त्या सात वर्षांच्या काळात बरंच काही घडलं ,घडवून आणलं. त्याची संगीताच्या भाषेत ही Medley ! खरं तर यातील प्रत्येक अनुभवावर स्वतंत्र पोस्ट होऊ शकेल पण-
१) सध्या गणेशोत्सव सुरु आहे. म्हणून पटकन मनाच्या पृष्ठभागावर आलेली ही आठवण- एका गणेशोत्सवात मला आणि माझ्या पत्नीला स्थानिक पोलिसांनी विनंती करून परीक्षक पदाचे काम दिले होते. पोलिसांच्या जीपमधून काही गणेश मंडळांना आम्ही भेट दिली,गुणांकन केले आणि सबमिट केले त्या स्पर्धेच्या संयोजकांना ! पुढे काय झाले,कल्पना नाही.
२) इस्लामपूरला अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवावे असा त्यावेळी विचार होता. पुण्याला म.सा.प. मध्ये जाऊन शाखा उघडण्याची प्रोसेस जाणून घेतली. एका आठवड्यात ५० आजीव सदस्य (त्याकाळातील वर्गणी फक्त २००/) तयार करून पुण्यात दहा हजार रु भरले. म. सा .प . च्या वतीने बनहट्टी आणि फडणीस इस्लामपूर शाखेच्या उदघाटनाला आले होते. वृत्तपत्रात ही बातमी वाचून चक्क सुप्रसिद्ध लेखक रमेश मंत्री कोल्हापूरहून त्या कार्यक्रमाला आले. मग कळलं त्यांना अखिल भारतीयच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रस होता. इस्लामपूर शाखा सुरु झाली,एक विभागीय साहित्य संमेलनही झाले. त्यासाठी ज्येष्ठ लेखक रंगनाथ पाठारे आले होते. अ. भा. सा.संमेलन मात्र आजतागायत झालेले नाही.
३) कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाचा यूथ फेस्टिव्हल असायचा. त्याचा विभागीय दोन दिवसांचा फेस्टिव्हल आम्ही महाविद्यालयात आयोजित केला होता. मा. सिंधुताई सपकाळ, डॉ धनंजय गुंडे, डॉ लीना मोहाडीकर अशा नामवंत वक्त्यांना ऐकण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.
४) पालक-शिक्षक संघाचे रौप्य महोत्सवी संमेलन आयोजित करण्यात राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीने पुढाकार घेतला होता. त्या उपक्रमाची स्मरणिका काढण्याची जबाबदारी माझ्यावर होती. पुण्याला जाऊन गो. नी. दांडेकर, यदुनाथ थत्ते या पूर्वसूरींना भेटून त्यांचे शुभेच्छा संदेश मला आणता आले.
५) वाळवा तालुका अपलिफ्टमेन्ट हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यावेळी हाती घेतला होता. मुंबईहून भाऊसाहेब नेवाळकर आणि त्यांची टीम दरमहा येत असे आणि अनेक सामाजिक उपक्रमांना त्यामुळे तालुक्यात चालना मिळाली होती.
त्यासाठी मी, सुनील कुलकर्णी सर, ग्रामोपाध्ये सर आम्ही प्राचार्य जोगळेकर आणि प्रबोधिनीचे प्रा.शामराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असू. प्रबोधिनीच्या वतीने दशरथ पाटील सर्व मदत करीत.
६) विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी आम्ही क्वालिटी सर्कल ही संकल्पना राबविली होती. हे सगळे स्व-विकासाचे प्रयत्न होते- काहीसे काळाच्या पुढे!
७) एच जी पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली TCPC सुरु केलेले होते. महाविद्यालयाचे, वसतिगृहाचे लोखंडी,लाकडी फर्निचर तेथे तयार केले गेले. स्पार्क नावाच्या सर्व्हीस स्टेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकं आणि दुचाकी/चारचाकी गाड्यांचे सर्व्हिसिंग, दुरुस्ती काम केले जायचे.
आणि असं खूप काही -संस्मरणीय, शिकवणारं, घडवणारं म्हणूनच आजही १९९३ साली मी तेथून राजीनामा देऊन बाहेर पडलो तरी आतमध्ये साठलेलं !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply