नवीन लेखन...

सहस्त्र ‘सूर्य’दर्शन

आम्ही टीव्ही घेतला १९८५ साली. तेव्हा दूरदर्शनवर तिसरा डोळा, दामिनी, घरकुल अशा मोजक्याच मालिका असायच्या. त्यातूनही संध्याकाळी साडेसहा वाजले की, ‘आमची माती, आमची माणसं’ हा गप्पागोष्टींचा कार्यक्रम आम्ही न चुकता पहायचो. त्यातील सहभागी कलाकार राजा मयेकर, माया गुर्जर, जयंत ओक, पांडुरंग कुलकर्णी, मानसिंग पवार यांच्यापेक्षाही लक्षात राहिले ते ‘वस्ताद पाटलां’च्या भूमिकेतील रवी पटवर्धन!
डोक्याला फेटा, झुपकेदार मिशा, करारी नजर, अंगात फुल सदऱ्यावर जाकीट, खाली धोतर व पायात कोल्हापुरी चपला असा हा ‘वस्ताद पाटील’ नंतर अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून पडद्यावर पाहिलेला, पंधरा वर्षांनंतर प्रत्यक्षात आम्हाला आमच्या ऑफिसवर येऊन भेटला!!
त्याचं असं झालं. रवी सरांना ‘एकच प्याला’ नाटकाची पेपरसाठी जाहिरात करुन हवी होती. त्यामध्ये सर सुधाकरची भूमिका करायचे. त्यांना मिळालेल्या पत्त्यावरुन आम्हाला शोधत ते ऑफिसवर आले. त्यांना प्रत्यक्षात समोर पाहून अतिशय आनंद झाला. आम्ही काम समजून घेतलं व त्यांना बरोबर घेऊन ऑफिस जवळील ‘लज्जत’ हाॅटेलमध्ये गेलो. खाणे व चहापाणी झाले. तेथील वेटर्सनी सरांना ओळखले. त्यांच्या नजरेत सरांबद्दल अपार कौतुक होते. आम्ही रवी सरांशी गप्पा मारत होतो. सर मोकळेपणाने बोलत होते…
‘तेजाब’ चित्रपटात रवी सर वकील झाले होते. न्यायालयातील पिंजऱ्यात अनिल कपूर होता. सरांना रंगमंचावरील अनुभवामुळे वकीलाचा मोठा संवाद सलगपणे बोलण्यात कोणतीच अडचण नव्हती. अनिल कपूरचे मात्र रिटेकवर रिटेक होत होते. शाॅट संपल्यावर अनिलने रवीजींना आदरपूर्वक नमस्कार करुन दिलगिरी व्यक्त केली.
एन. चंद्राच्या ‘अंकुश’, ‘तेजाब’, ‘नरसिंह’ व ‘प्रतिघात’मध्ये रवीजींनी काम केलेले आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्वच असं आहे की, पोलीस कमिशनर, वकील, न्यायाधीश किंवा खलनायकाच्या भूमिकेत ते ‘परफेक्ट’ बसतात. जब्बार पटेलांच्या ‘उंबरठा’, ‘सिंहासन’ मध्ये त्यांनी छोट्या भूमिकेतूनही आपली छाप पाडली आहे. धमाल विनोदी चित्रपट ‘बिनकामाचा नवरा’ मध्ये मधु कांबीकरचे वडील व कुलदीप पवार यांच्या सासऱ्याची भूमिका करताना त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसविले आहे.
त्यांचं हिंदीमधील काम पाहून साऊथच्या काही निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात रवी सरांना घेतलं. तिकडे कलाकारांना सन्मानानं वागवलं जातं, हे त्यांनी आवर्जून सांगितले. तिथं वेळेला फार किंमत दिली जाते. सेटवर गेल्यानंतर पूर्वनियोजन पद्धतीने कमीतकमी वेळात कलाकाराकडून जास्तीतजास्त काम करवून घेतात. व्यवहार चोख असतो. आदरातिथ्य करण्यात ते निर्माते कुठेही कमी पडत नाहीत. कलाकारांच्या आवडी निवडी सांभाळतात. विमानतळावर उतरल्यापासून पुन्हा विमानतळावर सोडेपर्यंत युनिटचा एक माणूस चोवीस तास कलाकाराच्या दिमतीला हजर असतो.
त्या ‘एकच प्याला’च्या कामानंतर रवी सरांना मी भेटलो, ‘तुझे आहे तुजपाशी’च्या रंगमंचावर, रवीजी काकाजींच्या भूमिकेत व ‘सुंदर मी होणार’ या पु. ल. देशपांडेंच्या नाटकाच्या निमित्तानं. त्यानंतर सरांनी काही वर्षे काम केले नाही. आत्ता ते ‘अरण्यक’ नाटकात व ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत दिसले. वयाच्या त्र्यांशीव्या वर्षीही त्यांचा काम करण्याचा उत्साह दांडगा आहे. त्याला कारणही तसंच आहे….
६ सप्टेंबर १९३७ हा रवी सरांचा जन्मदिन. १९४४ साली अखिल भारतीय मराठी नाट्य महोत्सवातील एका बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या रवीने पहिली भूमिका केली. तीच रंगमंचाची आवड त्यांनी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील नोकरी करतानाही जोपासली. १९६४ पासून ते आजपर्यंत दिडशेहून अधिक नाटकांमध्ये व दोनशेहून अधिक चित्रपटांतून व हेमामालिनी निर्मित ‘तेरा पन्ने’ व मराठी मालिका ‘महाश्वेता’ मध्ये त्यांनी काम केले आहे.
१९६५ साली ‘भाऊबंदकी’ या नाटकात काम करताना रवीजींना नटवर्य नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे, मा. दत्ताराम, दाजी भाटवडेकर, दुर्गा खोटे अशा दिग्गजांचा सहवास लाभला आहे.
वयाच्या सत्तरीनंतर विस्मरण होण्याचा आजार कित्येकांना होतो. रवीजींनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले व त्या विषयाचा सखोल अभ्यास केला. त्यामुळेच १९७४ ला केलेली धृतराष्ट्राची भूमिका, पंचेचाळीस वर्षांनंतरही त्याच ताकदीने ते साकारत आहेत…
वयाच्या एक्यांशीव्या वर्षी आयुष्यभरातील एक हजार पौर्णिमा पूर्ण झाल्याबद्दल आपल्याकडे ‘सहस्त्रचंद्र दर्शन’ सोहळा करण्याची परंपरा आहे, रवी पटवर्धनांच्या नावातच रवी, म्हणजे तेजाळणारा ‘सूर्य’ आहे… मग त्यांचे एकदाच नव्हे तर अनेकदा ‘सहस्त्र’रवी’ दर्शन’ व्हायलाच हवं, नाही का?
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१२-१०-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..