नवीन लेखन...

सेलर्स डॉटर

असं बोलतात की सेलर्स ना पहिली मुलगीच होते. मलाही पहिली मुलगीच झाली बऱ्याच मित्रांना सुद्धा पहिली मुलगीच.

माझ्या मुलीचा जन्म झाल्यावर तीन सव्वा तीन महिन्यातच मी जहाज जॉईन केले. घरून निघताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तीन महिन्याच्या माझ्या मुलीला मी पुन्हा पाच सहा महिन्यांनी बघणार होतो. मी असलो नसलो तरी तिचे समजण्याचे वय नसल्याने तिला काही फरक पडणार नव्हता. विमानतळावर चेक इन आणि इमिग्रेशन क्लिअर होईपर्यंत मनात एक शंका असते कदाचित ऑफिस वरून फोन येईल आणि सांगतील की जॉइनिंग डिले झाले आहे. परंतु तसे काही घडले नाही आणि मुंबई एअरपोर्ट वरून सिंगापूर एअर लाईन्सच्या डबल डेकर एअर बस A 380 विमानाने टेक ऑफ घेतल्यावर पुन्हा एकदा अश्रूंचा बांध फुटला. जहाज जॉइन जहाजावर जॉईन झाल्यावर मुलीच्या आठवणीने एक एक क्षण आणि एक एक दिवस अवघड होउन गेला होता. सिंगापूर हून जहाज जॉइन करायचे होते पण तिकडे जहाज पोहचायला एक दिवस उशीर झाला आणि पुढील दीड दिवस हॉटेल मध्ये काढावा लागला हाच दीड दिवस घरी असताना वाढला असता तर या विचाराने वाईट वाटले.

जहाजावर v सॅट नावाची इंटरनेट यंत्रणा होती ज्याद्वारे दहा डॉलर्स मध्ये 100 मिनिटे टॉक टाईम तो सुद्धा स्वतः च्या मोबाईल मध्ये सिमकार्ड द्वारे मिळत होता. तसेच जहाजावर कॉमन ठिकाणी असलेल्या कॉम्पुटर वर फेसबूक आणि मेसेंजर तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. मोबाईल वरुन घरी तासन तास केबिन मधून बोलता यायचे पण मोबाईल मध्ये इंटरेनेट सुविधा उपलब्ध नव्हती. फेसबूक आणि मेसेंजर वर व्हिडिओ कॉलिंग होईल एवढा स्पीड नव्हता पण फोटो वगैर डाउनलोड व्हायचे. मुलीचा आवाज फोनवर ऐकायला मिळायचा तर फेसबूक आणि मेसेंजरवर फोटो मिळायचे. सुदैवाने साडे चार महिन्यांत त्या जहाजावरुन साईन ऑफ होउन लवकर घरी यायला मिळाले होते. पण आपल्या लहान बाळाच्या नाजूक बोटाला धरून पहिल्यांदा उभे राहायला , चालायला लागण्याचे सुख मुलीच्या बाबतीत अनुभवता आले नाही.

जहाजावर कामाच्या ताणामुळे , किंवा थकल्या भागल्यावर जेव्हा जेव्हा रिचार्ज व्हावेसे वाटते तेव्हा तेव्हा मुलीला फोन करून तिच्याशी बोलावे लागते. तिची बालिश आणि वायफळ बडबड ऐकण्यात वेगळेच समाधान मिळते, सगळा थकवा आणि शिण कुठल्याकुठे पळून जातो.

जहाजावरुन परतल्यावर पुढील नऊ महिने उलटून गेले तरी मला पुन्हा जहाजावर जॉइन करायची इच्छाच होत नव्हती. मुलगी चालायला लागली होती, इवल्याशा नाजूक बोटांनी मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोल करून फोटो बघणे, हसणे आणि खिदळणे आणि घरात पहिलीच मुलगी आणि एकटी सगळ्यात लहान असल्याने सगळ्यांकडून नुसतं लाड आणि कौतुक चालू असायचे , तिच्या जन्मापासून तेव्हाही आणि आजही घर आनंदाने अक्षरशः ओसंडून वाहत आहे.

May be an image of 1 person, standing and indoorनऊ महिन्यांनी पुन्हा जहाजावर जातांना तिला सोडुन जाताना पहिल्या वेळेसारखाच प्रसंग , यावेळेला तिचा निरोप घेतांना ती कावरी बावरी झाली होती. अजूनही तिला मी जहाजावर जायला निघाल्यावर फारसे कळत नाही पण जहाजावर गेल्यावर पुन्हा घरी येईपर्यंत जेव्हा जेव्हा फोन केला की एकच प्रश्न असतो डॅडा तू परत कधी येशील. मला चॉकलेट्स आण, डॉल आण, मेक अप चे किट आण आणि अजून काय काय. हल्ली जहाजावर व्हिडीओ कॉल करता येत असल्याने डॅडा तू जेवलास का? तुझी रूम दाखव, काय खातोस ते दाखव, बाथ टब दाखव, समुद्र दाखव असं सगळं जे जे मनात येईल ते व्हिडीओ वर दाखवायला सांगते.

जहाजावरुन घरी परतल्यावर सुरवातीचा एक आठवडा मी जरा कुठे नजरेस पडलो नाही तर लगेचच डॅडा कुठे गेला याचा शोध घेत राहते.

तिच्या मागे भावाला एक मुलगी झाली आणि मला मुलगा अशा तिच्या दोन्ही लहान भावंडांच्या तक्रारी फोनवर सुरु असतात. तक्रारी करतानाच तिने त्यांच्या दोघांवर केलेल्या ऍक्शन बद्दल पण वर्णन करून सांगते. घरात ती एकटी असताना तिचं जेवढं कौतुक आणि लाड व्हायचे तेवढे आजही तसेच होतात, पण तिच्यासोबत अजून दोन्ही लहान भावंडांचे कौतुक झाल्यावर तिला थोडंसं इनसिक्युअर फील होत असावं. साहजिकच आहे तिन्ही भावंडात ती आता मोठी असल्याने तिने त्यांना सांभाळून घ्यावं किंवा तिची चुकी नसतानाही तिला त्या दोघांपैकी कोणी रडलं की तिलाच जवाबदार धरलं जातं, आणि मग तिला बोलणी आणि ओरडा खावा लागतो. बिचारी हिरमुसली होऊन निमूटपणे सगळं ऐकते आणि थोड्या वेळाने काहीच घडले नाही असं पुन्हा वागायला लागते. तसंही बऱ्याचदा तीच जवाबदार असते कारण मोठी असल्याने ती दोघांनाही बॉस सारखं डॉमिनेट करायला जाते पण त्याचा परिणाम असा होतो की ते दोघे एकत्र होतात आणि हिला एकटीला पाडतात. तिघाही भावंडांमध्ये दोन दोन वर्षाचे अंतर असल्याने तिघेही वेगवेगळ्या पिढीतले असल्याप्रमाणेच एकमेकांशी मतभेद असल्यासारखं वागतात, भांडतात आणि खेळतात. पण तुझं नी माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना त्या प्रमाणे तिघांनाही एकमेकांशिवाय क्षणभर सुद्धा चैन पडत नाही.

माझी मुलगी एवढी एवढी एनर्जेटिक आहे की दिवसभरात एका जागेवर ती कधीच शांत बसत नाही. सतत काही ना काही उद्योग चालू असतो, अभ्यास, चित्रं रंगवणं, खेळण्यांचा पसारा करून घर घर खेळणे, बाहुल्यांना सजवणे आणि काहीच नसेल तर खोड्या काढणे.

मोबाईलमध्ये गेम खेळणे किंवा स्टोरी बघणे तिला आवडतं पण मोबाईल ठेवून दे किंवा घेऊ नको असं सांगायची वेळ येत नाही. मोबाईल घ्यायचा असला तरी सांगून घेते, टीव्ही वर कार्टून बघायचे असेल तर आईची परवानगी घेते अर्धा तास किंवा एक तास जेवढं विचारलेले असते तेवढा वेळ बघून निमूटपणे बंद करते.

खाण्याची आणि खाद्य पदार्थांची एकदम शौकीन, तिच्या मम्माने, काकूने किंवा आईने एखादा पदार्थ आवडला तर मनापासून तोंडभरून स्तुती करते.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी तिचा जन्म झाला त्यामुळे तिचा वाढदिवस तारखेप्रमाणे आणि तिथीनुसार दोन वेळा औक्षण करून साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी जन्म झाल्याने आमच्या घरात लक्ष्मीच्याच रूपाने ती सुख समृद्धीसह आनंद घेऊन आली.

जुनियर रँक मध्ये सुरवातीला पाच सहा महिने जावे लागायचे पण आता सिनियर रँक मध्ये तीन ते चार महिने जावे लागते तरीपण मुलगी झाल्यापासून जहाजावर नोकरीच करावीशी वाटत नाही. घरी असताना तिला दिवसभरात खूप कमी वेळ देत असेन पण, घरात आल्यावर आणि घराबाहेर पडण्यापूर्वी तिला बघितल्याशिवाय चैन पडत नाही. माझ्या मुलीला मी जहाजावर असताना माझ्या मिसेस ने माझी कमतरता भासू दिली नाही. आई आणि बाबांनी तर कदाचित मला कमी जीव लावला असेल पण तिला एकदम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. माझ्यापेक्षा जास्त लाड तिच्या काका आणि काकूने केले.

प्रत्येक बापाचे स्वतःच्या लेकीवर विशेष प्रेम असते किंवा असही म्हणतात प्रत्येक लेकीच्या भाग्यात बाप असतो पण प्रत्येक बापाच्या भाग्यात लेक नसते.

आजीची माया ,आईची काळजी , बायकोचे प्रेम आणि बहिणीसारखा जीव लावणारी सगळी रूपं जशी मुली मध्ये सामावलेली असतात. तसेच आजीचा लटका राग , आईचा अबोला, बायकोचं रुसणे आणि बहिणीचा फुगणे हे सगळे अनुभव सुद्धा एकटी मुलगीच दाखवते.

पण आमच्या सारख्या सेलर्ससाठी लेक म्हणजे आमचे अस्तित्व आणि आमचा जीव की प्राण असतो.

पद, पैसा , प्रसिद्धी, मान -सन्मान,रॉयल आणि चॅलेंजिंग लाईफ यातून लवकर बाहेर पडण्यासाठी कदाचित सेलर्सचे पहिले अपत्य हे मुलगीच असते असं बोललं जात असावं. कारण पद, पैसा, प्रसिद्धी, मान- सन्मान, रॉयल आणि चॅलेंजिंग लाईफ सहसा कोणी सहजासहजी सोडायला तयार होत नाही.

परंतु या सगळ्यांपेक्षा महत्वाचं जे काही असतं ते फक्त स्वतःच्या मुलीमध्येच असतं याची जाणीव तिच्या जन्मापासूनच व्हायला लागते आणि जसजशी ती मोठी होत जाते तसतसं ती जाणीव अधिकाधिक तीव्र होत जाते.

— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B.E.(mech), DIM, DME.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..