माझा मुक्काम पुणे येथे होता. अकराव्या मजल्यावरील टेरेसला आकाशाचं छत होतं. ऊन-पाऊस अनुभवत वाढलेली झाडं वार्याबरोबर डोलत होती. कबुतर, चिमणी, कावळा, बुलबुल हे पक्षी त्यांच्या सोयीनुसार हजेरी लावत होती. चिमणीहून लहान असलेला पक्षी मी येथे पहिल्यांदा बघितला. मानव वस्तीजवळ चिमण्यांप्रमाणे राहण्याची जागा निवडणारा हा पक्षी जोडीने दिसू लागला. पाऊस सुरु होऊन एक महिना झाला होता. आसपासच्या मोकळ्या जमिनीवर लांब पात्याचे गवत भरपूर माजले होते. एकदा हा पक्षी उंचावरून खाली झेपावत जाताना मला दिसला. काही वेळाने चोचीत लांब हिरवे पान घेऊन तो अकरा मजले गाठत कुठेतरी नाहीसा होत होता. हाच प्रकार आणखी काही वेळा पाहिल्यावर माझे कुतुहल जागे झाले. पक्षी गेलेल्या दिशेला असलेल्या खिडकीतून बघितल्यावर मला त्याच्या लुप्त होण्याची जागा कळली. बाजूच्या फ्लॅटच्या खिडकीत पक्षाची स्वारी बसली होती. खिडकीच्या चौकटीचा तळ व ग्रिल यांच्यामधे लांब पान अडकविण्याचे त्याचे प्रयत्न सुरु होते. जोडीदारासह चाललेल्या या प्रयत्नात पान खाली पडत होते. एक-दोन पाने व्यवस्थित बसल्याची खात्री झाल्यावर पुढील काम त्यांनी वेगाने पूर्ण केले. लहान वाटीएवढ्या आकाराचा खळगा तयार झाला. फारशा उघडल्या न जाणार्या या खिडकीमुळे घरट्याला एका बाजूने चांगला आधार मिळाला होता. पक्षांची जोडी चिवचिवाटातून आनंद व्यक्त करीत होती. त्यांनी एक टप्पा पूर्ण केला होता.
चार दिवसांनी या मला पक्षाच्या जोडीचा गोंगाट ऐकू आला. सैरभैर झाल्याप्रमाणे इकडून तिकडे उडत ते पक्षी ओरडत होते. खिडकीतले त्यांचे घरटे तेथे नव्हते. ते खाली पडले होते. कधी उघडी न दिसलेली फ्लॅटची खिडकी उघडी होती. एक मुलगा हातात केरसुणी घेऊन खिडकी झाडत होता. त्याला मी विचारले, ‘घरटे कसे पडले?’ तेव्हा तो म्हणाला, ‘मीच पाडले ते घरटे.’ मी आणखी काही विचारले नाही. झालेली घटना माझ्या मनाला खूप अस्वस्थ करून गेली. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. झोप उडणे म्हणजे काय याचा मी अनुभव घेतला. त्या बिचार्या पक्षांची अवस्था त्यांनाच ठाऊक. त्यांच्यासाठी मी काय करू शकत होतो? त्या मुलाला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे माझे कर्तव्य होते. ते मी केले.
पुढल्या पावसाळ्यात या पक्षांची जोडी मला आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीपाशी घुटमळताना दिसली. एग्झॉस्ट फॅन साठी असलेल्या रिकाम्या झरोक्याजवळ ते निरीक्षण करीत असावेत. दुसर्या दिवशी चोचीत हिरवे पान घेऊन पहिले पान अडकविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु झाला. काही वेळा ते पान बाहेर, तर काही वेळा स्वयंपाकघरात पडू लागले. झरोका आरपार असल्याने पान नीटपणे बसणे कठीण होते. त्या दिवशी सायंकाळी मी ठरविले की यांना मदत करूया. प्रश्न होता. ते आपला हस्तक्षेप स्वीकारतील का? दुसर्या दिवशी सकाळी ते नक्की परत येणार असे वाटत होते. झरोक्यातून पान पडू नये यासाठी मी त्यांना आडोसा निर्माण करून देऊ शकत होतो. मी पुठ्ठा घेऊन स्वयंपाकघराच्या बाजूने चिकटविला. त्यांची या बदलाला हरकत नव्हती असे दिसले. त्या दिवशी अनेक प्रकारे पान रचण्याचे प्रयोग झाल्यावर त्यांना यश आले. चार दिवसात घरटे बांधून पूर्ण झाले. त्यांच्या कामाच्या वेळी त्यांना भिती वाटणार नाही याची खबरदारी आम्ही जाणीवपूर्वक घेतली. अचानक मिळालेल्या आडोशाला आपत्ती न समजता त्यांनी संधी म्हणून त्याचा उपयोग केला. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. काही दिवसांनी पिलांचा आवाज येऊ लागला. नंतर त्यांना झेप घेण्याचे व पंख फडफडविण्यावे प्रशिक्षण दिले गेले. पुढील पंधरा दिवसात घर रिकामे झाले. पक्षांची ये-जा थांबली. एक आवर्तन पूर्ण झाले. या घटनेमुळे मला खूप बरे वाटले.
त्यानंतरच्या पावसाळ्यात पक्षांची एक जोडी जागेच्या शोधात याच ठिकाणी घुटमळू लागली. बहुतेक त्यांना जागा पसंत पडली होती, कारण नवी पिले जबाबदारी पेलण्यासाठी भरारी घेत उडून गेल्याचे आम्हाला काही दिवसांनी दिसले. अशी चार आवर्तने पूर्ण झाली. नंतर कधी या जागेच्या शोधात पक्षी आले नाहीत. मदत आपल्याला लागते तशी पशु-पक्षांनाही लागते. निदान त्यांच्या कामात अडथळा येऊ न देणे याची खबरदारी आपण घेऊ शकतो. आजही टेरेसवर येणारी दोन कबुतरे माझ्या तळहातावरील तांदूळ निर्धास्तपणे खात असतात. पण आधी बोटांच्या पेरांवर चोच मारून धोका नसल्याची खात्री न चुकता करतात. सहनिवासात (Society) राहणार्यांशी सलोखा ठेवताना या पाहुण्यांचा सहवासही किती प्रेरणादायी असतो नाही का? सहजीवन म्हणजे आणखी काय असते?
— — रविंद्रनाथ गांगल
Leave a Reply