साहित्य सारस्वतांच्या सहवासात राहण्याची संधी लाभणं! त्यांच्या गाठीभेटी होणं! त्यांचे मार्गदर्शन लाभणं! हे एक विलक्षण भाग्य असतं हा माझा स्वानुभव. ज्यांनी माझे पूर्वायुष्य ( बालपण ) पाहिले त्या सर्वानाच आजचे माझे साहित्य क्षेत्रातील अस्तित्व म्हणजे एक अघटित न घड़णारी गोष्टच वाटत असणाऱ हे खरे! एवढंच काय मलाही हे आश्चर्य वाटते. मलासुद्धा वडिलांच्या,चुलत्यांच्या सोबत काम करताना त्याच वडिलोपार्जित व्यवसायात मी साताऱ्यातच राहीन असे वाटले होते. पुढे जीवनाला एकदम कलाटणी मिळाली हे सत्य. परंतु ज्येष्ठ कवयित्री कै. शांताबाईं शेळके यांनी माझ्या आत्मरंग काव्यसंग्रहाला दिलेल्या प्रस्तावनेतच विग. सातपुते यांच्यातील साहित्य बीजांकुराची मशागत ही त्यांच्या शिशु ,शैशव व पौगण्ड अवस्थेतच सुरु झाली असा उल्लेख केला आहे. हेही खरेच!
आम्ही सर्वच मित्र सर्वसामान्य परिस्थितित घड़लो. अगदी सहज आनंद जसा घेता येईल तसा घेत राहिलो. त्यावेळी टूरिंग टॉकीज, ओपन थिएटरमध्ये सिनेमा,नाटक सगळे पहायचो नंतर बंदिस्त थिएटर देखील आली. शाहुकला मंदीर तेंव्हा ओपन थियेटर होते. तिथे लागलेली सर्वच्या सर्व नाटके तर फुकट पाहिली. त्यासाठी रंगमंदीराची व्यवस्था, बैठका टाकणे वगैरे करावी लागे, तीही आम्ही करीत असू. पण आनंद लूटत असू हे मात्र खरे.
माझा बालमित्र अशोक देसाई (बाळ देसाई) हरहुन्नरी व्यक्तिमत्व. अभ्यासात हुशार, गाणे, नाटकात काम करणे, चित्रकारही, मेळ्यात काम करणे. मी त्याच्या सोबत असे. त्याच्यामुळे मला मेळ्यात देखील काम करु लागलो, आम्ही गायलो, नाचलो देखील! दोघांचीही परिस्थिती अगदी बेताची,पण घरचे संस्कार उत्तम.
मेळ्यात काम केले की पैसेही मिळत असत. बक्षीस म्हणून कथलाचे बिल्ले मिळत. पैशाची गरजही असे. परिस्थितिनं आम्ही घड़लो हे मात्र खरे. पुढे हाच बाळ देसाई महिंद्रा अँड महिंद्रा सिंटर्ड कंपनीचा स्वकर्तुत्वाने डायरेक्टर झाला. ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट. अनेक गोष्टी आठवतात,लिहाव्याही वाटतात!
पण निश्चितच जीवन अशा सहवासाने समृद्ध घडले.
बालपण हे निरागस असते.मी व बाळ देसाई तर मेळ्यात “जय जय महाराष्ट्र माझा, विंचु चावला रे विंचु चावला,रमया वतावया रमया वतावया या गाण्यावर तर त्यावेळी गाजलेल्या मराठी हिंदी गीतावर नाचत असू. एकदा तर शाहूकलामंदीरमध्ये एका राजकमल नावाच्या ऑर्केस्ट्रा मध्ये हिंदी गाण्यावर डान्स चालला होता. ऐन रंगात मी व मित्राने त्या स्टेजवर विनापरवानगी डान्स केला होता. आयोजकांनी त्यावेळी आम्हाला बाहेरही काढले तेही आठवते. तो केवळ एक तरुणपणातील अवखळ हुल्लडपणा होता हेच खरं!
पुढे सातारला बी अँड सी ऑफिसच्या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमा निमित्त कै.ग.दि. माडगुळकर, कै. शंकर पाटील, व द.मा.मिरासदार सरांचा कथाकथनाचा कार्यक्रम झाला होता. तो तर आम्ही मित्रांनी अगदी खाली पुढे बस्करावर बसून ऐकला होता, त्याचे स्मरण आजही आहे. ग्रामीण कथाकार शंकर पाटिल यांची स्टेजवरील पहिलिच एंट्री ..'” ढांग टिक टिक टांग…ढांग टिक टिक टांग ” अक्षरशः पोट धरुन धरुन हसवून लोळवून गेल्याचे तर दमांचीही कथा हसवून गुदगुल्या करून गेल्याचे आठवते तर साक्षात गदीमांनी आई ही कथा सांगून ढसा ! ढसा ! ढसा ! आम्हाला रडविल्याचे आठवीते आहे .!
सातारला शाहुकलामंदीर , न्यू इंग्लिश स्कूलचे प्रेक्षागृह , गांधीमैदान या ठिकाणी झालेल्या अत्यंत सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे म्हणजे कै.पंडित भीमसेन जोशी , कै. सुधीर फड़के यांचे गीत रामायण… तर ब्रिजभूषण काबरा , पंडित शिवकुमार शर्मा ,पंडित झाकिरहुसैन , यांची अविस्मरणीय जुगलबंदी !
किंवा अगदी राजकीय भाषणांचे म्हणजे कै. यशवंतराव चव्हाण , आचार्य अत्रे , ग.वा. बेहरे , शाहिर अमरशेख ,शाहिर साबळे , कॉमरेड डांगे , कै.नानासो.पाटिल (पत्री सरकार) .एडवोकेट व्ही.एन.पाटील , कै.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कै. भाऊकाका गोडबोले, कै. मनोहरपंत भागवत, कै एडवोकेट शंकरराव भिड़े, अशा अनेक ज्येष्ठवृंदांना ऐकता आले.(महत्वाचे कै.क्रांतिवीर नानासो. पाटिल ) हे प्रतापगंज पेठेत आमच्या अगदी समोरच असलेल्या कै.एडवोकेट मनोहरपंत भागवत यांचे कड़े उतरत असत त्यामुळे अशा सिंहाच्या काळजाच्या व्यक्तीच्या सहवासात माझे लहानपण गेले याचाही अभिमान मला आहे .(वास्तव या माझ्या कथासंग्रहात मी कै.क्रांतिवीर नानासो पाटलांच्या आठवणी लिहिल्या आहेत.)
हे सर्व मुद्दाम लिहिण्याचे कारण म्हणजे अशा ऐतिहासिक व्यक्ती मला भेटणं म्हणजे एक अव्यक्त ऋणानुबंध एवढेच मी म्हणेन! प्रत्येक व्यक्तिची आठवण एक कथा आहे आणि इथे लिहिण्यास मर्यादा आहे.
अचानक आज या गोष्टी आठवल्या त्याचे कारण म्हणजे कालच मी डॉ.काशीनाथ घाणेकर हा सिनेमा पाहिला आणि शाहूकलामंदीर मधील अनेक नाट्य प्रयोगांची तसेच अगदी सहज पाहिलेल्या नटनट्यांचीही आठवण झाली.डॉ. काशीनाथ घाणेकरांनाही कित्येक वेळा पाहिले होते. मा.रमेश देव व सीमा देव यांनाही मी सातारा एसटी स्टैंड वरुन जंगू टांगेवाला यांच्या टांगयातुन शाहुकलामंदिर मध्ये घेवून आल्याचे आठवते. तसेच कै. चंद्रकांत मांढरे व कै. सूर्यकांत मांढरे , कै. शरद तळवलकर , धुमाळ ,कै. अरुण सरनाईक , कै. भक्ती बर्वे , तर विनोदी नट धुमाळ , कै. राजा परांजपे , कै.राजा गोसावी ,कै .मछिंद्र कांबळे , कै. विट्ठलशिंदे , कै .पद्मा चव्हाण इत्यादि अनेक नाट्य सिनेमा अभिनेत्यांना पाहिल्याचे व त्यांना भेटल्याचे स्मरते आहे. पुढे मुंबईत असतांना देखील बऱ्याच हिंदी नट ,नट्याना पाहिल्याचे स्मरते आहे. त्याबद्दल स्वतंत्र लिहीन.
यातूनच साहित्य , कला संस्कृती यांची जवळीकता , अभिरूची जन्माला आली .. त्यात आणखी जी भर पडली ती माझ्या मुद्रणाच्याव्यवसायामुळे कारण प्रत्यक्षात अनेक साहित्यिक भेटण्याची त्यांच्या सह्या घेण्याची संधी मिळाली .. तेंव्हा पासुनच ही साहित्याभिरूचीची मशागत ही माझ्या पौगण्डावस्थेपासुुनच सुरु झाली हे स्व. कवयित्री शांताबाईं शेळके यांचे वाक्य आज सार्थ वाटते .!… जीवनाला सर्वार्थानं पोषक असा मार्गदर्शक सहवास योगायोगाने लाभला …हेच परमभाग्य ! घरातील वातावरण देखील याला कारणीभूत होते ..!!!!
©विगसा
२१ – ११ – २०१८.
(पुणे मुक्कामी)
Leave a Reply