मी जहाजावर पहिल्यांदा जाण्यापूर्वी तिच्या प्रेमात पडलो. माझे एक वर्षाचे प्री सी ट्रेनिंग सुरु होते आणि तिची डॉक्टर म्हणून नेरुळ नवी मुंबईत स्वतःच्या क्लिनिक मध्ये प्रॅक्टिस सुरु होती.
ती पेशंटचे ब्लड प्रेशर, हार्ट रेट आणि शुगर तपासायची तर मी इंजिनाची घरघर, ल्युब ऑइल आणि कुलिंग वॉटर चे टेम्परेचर आणि प्रेशर तपासणार होतो.
ती डॉक्टर आणि मी ट्रेनी इंजिनियर ज्याने प्रत्यक्ष जहाजावर कामही केले नव्हते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर पाच महिन्यांनी कंपनीचा कॉल आणि मला पहिल्यांदा ब्राझीलमध्ये असलेल्या जहाजावर जुनियर इंजिनियर म्हणून पाठवले. जहाजावर जुनियर इंजिनियर म्हणून सहा महिने काम केल्यावरच मरीन इंजिनियर ऑफिसर ची पहिली परीक्षा देऊन ती पास झाल्यावरच जहाजावर इंजिनियर ऑफिसर म्हणून काम करण्याचे लायसन्स मिळते. परंतु सगळ्या कंपन्या जुनियर इंजिनियरना सहा ऐवजी आठ ते दहा महिन्यासाठी पहिल्यांदा पाठवतात.
तब्बल साडे आठ महिने एक एक दिवस मोजून घालवल्यावर मी ब्राझीलहुन घरी परतलो. मधल्या आठ महिन्यात प्रियाशी जहाजावरील सॅटेलाईट फोन वरून एक अमेरिकन डॉलर मध्ये एक मिनिट या रेट ने बोलायचो तेव्हा पगारच आठशे डॉलर्स त्यामुळेच एक मिनिट महाग वाटायचे पण करणार काय . घरी गेल्यावर लग्न करायचे होते, स्वतःचे पैसे पण साठवायचे होते, लग्नानंतर आई बाबांकडे पैसे कसे मागायचे हा पण प्रश्न होता.सॅटेलाईट फोन वर बोलताना टाईम डिले असल्याने बोलल्यावर पलीकडे आवाज ऐकू जायला दोन ते तीन सेकंद जायची. दोघांच्याही घरी सुरवातीला आमच्याबद्दल माहिती नसल्याने आणि ब्राझीलची प्रमाण वेळ भारताच्या मागे साडेआठ तास असल्याने, तिची क्लिनिकची वेळ साधून माझ्या पहाटे पहाटे तिला फोन करावा लागत असे. जेव्हा भारतात दुपारचे बारा वाजलेले असायचे तेव्हा ब्राझील मध्ये पहाटेचे साडे तीन. कधी कधी पहाटे चारला उठून तिला फोन करायचा तर तिच्याकडे पेशंटचे नंबर लागलेले. त्यावेळेस फेसबुक, मेसेंजर किंवा व्हाट्सअपच काय पण स्मार्ट फोन सुद्धा आले नव्हते.
जहाजावरुन घरी येण्यापूर्वी तिने तिच्या घरी आम्हा दोघांबद्दल सांगितले इकडे माझ्या घरी आईला सुद्धा मी सांगून ठेवले होते, प्रश्न होता तो म्हणजे बाबांना कोणी सांगायचे. शेवटी आईनेच बाबांच्या जवळच्या मित्राकरवी मुलगी बघायला जायचंय असं सांगून प्रियाच्या घरी नेले आणि मुलगी पसंत आहे म्हणून बघण्याच्या पहिल्याच कार्यक्रमातच होकार कळवून टाकला. नंतर लग्नाचे ठिकाण आमच्याकडे की तुमच्याकडे हे ठरण्यावरून बराच गोंधळ झाला पण नंतर लग्न झालेच.
आमच्या आगरी समाजात हुंडा किंवा देणे घेणे असे प्रकार नसतात तरीपण लग्नात मानपान, जेवण अशा गोष्टींवरून रुसवे फुगवे झालेच.
लग्नानंतर मला मरीन इंजिनियर ऑफिसरची परीक्षा द्यायची होती यामध्ये लेखी व तोंडी दोन्हीही प्रकारे तुम्ही जहाजावर काम करण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात की नाही याची खात्री झाल्यावरच तुम्हाला पास केले जाते आणि सक्षमता प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिंटन्सी ज्याला आम्ही लायसन्स असेही म्हणतो. लेखी परीक्षा दोन प्रयत्नात तर तोंडी परीक्षा चौथ्या प्रयत्नात पास झाल्यावर लग्नानंतर साधारण सव्वा वर्षांत मी पुन्हा जहाजावर जायला निघालो. लग्न झाल्यावर काही महिन्यातच आमच्या गावातच प्रियाची पुन्हा प्रॅक्टिस सुरु झाली होती. मला जहाजावर पाठवले पण पुन्हा एकदा जुनियर इंजिनियर म्हणून आणि सांगितले की तुला काही महिन्यात प्रमोशन देऊन फोर्थ इंजिनियर बनवू. परंतु पंधरा दिवसातच चीफ इंजिनियरने रिपोर्ट पाठवला की जहाजावरचा सध्याचा फोर्थ इंजिनियरला जाऊ द्या आणि जुनियरला प्रमोट करायला हरकत नाही. माझ्या दुसऱ्याच जहाजावर पंधरा दिवसात प्रमोशन मिळाले, जहाज इस्तंबूल शहराजवळ पंधरा दिवस असल्याने तिथले सिमकार्ड घेतले होते त्यामुळे. रोज घरी फोन करता यायचा आणि नेमके जहाजावर महिनाभरातच व्ही सॅट नावाची यंत्रणा लावली गेली ज्याच्यामुळे जहाजावर इंटरनेट आणि मोबाईल मध्ये सिमकार्ड चालू लागले. दहा डॉलर्स मध्ये 100 मिनिट पाहिजे तेव्हा केबिन मधूनच बोलता येऊ लागले.
मग फेसबुक आणि मेसेन्जर पण जहाजावर सुरु झाले. प्रियासोबत चॅटिंग आणि फोनवर बोलणे होत असल्याने आणि जहाज पाच वर्ष जुने असल्याने फारसे कामं नसायचे त्यामुळे पाच महिने कधी गेले ते कळलेच नाही.
लग्नापूर्वी तिला सांगितले होते की तुला जहाजावर सोबत नेईन कारण आमच्या कंपनीत फॅमिली न्यायला परवानगी असते जहाज युरोप, भूमध्य आणि काळ्या समुद्रात फिरत असल्याने कंपनी सहसा कोणाला फॅमिली न्यायला नाकारत नसे. पण जहाजावरील कामाचे स्वरूप आणि खराब हवामाना मुळे हेलकावणारे जहाज यामुळे तिला नेण्याचे सांगून सुद्धा प्रत्येक वेळी मीच टाळले सहसा सिनियर रँक असलेले अधिकारीच त्यांच्या फॅमिलीला घेऊन जात असत कारण त्यांचा अनुभव आणि त्यांच्या कामाचे स्वरूप जुनियर अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे असते.
तिला जहाजावर तर नेले नाहीच पण आता अजून फक्त एकदा जाऊन येतो मग शिपिंग सोडतो असं प्रत्येक वेळेला सांगून काही महिने गेल्यावर पुन्हा जहाजावर जॉईन होतोच.
सेलर्स वाईफ म्हणून तिला काही नातेवाईक आणि इतरांकडून खूप वेगवेगळ्या आणि विचित्र असा वागण्याचा अनुभव येत असतो. बहुतेक जण तिच्याकडे सहानुभूतीने वागतात. सुरवातीला तिला सगळ्यांच्या वागण्याचा त्रास व्हायचा पण माझ्या आई बाबांच्या पाठींब्यामुळे ती कोणालाही सडेतोड उत्तरं द्यायला लागली. एकतर आधीच रागीट त्यात तिचे सडेतोड बोलणे यामुळे तिच्या वाट्याला कोणीच जात नाही, अगदी मी सुद्धा. मुंबईत बालमोहन आणि रुपारेल मध्ये शिक्षण होऊन नवी मुंबईतील जम बसलेली प्रॅक्टिस सोडून माझ्याशी लग्न होऊन गावांत एकत्र कुटुंबात राहायला लागली. आमचे गांव आता तसे शहरासारखे झालंय पण गावाचे गावपण काही गेलं नाही, इथलं वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेतले तिने. स्वभाव रागीट असूनही स्वतःच सगळ्यांशी पटवून आणि जुळवून घेतले.
सहा महिनेच काय पण दोन अडीच वर्षे घरी राहिल्यावर सुद्धा जहाजावर जायची तारीख निश्चित झाल्यावर तिच्या मनाची होणारी घालमेल आणि चिडचिड बघवत नाही.
जहाजावर फोर्थ, थर्ड, सेकंड आणि चीफ इंजिनियर ला अनुक्रमे चार साब, तीन साब, सेकंड साब आणि बडा साब बोलतात.
जेव्हा पहिल्यांदा फोर्थ इंजिनियरचे प्रमोशन झाले तेव्हा तिने पण मला चार साब बोलूनच अभिनंदन केले. जहाजावरच ऑनबोर्ड प्रमोशन होऊन थर्ड इंजिनियर झाल्यावर तिला सांगितले की आता बस झाले शेवटचे कॉन्ट्रॅक्ट हे यानंतर जहाजावर पुन्हा नाही येणार. त्यावेळी तिने सांगितले, हे सगळं ऐकता ऐकता तीन साब तर झाला आता बडा साब होईपर्यंत पुन्हा हेच ऐकावे लागेल. पण बडा साब झाल्यावर खरोखरच कित्ती मजा येईल.
लग्नानंतर चार वर्षांनी आम्हाला गोड मुलगी झाली, मुलीच्या येण्याने घरात नुसता आनंदी आनंद सगळं घर तिच्या हसण्या खिदळण्याने आणि नाचण्याने दुमदुमून जायला लागले. मुलगी झाल्यावर चार महिन्यातच मी पुन्हा जहाजावर गेलो जाण्यापूर्वी महिनाभर आधी तिचे वडील दुर्दैवी अपघातात सोडून गेले होते. चार महिन्यांची मुलगी आणि त्यात तिचे पप्पा तिला सोडून गेलेले. माझ्या मुलीला मी नसताना माझ्या आई बाबांनी आणि भावाने खूप जपले. पण प्रियाने तिला मी नसताना माझाही जीव लावला एकाचवेळी मम्मा आणि डॅडा बनून तिला माझी कमतरता भासू दिली नाही. मुलगा झाल्यावर सुद्धा तीच परिस्थिती, मुलगा होऊन तीन महिने झाले आणि मी घरी अडीच वर्ष काढल्यावर पुन्हा एकदा जॉईन करण्याचा निर्णय घेतला, अनपेक्षितपणे कंपनीने सेकंड इंजिनियरचे प्रमोशन सुद्धा दिले.
अडीच वर्ष घरात राहिल्यावर माझ्या मनाची झालेली घालमेल बघून मुलगा जेमतेम तीन महिन्याचा असूनही तिने जायची परवानगी दिली. पाच महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट तीन महिन्यांवर आले. एन आर आय टाईम पूर्ण करण्यासाठी वर्षातून दोन वेळा तीन साडे तीन महिने करावे लागतात हे आणखीन एक वेगळंच दुखणं.
आता व्हाट्सप आणि मेसेंजर वर व्हिडीओ कॉल कधीही आणि केव्हाही करता येतो. मुलगी तर आठवण पडेल तेव्हा फोन करते ऑनलाईन असलो नसलो तरी ऑडिओ मेसेज पाठवते. जहाजावर जॉईन व्हायला गेल्यावर दोन तीन दिवस मम्मा डॅडा कुठे गेलाय कधी येईल असे भाबडे प्रश्न प्रियाला विचारत असतो. तो आता साडे तीन वर्षाचा झालाय पण व्हिडीओ कॉल वर आला तर बोलतो डॅडा तू इकडे ये ना, आताच्या आता ये ना.
जीव नुसता तुटतो, रडायला येऊन डोळे पाण्याने भरतात.
जहाजावरील जीवन, कामाचा स्ट्रेस आणि कामं यामुळे एक एक दिवस निघून जातो पण घरी माझी वाट आतुरतेने बघणारी प्रिया एक एक दिवस काय एक एक क्षण काळजीत घालवत असते याची जाणीव सतत असते.
वर्षभरापूर्वीच बडा साब होण्याची संधी चालून आली होती पंधरा दिवस प्रभारी चीफ इंजिनियर म्हणून काम सुद्धा केले,पण तेव्हा मानसिक तयारी झाली नव्हती म्हणून प्रमोशन नाकारले. परंतु यावेळेला बडा साब होण्याशिवाय पर्याय नव्हता कारण जहाजावरील भारतीय सेकंड इंजिनियरची रँक काढून टाकली होती. फक्त भारतीय इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि चीफ इंजिनियर हेच दोघे अधिकारी आणि इतर सगळे त्यांच्या देशातील स्थानिक अधिकारी ठेवण्याचा निर्णय जहाजाच्या ओनर्स ने घेतला होता.
मी बडा साब होईन खांद्यावर चार सोनेरी पट्ट्या येतील असं मलाच कधी वाटलं नव्हतं कारण मलाच नकोशी असलेली ही नोकरी. आई बाबांना मी शिपिंग मध्ये नोकरी केली नाही केली तरी दुसरं काहीतरी करेनच हे माहिती असल्यामुळे त्यांनी कधीही माझ्या करियर संबंधीच्या निर्णयाला विरोध केला नाही की त्यात लुडबुड केली नाही. पण कदाचित प्रियाच्याच मनात कुठंतरी माझ्यातला बडा साब लपला होता.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर
B. E. (Mech ), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply