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केलेला असला तरी, तेनझिंगची सर त्यांना नाही…
९ मे १९८६ रोजी शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी स्वर्गारोहण केले.. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
९-५-२२.
Leave a Reply