व्यक्ती आणि समाज हे नेहमी परस्परावलंबी असतात. प्रत्येक व्यक्ती एकेकटी आदर्श, सदगुणी झाली की समाज आदर्श होतोच. मात्र व्यक्तीच्या विकासाकरिता सामाजिक परिस्थितीदेखील चांगली असली पाहिजे. म्हणूनच की काय, भारतीय संस्कृतीमध्ये वैयक्तिक पूजा-अर्चा करताना जे श्लोक म्हटले जातात त्यांचा सामाजिक आशयही मोठा असतो.
काले वर्षन्तु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोयं क्षोभ रहितः ब्राह्मण: सन्तु निर्भया: ।
पाऊस वेळच्या वेळी पडत जाऊ दे आणि त्यामुळे पृथ्वी ‘सस्यशालिनी/ हिरवीगार दिसू दे ही या श्लोकातील पहिली प्रार्थना कृषिप्रधान देशामध्ये या प्रार्थनेला केवढा अर्थ आहे! देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच येथे पावसावर अवलंबून आहे. तो वेळच्या वेळी येणं आणि भलत्यावेळी न येणं या दोन्ही इच्छा अनुस्यूत आहेत. मात्र समृद्धीसाठी नुसती प्रार्थना करणाऱ्यांपैकी ही संस्कृती नव्हती. मुळात आपण प्रयत्न करायचे आणि देवाजवळ त्यासाठी आशीर्वाद मागायचे ही इथली रीत. कदाचित् भगिरथानं आणलेली गंगा ही अशा प्रयत्नांचाच एक भाग असावा. गंगेचा प्रवाह जो निरुपयोगी, कदाचित नापीक, हिमाच्छादित प्रदेशातून वाहत असेल तो त्या काळातील विद्वान आणि तंत्रज्ञांच्या साहाय्यानं हव्या त्या प्रदेशाकडे त्यानं वळवला असेल. कोणत्याही कठीण कामाला ‘तपश्चर्या’ म्हणतोच आपण. त्या हजारो पिढ्यांच्या मुखातून आपल्यापर्यंत आलेली ही कथा ! या आश्चर्यकारक घटनेला दंतकथेचं रूप न लाभलं तरच नवल..
वरच्या ओळींच्या संदर्भात ही भगीरथाची कथा आठवण्याचं कारण एवढंच की, आदर्श-सुखी समाजाच्या त्या काळी काही कल्पना होत्या. त्यासाठी प्रयत्नांबरोबर प्रार्थनाही होत्या. ‘देशोयं क्षोभरहितः ‘ ही अशीच दुसरी इच्छा. भारतात फार पूर्वीपासून लोकशाही आहे. राजे असायचे. पण त्यांच्यावर जनमताचा दबाव असायचा.
भारतीय समाजानं ज्याला देव मानलं असा आदर्श राजा ‘राम ‘सुद्धा जनमताच्या दबावापासून वाचू शकला नाही. अशाच समाजात लोकांना ‘क्षोभ’ व्यक्त करण्याची मुभा असते. देशात कुठेतरी ‘क्षोभ’ आहे याचा अर्थ लोक जागरूक आहेत.
ज्या समाजाला परिस्थितीची चीडच येत नाही, असा मेल्या रक्ताचा समाज काय क्षोभ व्यक्त करणार? त्याचप्रमाणे ज्या समाजात हुकूमशाहीच आहे, लोकांची मुस्कटदाबीच होतेय असा समाज तरी काय क्षोभ दर्शविणार? ही अशी शांतता भारतीय समाजात नव्हती तशीच अपेक्षितही नव्हती. राजसत्ता चुकली तर जनता पेटून उठायची. कंसासारखे काही जुलमी राजे होते. पण त्याची सत्ता कथा कादंबऱ्यांच्या नायकाप्रमाणं एकट्या कृष्णानं उलथून पाडली नाही. त्याच्या जन्माच्या आधीपासून जनसामान्यांनी गुप्तपणे ती पोखरत आणलीच होती. कृष्णानं साऱ्या राजकारणाला योग्य वळण लावलं होतं.
थोडक्यात देश क्षोभरहित असावा या प्रार्थनेप्रमाणे तो निःसत्व नसावा, तर क्षोभ उत्पन्न होण्याची कारणंच देशात असू नयेत एवढा मोठा अर्थ आहे.
त्याचप्रमाणं सारं सुरळित सुरू असताना केवळ राजकारणासाठी एखाद्या गटाला प्रक्षुब्ध करणं आणि अशांतता निर्माण करणं हेदेखील घडू नये अशी ही प्रार्थना आहे. कारण समाजात शांतता आणि सुव्यवस्था असेल तरच समृद्धी येते, कलागुणांचा विकास होतो, शास्त्रं प्राप्त होतात, ज्ञानवृद्धी होते याची जाणीव या संस्कृतीला होती.
कुठल्याही एका गटाच्या क्षोभामुळे दैनंदिन कामात येणारा विस्कळीतपणा आपण शहरी माणसं अनुभवतोच. अशा वेळी ‘देशोयं क्षोभरहितः’ हा केवढा महत्त्वाचा ठरतो.
पुढची ओळ मात्र वरवर पाहता थोडी वाद निर्माण करणारी वाटते. ‘ब्राह्मण: सन्तु निर्भया: ‘ म्हणजे ‘ब्राह्मण निर्भय असोत’ हे आज कसं पटावं? केवळ ब्राह्मणजातीत जन्मलेले परंतु अपात्र, विवेकशून्य लोक, निर्भय झाले त्यावेळी समाजाला बसलेले चटके सर्वज्ञात आहेत. परंतु ज्या काळात हा श्लोक रचला गेला त्या काळी ब्राह्मणवर्ग असा नव्हता. किंबहुना अशा व्यक्तींना ब्राह्मण म्हटलं जात नसे.
ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे तो ब्राह्मण होता. तो अहिंसा, अस्त्रेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य वगैरे व्रतांचं पालन करी. समाजातील तळागाळाच्या वर्गात जाऊन त्यांना ज्ञान देई. मात्र समाजाच्या कुठल्याच वर्गाचं एका पैचंही मिंधेपण या वर्गाकडे नव्हतं. ‘पुरोहित’ म्हणजे ‘पुढे होऊन समाजाचं हित करणारा ‘ असा वर्ग होता. अशा काळामध्ये ‘ब्राह्मणः सन्तु निर्भया:’ असं म्हटलं गेलं आहे. कारण असा चांगला नि निःस्पृह, समाजहिताची चाड असलेला माणूस निर्भय असलाच पाहिजे. काल-चक्राच्या बदललेल्या फेऱ्याबरोबर ब्राह्मण बदलले.
त्यांच्यातलं ‘पुरोहित ‘पण गेलं. म्हणून काळानुसार ही ओळ ‘सज्जनः सन्तु निर्भयः ‘ अशी म्हणायला हरकत नाही.
समाजात सज्जनांनी, चांगल्या माणसांनी भिऊन गप्प बसणं आणि गुंडप्रवृत्ती शिरजोर होणं हे समाजाचं अध:पतनच आहे. मात्र आज गुंडगिरी संघटित आहे.
अशा वेळी एकटा-दुकटा चांगला माणूस निर्भय कसा राहणार? तरीही एखाद्यानं ही निर्भयता दाखवलीच तर त्याचा संघटित अपप्रवृत्तीपुढे काय टिकाव लागणार?
म्हणूनच आज सज्जनांनी संघटित होण्याची गरज आहे. ‘चांगला’ या विशेषणासाठी ‘बिचारा’ हे आणखी एक विशेषण नेहमी असतं. ‘तो एक चांगला माणूस आहे’ हे वाक्य बहुधा ‘तो बिचारा चांगला माणूस आहे’ असंच म्हटलं जातं. आज समाजात चांगला माणूस हा ‘बिचाराच’ आहे. त्याचं ‘बिचारेपण ‘ तेव्हाच जाईल जेव्हा तो परिस्थिती मुकाट्यानं मान्य करण्याऐवजी तिच्याविरुद्ध दंड थोपटून उभा राहील. त्यासाठी तो निर्भय असण्याची गरज आहे.
आज नाकासमोर बघून चालणारी, कुणाच्या अध्यात मध्यात नसणारी,
शक्यतो वाईट मार्गाला न जाणारी पण आपल्यापुरतं पाहणारी, समाजातल्या वाईट गोष्टींची फारशी चीड नसणारी अनेक ‘नेभळट सज्जन’ माणसं आहेत. अशा सज्जनांनी संस्कृती आणि समाज तरून जात नाही. ‘मानवी संस्कृती’ किंवा संस्कृतीतला ‘मानवी’ पणा जपण्यासाठी निर्भय सज्जनांची गरज आहे. म्हणूनच वेदकाळापासून चालत आलेली ही प्रार्थना आजही उपयुक्त आहे.
“काले वर्षन्तु पर्जन्य:
पृथिवी सस्यशालिनी
देशोयं क्षोभरहित:
सज्जनः सन्तु निर्भया: ।”
Leave a Reply