आपल्याला आयुष्य जगण्यासाठी सद्य:स्थितीत पैसाच लागतो, पण जीवन आजमावण्यासाठी कोणाचीतरी साथ, सोबत, संगत लागत असते. “तुझं माझं जमेना, पण तुझ्याविना करमेना”, अशी स्थिती असली तरीही आपल्याला मान्य होतं. आपल्यापैकी प्रत्येकाला सहजीवनाची गरज भासतेच. कदाचित, प्रत्येकाची तशी मानसिकता आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांवर येत असेल.
अर्थात, प्रत्येकाच्या मानसिक पातळींवर होत असलेल्या निरनिराळ्या स्थित्यंतरांवर ही गरज कमी-अधिक होत असेल. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अथवा शारीरिकदृष्ट्या जरी एकटं आयुष्य जगणं एखाद्यानं पसंत केलं अथवा स्वीकारलं तरीही त्याला मानसिकदृष्ट्या काहीवेळा, काहीबाबतीत जाणवणारा एकलेपणा मात्र आंतरिक अस्वस्थता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो, मानसिक ताण-तणावाचा अनाकलनीय दबाव उत्पन्न होत राहतो.
प्रत्येक व्यक्तीला सहजीवनाची गरज, ही मानसिक पातळीवर अधिक आवश्यक असते. सहजीवनाच्या प्रवासाचा तेव्हाच प्रयास वाटत नाही, जेव्हा सकारात्मक दृष्टीकोनातून तो केला जात असतो. आपल्या सुख-दु:खांत, आयुष्यातील चढ-उतरांत सह-प्रवासी देखील आपली साथ-सोबत करणारा असणं योग्य ठरतं. ती साथ-सोबत देखील “जीवन के साथ भी; जीवन के बाद भी”, अशीच असणं अभिप्रेत असतं.
सकारात्मक सहजीवन जगता येणं ही केवळ कला नसून ते एक शास्त्र आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. ह्या शास्त्रात संवाद, सहवास, सहभाग, सहकार आणि सम-भोग या बाबींचा कृतीशील विचार करावा लागतो, त्यांचा अंगीकार करणं आवश्यक ठरतं.
सहजीवन सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी साथ-सोबत करणाऱ्या प्रत्येकानं कर्तव्यापोटी स्वीकारलेली जबाबदारी समसमान घेतलेली असणं अभिप्रेत आणि अपेक्षित असतं. तशी जाणीव होणं महत्वाचं ठरतं.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply