महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सख्खा भाऊ आपल्या सख्ख्या बहिणीचा तिने प्रेम विवाह केला म्हणून ती दोन महिन्याची गरोदर असताना तिचे शीर कोयत्याने धडावेगळे करून खून करतो आणि त्या कापलेल्या शिरासोबत सेल्फी काढतो. या सगळ्यात त्याची आई सोबत असते. आणि हे करायला त्याच्या वडिलांनी त्यांना प्रेरीत केलेले असते. ह्या संदर्भातील बातमी वाचताना अंगावर अक्षरशः काटा उभा राहात होता. जग मंगळावर चाललेले असताना आपण कोठे चाललो आहोत ? त्या बहिणीने असा काय मोठा गुन्हा केला होता ? फक्त प्रेम विवाह तर केला होता ! त्यांनी प्रेम विवाह केल्यामुळे त्यांच्या घरण्याची अशी काय ती अब्रू गेली ? अजून किती वर्षे ही अशी लोक आपली बेगडी अब्रू कुरवाळत बसणार आहेत. त्या मुलाच्या आई – बापाला एक वेळ अक्कल नव्हती असे गृहीत धरू पण आपल्या सख्ख्या बहिणीच शीर कापून त्यासोबत सेल्फी काढण्या इतकी क्रूरता एखाद्या आतंकवादी तरी दाखवू शकेल याबद्दलही शंका निर्माण व्हावी इतके हे क्रूर कृत्य आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण संकटसमयी आपल्या भावाने आपले रक्षण करावे म्हणून त्याला राखी बांधते…या बहिणीनेही त्या भावाला राखी बांधलीच असेल नाही ? तो भाव समजा इतका क्रूर असेल पण त्याला साथ देणारी आई आणि हे कृत्य करायला प्रवृत्त करणारे वडील ते किती क्रूर असतील याची कल्पनाही करवत नाही. अगदी पक्षी प्राणीही त्यांची पिल्ले जरा मोठी झाली की त्यांना मोकळं सोडतात आणि त्यांच्या आयुष्यात कोणतीही ढवळाढवळ करत नाहीत. पण सर्वात बुद्धिमान मनुष्यप्राणी त्यांच्या या कृतीतून बोध घाययला विसरला आणि गुंतून पडलाय खोट्या अब्रू-प्रतिष्ठेच्या जाळ्यात. अजून किती वर्षे पालक आपल्या पाल्याच्या आयुष्याचे त्याच्या जोडीदार कोण, कसा असावा याचे निर्णय घेत राहणार आहेत ? सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तिच्या भावाची जी विकृत मानसिकता आहे तिचा जन्म कोठे झाला जिने त्याला त्याच्या सख्या बहिणीचा खून करण्यास प्रवृत्त केलं ! त्या मानसिकतेचे उगम स्थान शोधून ते वेळीच नष्ट करायला हवं नाही का ?
लेखक :- निलेश बामणे
Leave a Reply