सखू ग सखू, कुठं चाललीस?
बाजारात जाते, बाजारहाट करते
भाजीपाला आणते,फळबिळं आणते
अंगडे टोपडे बघते,बाळा खाऊ घेते
सखू ग सखू, कुठं चाललीस?
पाचदहा रूपये घेते, दुकानात जाते
गंध पावडर आणते,फणीबिनी बघते
साबणतेल आणते,बाळा न्हाऊ घालते
सखू ग सखू, कुठं चाललीस ?
दवाखान्यात जाते,डाक्तरला दावते
दवापाणी घेते, डिकमली बघते
गुट्टीबिट्टी लावते,बाळाला लई जपते
सखू ग सखू, कुठं चाललीस?
माहेराला जाते,आईबाबांना पाहते
दोनचार दिस राहते, वहिनीस बोलते
बाळाला मामा दावते, गावमळा पाहते
सखू ग सखू, कुठं चाललीस ?
मराठी शाळेत जाते, गुरूजींना बोलते
जन्मतारीख सांगते,पतीचं नाव घेते
बाळाच नाव घालते, माणूस बनवते
— विठ्ठल मारूती जाधव
शिरूरकासार जि.बीड
सं.९४२१४४२९९५
Leave a Reply