गेल्या पस्तीस वर्षांच्या आमच्या जाहिरातीच्या व्यवसायात आजपर्यंत शेकडोंनी माणसं भेटली. त्यातील काही उदयास येणारे नाट्य कलाकार, सिने कलाकार, नाट्य निर्माते, चित्रपट निर्माते होते. त्यांची ती ‘सुरुवात’ होती. खूप मोठी स्वप्नं उराशी बाळगून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं होतं. त्यातील काही यशाच्या शिखरावर पोहोचले..तर काहींनी येणाऱ्या अडचणींवर मात करता न आल्याने आपला मार्गच बदलला.
१९९० च्या सुमारास एक पंधरा सोळा वर्षांचा खेडवळ तरुण मुलगा आमच्या ऑफिसमध्ये आला. त्याला ‘मनोरंजन’च्या मोहन कुलकर्णीने डिझाईसाठी, आमचा पत्ता दिला होता. अत्यंत साध्या कपड्यामधील त्याला पाहून, हा कोणत्या कामासाठी आपल्याकडे आला असेल? याचा विचार मी करु लागलो. त्याने बोलायला सुरुवात केली, ‘माझं नाव मंगेश हाडावळे. मला एकपात्रीचा प्रयोग करायचा आहे. त्यासाठी मला आपणाकडून पेपरसाठी डिझाईन करुन पाहिजे.’ त्याने स्वतःच एकपात्रीच्या प्रयोगाचं स्क्रिप्ट लिहिलं होतं. ‘अंतरीच्या नाना कळा’ नावाने त्याला तशी जाहिरात करुन हवी होती. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला आम्ही सिंगल कॉलम जाहिरात करण्याचा सल्ला दिला. त्याने दिलेला फोटो वापरुन आम्ही डिझाईन तयार केले. प्रयोग टिळक स्मारक मंदिरमध्ये होणार होता. ठरलेल्या दिवशी पेपरमध्ये मंगेशची जाहिरात छापून आली. मात्र कोणत्या तरी अपरिहार्य कारणामुळे मंगेशचा, तो एकपात्रीचा प्रयोग रद्द झाला. ही गोष्ट आम्हाला समजल्यावर अतिशय वाईट वाटले. एका उदयोन्मुख एकपात्री कलाकाराच्या स्वप्नाचा अशाप्रकारे हिरमोड झाला होता.
दरम्यान अनेक वर्षे निघून गेली. आम्ही आमच्या व्यवसायात व्यस्त झालो होतो. २००८ साली वर्तमानपत्रात ‘टिंग्या’ चित्रपटाची जाहिरात पाहिली आणि दिग्दर्शक म्हणून ‘मंगेश हाडावळे’चं नाव वाचून अठरा वर्षांपूर्वीचा मंगेश आठवला.
‘साकव’ म्हणजे छोटा पूल. कोकणात पायी प्रवास करताना वाटेत असे अनेक पाण्याच्या ओहोळांवर बांबू टाकून केलेले साकव आडवे येतात. त्यावरुन पलीकडे गेलं की, पुन्हा सपाट जमीन लागते. अशाच प्रकारच्या आमच्या ‘साकव’ वरुन पुढे गेलेला अठरा वर्षांपूर्वीचा मंगेश, आज ‘टिंग्या’ या मराठी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहून दिग्दर्शकही झाला होता. ‘टिंग्या’ चित्रपटाचं समीक्षकांनी, सिने जगतातील मान्यवरांनी कौतुक केलं. मंगेशच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यातील बालकलाकार व दिग्दर्शक म्हणून मंगेशला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
असाच अजून एक एकपात्री कलाकार आम्हाला भेटला. त्याचं नाव ‘एन. अशोक’! हा १९८५ च्या दरम्यान नारायण पेठेतील ‘जित’ हॉटेलचं किचन सांभाळायचा. चहा व इतर खाद्यपदार्थ करण्यात त्याचा हातखंडा होता. तो मूळचा कोल्हापूरचा. लहानपणीच घरातून बाहेर पडला व पुण्यातील हॉटेलमध्ये काम करत नाटकाची स्वप्नं पाहू लागला. ‘हा दैवगतीचा फेरा’ हे नाटक त्याने स्वतःच लिहिलेलं होतं. पैशाची जमवाजमव करुन त्याने टिळक स्मारक मंदिरात नाटकाचा प्रयोग निश्र्चित केला. डिझाईनसाठी तो आमच्याकडे आला, डिझाईन झाले. या नाटकात वसंत शिंदे, मंजुषा सोनंदकर, एन. अशोक व इतर अनेक कलाकार होते. प्रयोगाला आम्ही गेलो होतो. प्रयोग छान झाला. त्यानंतर काही वर्षे एन. अशोक दिसलाच नाही. नारायण पेठेतून जाताना ‘जित’ हॉटेलकडे पाहिलं की, त्याची आठवण येत असे. आठ वर्षांनंतर कोल्हापूरहून एन. अशोकचा फोन आला. त्याला त्याच्या एकपात्रीचं व्हिजिटींग कार्ड करुन घ्यायचं होतं. ठरलेल्या दिवशी तो आला. येताना त्याने स्वतःचं फोटोसेशन करुन काढलेले फोटो आणले होते. आता पी. अशोक आधुनिक पेहरावामुळे स्मार्ट दिसत होता. गेल्या काही वर्षांत त्याने कोल्हापूर मध्ये एकपात्रीचे अनेक प्रयोग करुन जम बसवला होता. व्हिजिटींग कार्ड तयार होईपर्यंत त्याने पुण्यातच मुक्काम केला. सहजच एन. अशोक पूर्वी काम केलेल्या ‘जित’ हॉटेलमध्ये गेला. मालक आणि त्याचे सहकारी मित्र त्याला भेटून खूष झाले. त्याने किचनमध्ये गेल्यावर पाहिलं की, पूर्वी त्यानं चहा करताना जे साखर, पावडरचं प्रमाण पूर्वी ठरवलेलं होतं, त्याच प्रमाणानुसार आताची मुलं चहा करीत होती. ते पाहून एन. अशोक मनोमन सुखावला. कार्ड तयार झाली. एन. अशोकला कार्ड फार आवडली. ज्या कामासाठी पुण्याला तो आला, ते काम मनासारखं झाल्याचं त्यांच्या नजरेवरुन दिसत होतं. कधी कोल्हापूरला आलात, तर मला अवश्य फोन करा. असं सांगून एन. अशोक निघून गेला. आज या गोष्टीला वीस बावीस वर्षे होऊन गेली. नारायण पेठेतील ते ‘जित’ हॉटेल पाडून तिथं आता नवीन टोलेजंग इमारत उभी आहे. एन. अशोक देखील असंच टोलेजंग यश मिळवून एव्हाना नक्कीच स्थिरस्थावर झालेला असेल.
पस्तीस वर्षांच्या कालावधीत अनेक मान्यवर एकपात्री कलाकारांची आम्ही डिझाईन्स केली. त्यामध्ये बण्डा जोशी, दिलीप हल्याळ, संतोष चोरडिया, प्रभाकर निलेगावकर, दिपक रेगे, विश्र्वास पटवर्धन, मकरंद टिल्लू, श्रीप्रकाश सप्रे, सुरेश ठुमकर, महेंद्र वाकोडकर असे अनेक आहेत. या सर्वांचे आम्ही ‘साकव’ झालो आहोत, याचं आम्हाला मनस्वी समाधान आहे.
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
४-६-२१.
Leave a Reply