दोन दशकांपूर्वी एके दिवशी मी माझ्या चार मित्रांसोबत सहलीला गेलो होतो. आम्ही सर्वांनी स्वतःसोबत एक जोड कपडे, टॉवेल आणि जेवणाचा डबा इतकंच सामान घेतलं होतं. त्या दिवशी सकाळी बरोबर अकराच्या सुमारास आम्ही केळवा स्टेशनवर पोहचलो. तेथून बाहेर पडत केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या एस. टी.त बसलो. त्या एस. टी.त आमच्यासारखेच सहलीला आलेले कितीतरी तरुण जोडपी, लहान मुलं, तरुण – तरुणी आणि म्हातारी माणसेही होती. एस. टी. त एक सुंदर तरुणी माझ्या शेजारी बसली. तिने परिधान केलेल्या टाईट फिट जीन्स आणि टी.शर्ट मुळे ती अधिकच रेखीव दिसत होती. डोक्यावरील केसांचं ओझं कमी केल्यामुळे तिचा टवटवीत गुलाबी चेहरा अधिकच रेखीव दिसत होता. एस. टी. त ती मला जरा जास्तच खेटून बसल्यामुळे तिच्या खांद्याचा उबदारपणाही मला जाणवत होता. मधून मधून आम्ही दोघे एकमेकांकडे चोरून पाहात होतो. सहलीला टाईमपास करायला एक निमित्त भेटलं म्हणून मी मनातल्या मनात जाम खुश होत होतो. माझ्या इतर मित्रांनीही आप-आपला टाईमपास शोधून ठेवला होता.
एस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू लागलो. भर उन्हातही अंगाला गार गार स्पर्श करणारी हवा तिथे सुटली होती. त्या गार गार हवेचा आनंद घेत उल्हसित होत चालता – चालता आम्ही ज्या तरुणींचा पाठलाग करण्याचे ठरविले होते त्यांच्यापासून कधी दुरावलो ते कळलेच नाही. त्या विशाल समुद्र किनाऱ्यावर त्यांना शोधणे अवघड होते पण अशक्य नक्कीच नव्हते. पण त्यांना शोधण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा मोक्याची जागा बघून समान ठेवले आणि तेथेच खाली वाळूत बसलो. तेथेच जवळच असणाऱ्या चणेवालीकडून पाच – पाच रुपयांचे चणे घेऊन ते मोजून खाऊ लागलो. चणे मोजून खात असताना आमची नजर एका सडपातळ तरुणीवर स्थिरावली. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तिने खांद्यावरून खाली सोडलेले मोकळे लांब केस आणि परिधान केलेला पिवळा पंजाबी ड्रेस यात ती माझ्या स्वप्नातील परी दिसत होती. तिच्यासोबत दोन पांढऱ्या रंगाचे सुंदर छोटे कुत्रे होते. त्या दोन कुत्र्यांच्या गळ्यातील पट्टे तिच्या दोन हातात होते. ती जसजशी आमच्या दिशेने जवळ येत होती तसे आमच्या हृदयाचे ठोके जलद होत होते. आमच्यापासून हाकेच्या अंतरावर येऊन ती थांबली आणि कुत्र्यांसह एका माडाच्या सावलीत बसली. समुद्राच्या विस्तीर्ण लाटांकडे ती एक टक पाहात होती, जणू ती त्या समुद्राला आपल्या नाजूक डोळ्यात सामावून घेत होती. मी मधून मधून तिच्याकडे चोरून पाहात होतो. ती लाटांकडे एक टक पाहत असताना तिचे केस हवेत उडत होते. आणि तेंव्हाच तीच ते अप्रतिम सौंदर्य मी डोळ्यात साठवून घेत होतो. मला तिचा हेवाही वाटत होता कारण या मनोरम आणि सुंदर समुद्र किनाऱ्याचा सहवास तिला ला रोजच लाभत असणार ! रोज ती अशीच समुद्र किनाऱ्यावर बसून समुद्राच्या अथांगतेचा अनुभव घेत असणार ! रोज समुद्राच्या लाटांसोबत खेळून उल्हासित होत असणार ! रोज समुद्रात क्षितिजाजवळ होणारा सूर्यास्त जवळून पाहात असणार ! पौर्णिमेच्या चांदण्यात याच समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा आम्हाला स्वप्नवत वाटणारा आनंदही ही ती घेत असणार ! आणि आम्ही दुर्दैवी आम्हाला समुद्र जवळून पाहण्यासाठी सहल काढावी लागते मुंबईत राहत असताना दुर्दैवाने .
त्या तरुणीकडे बराचवेळ मंत्रमुग्ध होऊन पाहिल्यावर माझ्या मित्रांना समुद्राच्या लाटांसोबत खेळण्याची हुक्की आली. त्यावर मी त्यांना म्हणालो,” तुम्ही जा ! मी येथेच बसून आपलं सामान सांभाळतो. पण ते माझेच मित्र ! त्यांनी माझ्या मनातील डाव ओळखला. आमच्यापैकी एक जण त्या तरुणीला तिच्या जवळ जाऊन म्हणाला, आमच्या वस्तुंकडे जरा लक्ष ठेवशील का ? तिने गालात गोड हसून मानेनेच होकार दिला. ती हसल्यावर तिच्या गालावर पडलेले सुंदर खळी मला चोराविशी वाटत होती. थोडावेळ समुद्राच्या लाटांसोबत खेळून मी मित्रांना तेथेच सोडून पुन्हा आमच्या सामानाजवळ येऊन बसलो आणि एक टक तिच्याकडे पाहात राहिलो. मधून मधून तीही माझ्याकडे पाहून मनातल्या मनात हसत होती. मी तिच्या जवळ जाऊन तिच्याशी गप्पा मारण्याचा मनात विचार केलाच होता इतक्यात माझे मित्र माघारी आले. पाण्यासोबत खेळून भूक लागल्यामुळे पटापट डबे बाहेर काढले. डबा वाटून खाताना खास पदार्थ तिच्यासाठी एका डब्याच्या झाकणात काढलाच होता. तो तिला देणार इतक्यात दोन भरजरी वस्त्रे परिधान केलेल्या तरुणी तिच्याजवळ आल्या आणि तिला आपल्या सोबत घेऊन गेल्या . ती चालताना मागे वळून वळून पहात होती. आम्ही आमचे जेवणाचे डबे आवरून बॅग खांद्याला लावली आणि समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारायला सुरुवात केली. फेरफटका मारत आम्ही आम्हाला एस. टी. त भेटलेल्या तरुणी जेथे बसल्या होत्या तेथे पोहचलो. एस. टी. त माझ्या बाजूला बसलेली तरुणी सारखी माझ्याकडे पाहत होती. पण नराहून माझ्या डोळ्यासमोर सारखा त्या तरुणीचा चेहरा येत होता. कळत नकळत मी तिच्या प्रेमात पडलो होतो. मी त्याच समुद्र किनाऱ्यावर तिच्यासोबत चालण्याचे स्वप्न मनात रंगवू लागलो होतो. मी तिच्या नुसत्या स्मरणाने व्याकुळ होत होतो. आता माझे पाय आणि अंतःकरण दोन्हीही जड झाले होते. माझा उत्साह हवेत विरल होऊ लागला होता. अचानक ती समोरून जाताना दिसली तिच्या हातात कुत्र्यांच्या पिल्ला ऐवजी खांद्यावर मोठं गाठोडं होतं. त्या गाठोड्याच्या वजनाने ती किंचित वाकली होती. त्या भरजरी वस्त्रे परिधान केलेल्या तरुणी तिच्या मागून त्या कुत्र्यांच्या पिल्लांसह चालत होत्या. चालताना तिने मधेच माझ्याकडे वळून पाहिले ! आता तिचे डोळे पाणावलेले होते. तिचे पाणावलेले डोळे मला काहीतरी सांगत होते. तिचं अप्रतिम सौंदर्य पाहून मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण तिला या मोलकरणीच्या रुपात पाहून माझ्या पायाखालची जमिन सरकली होती. ती कदाचित माझ्याकडे एक आश्वासक साथ मागत होती. पण बघता बघता माझ्या नजरेसमोरून ती ओझर झाली. आता तेथे थांबण्यात काही अर्थ नव्हता आता माझा उत्साहही समुद्राच्या लाटांसारखा शांत झाला होता. अंतःकरण जड झाले होते .
पक्षी जसे संध्याकाळ झाल्यावर आपल्या घरट्याकडे परततात. तसे आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो. पण आज कित्येक वर्षांनंतरही कोणत्याही समुद्र किनाऱ्यावर गेलो असता मला तिची आठवण आल्या शिवाय राहत नाही… इतकं माझं तिच्यावरील प्रेम माझ्या हृदयात खोलवर रुतलेले होते… आजही…
लेखक – निलेश दत्ताराम बामणे
202, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए ,बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
मो. 8692923310 / 8169282058
Leave a Reply