मित्रहो…. नमस्कार !
मला भेटलेल्या प्रत्येक दिग्गज साहित्यिकांची आठवण आजही अंतरात आहे.. १९६३ सालापासुन साहित्यिकांचा सहवास लाभला. घरी आईवडील सुशिक्षित, धार्मिक, आई १९४२ ची सेवासदनची मैट्रिक. त्यामुळे घरचे वातावरण खुप छान संस्कारक्षम, इयत्ता ९ वीतच १९६३ साली आईनेच मला माझ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या ” शाळा माऊली ” या मासिकात..स्वामी विवेकानंद यांच्या ” *साधना आणी विवेक* ” या पुस्तकाचा सारांश लिहिण्यास प्रवृत्त केले. हेच माझे पहिले लेखन..मग हळू हळू लिहू लागलो. १९६३ ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारला डेक्कन एजुकेशन संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या माझ्या शाळेतच भरले होते त्याचा उल्लेख मी पहिल्या लेखांकात केला आहेच. त्यावेळी सर्व साहित्यिकांची निवासाची सोय शाळेतील वर्गातच केलेली होती. त्यात कै. आचार्य अत्रे यांच्याच रूमवर मला ३ दिवस स्वयंसेवक म्हणून काम करण्याचे भाग्य लाभले. त्यांचा सहवास लाभला. कै.शाहिर अमर शेख यांचे मोरपीस असलेले पेनही पहावयास मिळाले. तो आनंद आजही मन मोहरुन टाकतो आहे.
त्यावेळचा एक प्रसंग मला आठवतो !… आचार्य अत्रे यांनी मला माझे नाव विचारले ” मी माझे नाव…” माधव उर्फ विलास गजानन सातपुते असे सांगीतले…” तेंव्हा ते म्हणाले अरे ” इतके छोटे कसे नाव ? तुझ्या वडिलांच्या वडिलांचे नाव काय ? ” मी म्हणालो पांडुरंग, अत्रे पुढे म्हणाले पांडुरंगांच्या वडीलांचे नाव काय ? मी म्हणालो कृष्णाजीपंत..” तेंव्हा अत्रे म्हणाले अरे तुझे पूर्ण नाव, माधव उर्फ विलास गजानन पांडुरंग कृष्णाजीपंत सातपुते असे असायला हवे. तसा बदल शाळेच्या हजेरीपत्रकात करुन घे !!… मला काही कळले नाही.. तेंव्हा अत्रे म्हणाले अरे तुला माझे नाव माहिती आहे कां ? मी म्हणालो हो !.. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. पण मला काय म्हणतात फक्त प्र.के. मग तुझेही असे छोटे नाव ठेवूया !….
मागसा ?.. नको !… मागपांसा..? नको…! मग विगसा..? हो… विगसा… छान वाटते !.. मी आतापासून तुला ” विगसा ” हाक मारेन..!!!! त्यावेळी त्यांची विनोदबुद्धि मला कळली नाही, पण मी जोपर्यंत त्यांचे रूमवर होतो तोपर्यंत त्यांनी मला विगसा या नावानेच संबोधले.. !! आज त्या नामकरण संस्काराची महती कळते.. आज सर्वच मला विगसा म्हणून ओळखतात.. हेच माझे भाग्य ! तो प्रसंग आजही स्मरतो आहे.
त्या संमेलनाच्या कालावधीत कै. दत्तोपंत पोतदार, कै लोककवी मनमोहन, कै.गोविंदस्वामी आफळे तसेच कै. आचार्य अत्रे आमच्याकड़े घरी आले होते. तो प्रसंगही आठवतो, या सर्वांच्या सह्या मी माझ्या सह्यांच्या वहीत घेतल्याची आठवणही आज आहे. आज वयाच्या सत्तरीत मागे वळून पहाताना अशा ज्येष्ठ साहित्यिक, कवी यांना आपण प्रत्यक्ष पाहिले आहे, त्यांचा स्पर्श आपल्याला झाला आहे, त्यांचा सहवास आपल्याला लाभला आहे.याचे नुसते स्मरण जरी झाले तरी स्वर्गानंद होतो.
साधु संत येती घरा । तोची दिवाळी दसरा । तसेच या दिग्गज ज्येष्ठ साहित्यिकांचा लाभलेला सहवास आजही मला जीवनातील कृतार्थता वाटते..!!! हे मात्र खरे…!!!….
— विगसा
१२-११-२०१८ (बेंगलोर)
(पुढील ३ ऱ्या लेखांकात.. कै. लोककवी मनमोहन नातू यांची आठवण)
Leave a Reply