सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुकास्तरावरच साहित्य संमेलन दिनांक १६ व १७ फेब्रूवारी असे दोन दिवस साजरं होतं आहे, त्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
मला आता पर्यंत कोणत्याही साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची संधी मिळालेली नाही. माझी खूप इच्छा होती, की किमान एकदा तरी साहित्य संमेलन कस असते ते पहाव म्हणून, परंतु अद्याप तो योग काही आलेला नाही. वेन्गुर्ल्यातही यायची इच्छा आहे, प्रयत्नही चालू आहेत, परंतु पाहू कस जमतंय ते..!
साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना आणि परंपरा मला वाटत फक्त मराठी भाषेतच असावी. देशातील अन्य कोणत्या भाषांची संमेलन भरत असतात किंवा नाही, याची मला नीटशी माहिती नाही. मराठीत साहित्य संमेलने भरवणे ही परंपरा असल्यानेच कदाचित मराठी जनमानसावर याचा खूप चांगला परिणाम झालेला दिसतो. मराठी माणूस देशातील इतर कोणत्याही प्रांतातल्या माणसापेक्षा जास्त विचारी आहे, संकुचित नाही याच्या मागे असलेल्या अनेक कारणांपैकी नित्य नेमाने भरणारी साहित्य संमेलने हे ही एक कारण असू शकेल अशी माझी खात्री आहे.
साहित्य आणि समाज यांचा नेमका काय संबंध असतो याचा विचार माझ्या मनात फार पूर्वीपासून येत असत. अगदी मला कळायला लागले तेंव्हापासून पेपरातून साहित्य संमेलन, त्यांच्या गाजणाऱ्या निवडणुका, त्यात होणारे विविध ठराव, संमेलनाचे नामवंत अध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि त्यांची भाषणे इत्यादी बाबी माझ्या कुतूहलाचा भाग असत आणि त्याचा नकळतचा परिणाम माझ्या विचारांवर झालेला आहे. तरीही अशी साहित्य संमेलने भरवण्याचा नेमका हेतू काय असावा आणि त्याचा समाजावर काय परिणाम किंवा समाजाला त्याचा काय उपयोग होत असावा हे कळण्यासाठी पुढे खूप वर्ष जावी लागली आणि जेंव्हा अलीकडे हे समजू लागले तेंव्हा लक्षात आल, की साहित्य आणि समाज ह्या दोन्ही एकाच अंगाच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याला आणि एकमेकाशिवाय एकमेकाला पर्याय नाही.
साहित्य आणि समाज यांच्या नात्याची विण फार घट्ट असते. ती नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही किंवा तिची व्याख्याही करता येत नाहीया दुपेडी विणीचा एकमेकावर परिणाम होत असतो. ही हळू हळू परंतु निश्चीतपणे घडणारी प्रक्रिया असते. ह्या प्रसंगी साहित्य म्हणजे फक्त लेखन किंवा कविता अभिप्रेत असली, तरी मी कोणत्याही कलाविष्काराला साहित्य मानतो. पांढऱ्या कागदावर काळ्या शब्दांतून आपलं म्हणण मांडणारे, ते साहित्यिक अशी व्याख्या सर्वसाधारणपणे केली जाते. परंतु माझ्या मते चित्रकारही साहित्यिक असतो, शिल्पकारही साहित्यिक असतो किंवा नाट्य-चित्रपटांच्या माध्यमातून व्यक्त होणारे रंगकर्मीही साहित्यिकच असतात. फरत असतो ततो फक्त त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धातीत. लेखक कवी त्याचं म्हणनं मांडण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो, तर चित्रकार चित्रांतून, शिल्पकार शिल्पातून आणि रंगकर्मी नाटक-चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. हे सर्व साहित्यिकच. एवढाच कशाला आता लुप्त होत चाललेली कर्तन आणि भारुड गणरेही साहित्यिकच, कीर्तनकार, शाहीर यांनी यांचा सुदृढ समाज घडवण्यात मोलाचा वाट होता हे विसरून चालणार नाही..समाजाच्या विचारांवर या सर्व साहित्यिकांच्या विचाराचा खोल ठसा उमटत असतो.
साहित्यिक काही आकाशातून येत नाहीत. कदाचित त्यांची प्रतिभा हे देवाघरच देणं असेलही, परंतु साहित्यिक असतात समाजाचाच हिस्सा. समाजात चालणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे आनंदीत किंवा व्यथित होऊन तो त्या बऱ्या – वाईट गोष्टीवर व्यक्त होत असतो. त्याच तसं व्यक्त होणं, म्हणजे साहित्य असं मी समजतो. साहित्यिकाने समाजात वावरताना समाजाचं सूक्ष्म निरीक्षण करून समाजाला एक विचार देणं अपेक्षित असतं, नव्हे, ती त्याची जबाबदारी असते.
साहित्यिक हा शेवटी माणूसच असल्याने, मानवी भाव भावना त्यालाही असतात, परंतु समजाच्या एखाद्या न पटलेल्या गोष्टींवर व्यक्त होताना आपल्या वैयक्तिक भाव-भावना प्रसंगी बाजूला ठेवाव्यात अशी अपेक्षा असते, किमान माझी तरी आहे. साहित्यिकाने प्रथम समाजाचा विचार केला पाहिजे. समाजाला दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. टीका करताना सभ्यतेची पातळी सोडू नये, तशीच ती टीका मुद्द्यांवर असावी, वैयक्तिक नको. चांगल्याचं कौतुक करताना, तो माझा माणूस नाही, असं म्हणून हात आखाडताही घेता कामा नये. विस-पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या समाजात ही प्रक्रिया घडत असे. त्याहीपूर्वी आणीबाणीत अश्या अनेक साहित्यिकांनी तत्कालीन सरकारच्या दडपशाहीचा निषेध करून ते ठामपणे त्याविरुद्ध उभं राहिल्याचं वाचायला मिळत. त्याकाळीही सरकारची तळी उचलणारे साहित्यिक होते, नाही असं नाही, परंतू ती संख्या अगदी नगण्य होती. आज मात्र हे चित्र नेमकं उलट होत चाललं आहे आणि हे समाजाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
सध्याचा आपला साराच समाज जास्तीतजास्त राजकारण केंद्रित होत चालला आहे. कोणत्यातरी गटात किंवा समूहात सामील होण्याशिवाय गत्यंतरच नाही की काय, असं वाटावं अशी सारी परिस्थितीत आहे. समाजकारण हा शब्द केवळ राजकारण्यांच्या भाषणातून टाळ्या घेण्यापुरता उरला आहे. संपूर्ण समाजच ‘मी आणि माझं’ या मंत्राचा नामजप करताना दिसतो आहे. आणि अशाच ग्लानिर्भवती प्रसंगी समाजाला भानावर आणण्याचं काम करण्याची जबाबदारी साहित्यिकांची असते. परंतु आजचे साहित्यिक ही जबाबदारी नेमकेपणाने पेलताना दिसत नाहीत अस माझं निरीक्षण आहे. ‘मी आणि माझं’ याची लागण प्रतीभावंतानाही झालेली आहे की काय, असं वाटावं अशी सारी परिस्थिती आहे.
साहित्यिकाने तटस्थपणाने समाजच्या दुखण्यावर बोट ठेवण अपेक्षित असते. परंतु असं होणं दूरच, अनेक साहित्यिक किंवा प्रतिभावात कोणत्यातरी एका बाजूची तळी उचलताना दिसतात. तळी उचालायचीच असेल तर ती मग इष्ट गोष्टीची उचलावी आणि अनिष्ट गोष्टीला आपल्या साहित्यातून झोडपून काढावं येवढीच साधी अपेक्षा आहे. परंतु तसं न होता वैक्स्तिक स्वार्थाच्या मोहाला साहित्यिकही बळी पडत असतील, तर मात्र समाजाला कोणीच वाली उरला नाही, असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल. अर्थात, सर्वच साहित्यिक असे नसावेत, परंतु असे नाहीत ते अल्पसंख्य असल्याने त्यांचा आवाज क्षीण पडत असावा. साहित्यिकांनी न्युट्रल राहणे अपेक्षित असते आणि सध्याच्या युगात ते कठीण असलं तरी अशक्य नाही. मात्र त्यासाठी हवी स्वार्थावर पाणी सोडण्याची तयारी. देव प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शनासाठी येऊ शकत नाही आणि म्हणून त्याने काही व्यक्तींना प्रतिभा देऊन पाठवलंय, ते त्याचं काम कण्यासाठी याचं भान प्रत्येक साहित्यिकाने बाळगायला हवं.
आपल्या महाराष्ट्राला त्यागाची मोठी परंपरा आहे आणि त्यात साहित्यिकांच योगदान मोठं आहे. आजच्या प्रत्येक साहित्यिकाने त्या परंपरेच भान आणि मान ठेऊन वागायला हवं, अशी माझी अपेक्षा आहे. ज्यात समाजाच भलं असेल त्याच गोष्ट अधोरेखित केल्या पाहिजेत. नेहेमीच काही सत्ताधाऱ्यांविरुद्ध उभं राहण्याची गरज नाही, परंतु सत्ताधारी वैचारिकदृष्ट्या आपल्या कितीही जवळचे असले आणि त्यांची एखादी गोष्ट जर समाजाला धोक्यात घालणारी असेल, तर अशा प्रसंगी मात्र साहित्यिकाने आपल्या सर्व शक्तीनिशी त्या अनिष्ट गोष्टीवर आपल्या साहित्यातून तुटून पडले पाहिजे. मग त्यांना काय वाटेल, माझ काय होईल याचा यत्किंचितही विचार करू नये.
ज्या वेंगुर्ल्यात आज हे साहित्य संमेलन साजरं होत आहे, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. मायनिंग आहे, जैतापूर अणुउर्जा आहे आणि येऊ घातलेली रिफायनरी आहे. यावर तरी स्थानिक साहित्यिकांनी आपापलं म्हणणं तटस्थपणे आणि सडेतोडपणे मांडायला हवं. ते मांडताना कोणाला वाईट वाटेल किंवा कोण आनंदित होईल याचा विचार न करता, फक्त आणि फक्त समाजाच्या भल्याचा विचार असायला हवा. मी मुंबईत असल्याने, जिल्ह्यात असे होते की नाही ते मला माहित नाही, होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे आणि तसं होत नसेल तर मात्र चिंता करण्याची परिस्थिती आहे, असं मी म्हणेन. साहित्यिकातं मतभेद असू शकतात, ते तसे असावेतही, परंतु ते समाजाच्या भल्यासाठी असावेत, वैयक्तिक फायद्यासाठी नकोत. देवाने साहित्यिकाला जी प्रतिभा दिली आहे, ती देण्यामागे देवाचा हेतू, त्याने या समाजाचं भलं कराव, स्वतःचं नाही, हाच असू शकतो, याचं भान साहित्य क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. असं होत असेल तर साहित्य संम्मेलन ‘संपन्न’ झालं असं म्हणावं लागेल;अन्यथा ते ‘साजरं’ होतं असंच म्हणावं लागेल.
समाजाच्या भल्यासाठी एक ठाम भूमिका घेउन साहित्यिकाने उभं राहायला पाहिजे, कारण ते समाज आणि साहीत्यिक एकमेकावर अवलंबून असल्यामुळे, समाज संपला तर साहित्य लयाला जाण्यास वेळ लागणार नाही. निदान स्वतःच्या अस्तित्वासाठी तरी समाज टिकला पाहिजे आणि तो तसा टिकवण्याची आद्य जबाबदारी साहित्यिकाची असते. निदान सिंधुदुर्गात तरी ह्या प्रक्रियेने गती पकडो अशी अपेक्षा संमेलनाच्या निमित्ताने व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो..
— नितीन साळुंखे
९३२१८११०९१
Leave a Reply