सर्व गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहेच आणि आपणा सर्व मित्रांचाही कृतज्ञ आहे. माणसं ही योगायोगाने भेटतात . माणसांचा संग्रह आणी त्यांचा सहवास हेच माझे या जन्मिचे संचित आहे असे मी मानतो.
या भेटलेल्या सर्वच दिग्गज साहित्यिकांशी माझा खुप जवळून परिचय झाला . साक्षात ज्यांना कविताच म्हणता येईल अशा ज्येष्ठ मार्गदर्शक कवयित्री कै. शांताबाई शेळके यांची माझी पुणे येथे त्यांच्या पुणे सातारा रोडवरील बंगल्यात नेहमी भेट होत असे ! अगदी मुक्त चर्च्या होत असे ..त्यांचे मार्गदर्शन मला होत असे.माझ्या आत्मरंग काव्यसंग्रहाला त्यांनी दिलेल्या त्यांच्या प्रस्तावनेत माझे खूप कौतुक केले आहे. ” त्या म्हणतात कविवर्य वि.ग.सातपुते यांनी लिहिलेल्या आत्मरंग या काव्यसंग्रहातील त्यांचे प्रांजळ मनोगत प्रथम वाचकाने वाचावे !असे म्हणले आहे.तर मलाही सांगीतले की ..तू प्रवास वर्णनही लिही . याचा अर्थ त्यांनी माझ्या सर्वच काव्य रचना मुळापासुनच वाचल्या होत्या आणी त्यांनी मुक्त चिंतनात्मक प्रतिक्रिया व सुंदर आशिर्वादात्मक प्रस्तावना मला दिली होती. तोच मला मिळालेला सर्वोच्च , श्रेष्ठतम पुरस्कार होता .
माझ्या २६ ऑगस्ट २०१८ रोजी एस.जी.फ़िल्म प्रोडक्शन पुणे ( श्री. राहुल जाधव) यांनी घेतलेल्या मुलाखतीत कै.कवयित्री शांताबाईं शेळके यांनी मला केलेल्या मार्गदर्शना बद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली आहे. माझी एक कवीता होती ..
” प्रिये आठवण तुझी येते …
काही समजत नाही …
काही उमजत नाही….
प्रिये आठवण तुझी येते….।।
मी त्यांना ती गावून दाखविली ..
पण त्या म्हणाल्या ” अरे थांब ” एक काम कर ! प्रीये या शब्दा ऐवजी सखये हा शब्द टाक ! आणी आता म्हण !…
मित्रहो दोनही शब्दांच्या मात्रा सारख्या आणी अर्थही सारखा आहे. पण केवळ त्या सखये या एका शब्दाने त्या रचनेची गेयता खुपच सुंदर झाली. ती रचना पुढे रेकॉर्ड झाली. हा साक्षात ज्यांना कविताच संबोधले जाते अशा कै. शांताबाई शेळके यांचाच मला लाभलेला आशीर्वाद होता.
अशा अनेक घटना आहेत . गुरुवर्य द.वी. केसकर सरांना तर मी रचलेली रचना सातारहून वाईला फोन करून ऐकवित असे .आणी ते मला फोनवरुन सहज मार्गदर्शन करीत असत. आवश्यक तो बदल सूचवित असत. माझ्या रचनांना सुंदर आकार येत असे.असे गुरुवर्य मला लाभले. कै. द.वी.केसकर यांना आम्ही कवी दादा म्हणत असू. त्यांच्या सोबतही मला दिग्गज व्यक्तीना भेटता आले. ते उत्तम मार्गदर्शक , उत्तम वक्ते , उत्तम असे काव्यसमीक्षक होते. मिश्किल होते. त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक सुंदर दृष्टांत गप्पानच्या ओघात मला सांगीतले होते.त्यापैकी एक म्हणजे त्यांचेच एक गीत
घरात हसरे तारे असता , पाहु कशाला नभाकडे हे एचएमव्ही कंपनीने रेकॉर्डिंग केले होते ,आणी प्रत्यक्ष विख्यात गानसम्राज्ञी लतादिदी मंगेशकर यांनी गायीले होते. त्या गीताचे शब्द हे दीदींना इतके भावले होते की त्यांनी एचएमव्ही कंपनीला फोन करून गीतकार गुरुवर्य कै. द.वी.केसकरांचा फोन नंबर घेवून त्यांना मुंबईला त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आमंत्रित केले होते. त्यांची भेटही झाली.
ही सत्य घटना कै. गुरुवर्य दवी. केसकरांनी जेंव्हा सांगितली ती किती रंजक आणी अविस्मरणीय आहे याची जाणीव मला झाली . माझ्या व्याख्यानात तो किस्सा दवी. केसकरांच्या शब्दातच सांगतो. तेंव्हा कवी देखील किती मिश्किल असतात याची जाणीव होते. आणी श्रोते हास्य रसात दंग होतात याची प्रचिती मला आली आहे. साहित्यातील सर्व रसास्वाद या सर्वांच्याच सहवासात मला अनुभवता आला. काव्य रचनेतील समर्थ प्रासादिक शब्द हे वाचकांना , श्रोत्यांना , तसेच संगीतकाराला , गायकाला किती मोहरुन टाकतात. याची जाणीव होते. या गोष्टीचे भान विशेषतः नवोदित अशा अभ्यासक कवीकवयित्री , लेखकांनी जरूर ठेवले पाहिजे. सातत्याने वाचन , मनन ,चिंतन , केले पाहिजे आणी मी पणाचा अहंकार सोडून देवून शिकण्याचा ध्यास धरला पाहिजे असे मला वाटते ..लेखन तपश्चर्या आहे .त्यासाठी निश्चितच गुरुंचे मार्गदर्शनही अपेक्षित आहे .
कै.दवी. केसकर सर स्वामी समर्थ भक्त होते. ते नेहमी माझेकडे येत असत . कधी पुण्यात तर कधी सातारला. एकदा अचानक ते उभयता पुणे येथे माझ्या घरी आले होते. योगायोग असा की मी त्यावेळी स्वामी समर्थान्चे तैलचित्र काढीत होतो. मी ते चित्र पूर्ण करे पर्यंत दवी सर माझ्या समोर बसले होते.आम्ही दोघेही चित्र पूर्ण झाल्यावर उठलो होतो . त्यादिवशी त्यांचा मुक्काम माझ्या घरीच होता. ती एक आनंद पर्वणी होती.
त्या सुमारासच आमचा मुंबईला संगीतकार कै. नंदू होनप यांचेशी फोन झाला होता. आमचे तिघांचे अक्कलकोट व गाणगापुरला ठरले होते. नंदूजी होनप हेही दत्तभक्त होते. आम्ही गेलोही . आम्ही दर्शनही करून आलो ..तो प्रवासही अविस्मरणीय आहे ..!
त्या सुंदर सहवासी प्रवासात गाडी चालविता चालविता मला एक गीतही सूचले होते ..ते …..
गुरु हा गुणगुणता अंतरी
राम रुणुझुणुतो रामनगरी
आणी ते गीत त्यावेळी अगदी सहजच नंदूजीनी गाडीतच सुरात गुणगुणले होते…ते आजही लक्षात आहे.
रेकॉर्डिंगचे अनेक मनसुबे रचले होते पण पूर्ण झाले नाहीत ही खंत आहे,पण नंदू होनप यांचा सहवास लाभला हा आनंदही आहेच.या साऱ्याच आठवणी आज परमनानंद देतात.
© विगसातपुते.
9766544908
१ – १२ – २०१८.
Leave a Reply