जीवनामध्ये अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते. या लेख मालिकेत मी फक्त मला लाभलेला साहित्यिक सहवास या बद्दलच्या आठवणी लिहीत आहे. माझ्या अगदी वयाच्या 10 व्या वर्षांपासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे 60 वर्षांच्या आठवणी मनात घर करून आहेत. अगदी बालपणी प्रवचनकार , कीर्तनकार , अनेक सांस्कृतिक , धार्मिक कार्यक्रमातून ऐकलेले , प्रत्यक्षात भेटलेले सर्वच दिगग्ज , मान्यवर आठवतात.. किती आणि कुणाकुणाची नावे लिहावीत याच संभ्रमात मी आहे. पण या सर्वच विविध क्षेत्रातील मंडळींचा सहवास जीवनात काहीतरी शिकवून गेला , जगण्याची उमेद देवून गेला हे मात्र खरे.
घरी जरी गरीबीची परिस्थिती होती तरी उत्तम संस्कार , उत्तम सहवास , उत्तम शेजारी , उत्तम मित्र लाभल्यामुळे आत्मिक समाधान लाभले.
प्राथमिक शाळेतील गुरुजन , माध्यमिक शाळेतील तसेच महाविद्यालयीन कालावधीतील सर्व गुरुजन प्राध्यापक मार्गदर्शक आठवतात. आमच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दरमहा लिहिले जाणारे हस्तलिखित मासिक तसेच इयत्ता 9 वीत असताना आलेले बालकवी कै. शरद मुठेही आठवतात. त्यांनी सादर केलेली गीते हे सारे आठवते .अशा अनेक कार्यक्रमातून मला साहित्यात रुची निर्माण झाली .
घरात आईवडील सुशिक्षित असल्यामुळे त्यांचेही मार्गदर्शन लाभले. हळू हळू मी स्वतः लिहिण्याचा प्रयत्नही करू लागलो. माध्यमिक शाळेचे म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक तसेच *गुरुवर्य प्राचार्य कै. दा. सी देसाई तर मनांत आजही घर करून आहेत.* त्यांनीही माझ्या काव्यसंग्रहाला दिलेली आशीर्वादपर प्रस्तावना ही अत्यन्त वाचनिय आणि चिंतन , मनन करण्यासारखी आहे. पुढे त्यांचा माझा खुपच घनिष्ठ संबंध आला. *आज ते हवे होते असे मात्र मनाला वाटते.*
त्यांच्या सारख्या विद्यार्थीप्रिय शिक्षकाबद्दल लिहीण्यास शब्द अपुरे पडतात. पण त्यांची आठवण पदोपदी येते. मी मुंबईत असताना ते कीर्ती कॉलेजला प्रिन्सिपल होते. त्यावेळी देखील रविवारी मी त्यांच्याकडे मुद्दाम जात असे.
कै. गुरूवर्य प्राचार्य दा.सी. देसाई (उत्तम शिक्षक , उत्तम अभ्यासू व्याखाते , साहित्यिक , कवी ) . त्यांच्या काही देशभक्तीपर रचना गीतबद्ध झालेल्या आहेत. दा.सी. देसाई सरांनी माझ्या पुस्तकाला दिलेला *तथास्तू* हा आशीर्वाद म्हणजे माझ्या अंत:करणातील सुखद समृद्धी आहे.
हा आशीर्वाद सर्वांनी वाचण्यासारखा आहे. त्यातील काही थोडासा भाग मी मुद्दाम इथे देत आहे. ” विद्यार्थी आपल्या शिक्षकाबद्दल जाणीव ठेवतात ही माझ्या सारख्या शिक्षकाला समाधानाची बाब आहे. कुठल्याही मोजदाद मानदंडानी माणसाचं समाधान , सुख , ऐश्वर्य मोजले जाणार नाही अशी सर्वोच्य सुखदा शिक्षकाला लाभते ती विद्यार्थ्यांमुळे..!! *विगसा* सारखे विद्यार्थी आपल्या कृतज्ञता भावनेने माझ्यासारख्या शिक्षकांचे जीवन कृतार्थ झाल्याचे समाधान मिळवून देतात . त्यांना आशीर्वाद देतांना “बाळा होवू कशी उतराई । तुझ्यामुळे मी झाले आई ।” हेच आईचे काव्यउद्गार अंत:करणात प्रतिध्वनित होतात आणि आशीर्वाद द्यावासा वाटतो.”
“कवी श्री वि.ग.सातपुते. आपण कवी आहात ! कविराज व्हा.! कविश्रेष्ठ व्हा.!!” जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणीजात! तथास्तू.
प्राचार्य दा.सी. देसाई* यांचा हा आशीर्वादच मला सातत्याने लिहिरा ठेवत आहे. मी लिहीत आहे.
पुढे तर माझ्या कुंडलीतच माझ्या वडिलांच्याच / काकांच्याच मुद्रण व प्रकाशन व्यवसायात कार्यरत रहाण्याचा योग होता. त्यामुळे जी पुस्तके छापली / प्रकाशित केली गेली. त्यांचे प्रूफरिंडिंग करता करता मला शब्दांचे ज्ञान झाले , जाणीव झाली आणि साहित्यिकांचा सहज सहवास लाभला.
आज मी जे काही थोडेसे लिहितो आहे, हे अशा लाभलेल्या दैवी सहवासाचं फलित आहे हे मात्र निश्चित..
इदं न मम!
वि.ग.सातपुते
9766544908
(पुणे मुक्कामी)
Leave a Reply