नवीन लेखन...

“सख्खे शेजारी”

खूप वर्षांपूर्वी कुठंतरी वाचलं होतं, ‘शेजारी’च आपला खरा ‘पहारेकरी!’ जुन्या काळी चाळींमध्ये राहणारी माणसं एकोप्याने नांदायची. प्रत्येक कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्याचं आपुलकीने लक्ष असायचं. जमाना बदलला. आता चाळी पाहायलाही मिळत नाहीत. आम्ही मात्र भाग्यवान! ‘गुणगौरव’ मध्ये आल्यावर पहिल्या दिवसापासून आम्हाला ‘ओक’ कुटुंबाचा ‘शेजार’ मिळाला.
आम्ही जेव्हा ऑफिस सुरु केले, तेव्हा ओकांचे वय पंचावन्न असावे व त्यांच्या पत्नीचे पन्नाशीच्या आसपास. त्यांना मुलबाळ नव्हते. ओक हे मध्यम प्रकृतीचे, साडेचार फुट उंचीचे, डोक्यावरील केस मागे वळविलेले, अंगात हाफ शर्ट, खाली पॅन्ट व पायात चप्पल असे साधेसुधे होते. त्यांचा चेहरा भोळाभाबडा दिसायचा. दाढी आठवड्यातून एकदा करायचे. बोलताना नेहमी ते अडखळायचे आणि गोंधळलेले असायचे. त्यांची पत्नी भोळी नव्हती, हुशार होती. मात्र एखादी गोष्ट सांगताना तिला अवघड जात असे. ती समोरच्या व्यक्तीकडे टक लावून पहात असे, त्यामुळे समोरची व्यक्ती संभ्रमात पडायची की, ही अशी का पहाते?
ओकांना तीन भाऊ होते. त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना सरकारी नोकरीत शिपाई म्हणून लावले. निवृत्त होईपर्यंत ते बढती मिळून नाईक झाले. त्यांचे साहेब फार हुशार होते. त्यांनी ओकांच्या भोळेपणाचा फायदा घेतला. ओक कामावर आले की, त्यांची मस्टरमध्ये सही झाल्यावर साहेब त्यांना आपल्या घरची कामे करण्यासाठी घरी पाठवत असत हे ओकांनी कधीही कुणालाच सांगितले नाही. त्यांच्या ऑफिसमधीलच एकाला त्यांच्याबद्दल दया आली आणि त्याने वरिष्ठांना निनावी पत्र पाठवून ही गोष्ट उघडकीस आणली. साहेबांची तंतरली. त्यांची चौकशी सुरू झाली. तेव्हापासून निवृत्त होईपर्यंत साहेबांनी ओकांना अतिशय प्रेमाने वागवले.
ओकांचे वडील त्यांच्या लहानपणीच गेले होते. त्यांची आई एक दोन महिन्यांनी, महिनाभरासाठी मुक्कामाला ओकांकडे यायची. ती आल्यानंतर ओकांना फार आनंद होत असे, कारण ते मातृप्रेमी होते. त्यांच्या पत्नीला स्वयंपाकात आईंची मदत होत असे. आमच्या आॅफिसमध्ये कोणी बसलेले नसेल अशावेळी आई येऊन बसायच्या. त्यांना गप्पा मारण्याची फार आवड. त्या जुन्या गोष्टी सांगताना रंगून जायच्या. मग दुपारी चार वाजता चहा केला की, आम्हा दोघांना त्या चहासाठी बोलवायच्या. त्यांच्याकडे छोटा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. एखादा विशेष कार्यक्रम असेल तर आम्ही आॅफिसला कुलूप लावून त्यांच्याकडे टीव्ही पहायला जायचो.
त्यावेळी ‘घरदार’ नावाचे एक मासिक निघायचे. आम्ही त्याची वार्षिक वर्गणी भरुन ते चालू केले. त्यामुळे दर महिन्याला अंक येऊ लागला. बारा अंक झाल्यानंतरही अंक येत राहिला. एकदा आम्ही कुलूप लावून बाहेर गेलेलो असताना अंक द्यायला तो माणूस ओकांकडे गेला. ओकांनी शांतपणे अंक घेणे अपेक्षित असताना ते नको ते बोलले, ‘नावडकर इथे नाहीत, तुम्ही अंक आमच्याकडे देऊ नका.’ त्या दिवसापासून ‘घरदार’ बंद झाला. बरं, त्यांना या बद्दल बोलून, रागावून काही एक उपयोग होणार नव्हता. आम्ही शांतच राहिलो.
ओकांची आई रहायला त्यांच्याकडे आल्यावर त्यांचे दोन भाऊ सपत्नीक आईला भेटायला यायचे. त्यातील धाकटा भाऊ आपल्या दहा वर्षांच्या मुलाला बरोबर घेऊन येत असे. तो मुलगा अतिशय खोडकर होता. ओक बाथरूममध्ये गेल्यावर तो बाहेरून कडी लावत असे. ओकांचा ‘आकांत’ ऐकून त्यांची पत्नी दरवाजा उघडून नवऱ्याची ‘सुटका’ करीत असे.
ओक निवृत्त झाले. आता त्यांचा दिनक्रम बदलला. सकाळी ते मोठ्या भावाकडे शनिवार पेठेत जाऊन यायचे. जेवणानंतर झोप. चार वाजता उठल्यावर चहा पिऊन दोघेही भाजीराम मंदिरात जायचे. संध्याकाळी सात वाजता परतल्यावर टीव्ही बघत सकाळीच तयार केलेलं जेवण करून नऊ वाजता झोपी जायचे. वय झाल्यामुळे त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला होता. त्यासाठी मोठ्या भावाने डाॅक्टरांना दाखवून गोळ्या सुरु केलेल्या होत्या. मात्र ओकांना त्या गोळ्या घ्यायला नकोशा वाटायच्या. ते टाळाटाळ करायचे. एकदा त्यांनी भावाला गोळ्या महिनाभर घेतल्या असं खोटं बोलून सर्व गोळ्या कचऱ्याच्या डब्यात टाकल्या. परिणामी त्यांना बाहेर गेल्यावर चक्कर आली व ते रस्त्यात पडले. त्यांना दवाखान्यात नेले. उपचार केले. काही दिवसांनी बरे झाल्यावर घरी आणले.
आता ते घरातून बाहेर पडेनासे झाले. प्रत्येक भाऊ येऊन चौकशी करुन जाऊ लागले. आई तर मुक्कामीच आली. ओकांची तब्येत खालावली. महिनाभराने त्यांना पुन्हा ॲ‍डमीट केले. चार दिवसांनी ओक इह’लोक’ सोडून गेले. एक ‘गुणी’ भाबडा माणूस गुणगौरव मधून वजा झाला…
ओक गेल्यानंतर त्यांच्या ‘पत्नी’चं काय करायचं? हा प्रश्र्न त्यांच्या बंधूंना पडला. शेवटी सर्वानुमते त्यांना महिलाश्रमात ठेवण्याचे नक्की ठरले. ओकांच्या पेन्शनमध्ये तिचा खर्च भागू शकत होता. सहा महिन्यांच्या फरकाने पत्नीही गेली. ‘गुणगौरव’ मधील सभासदांतून एक नाव कमी झाले…
ओक पती-पत्नी गेल्यावर त्यांची खोली विकण्याचा पुढाकार त्यांच्या मोठ्या पुतण्याने घेतला. अनेक जण चौकशी करीत होते. त्याला किंमत जास्त हवी होती. शेवटी एक बिहारी ‘भैय्या’ त्या किंमतीला तयार झाला. त्याने व्यवहार पूर्ण करुन एका व्यापाऱ्याला ती खोली गोडावून म्हणून भाड्याने दिली. आता महिन्यातून एखादे दिवशी टेम्पो येतो. मालाचे गठ्ठे त्या खोलीत ठेवले जातात. पुन्हा ती खोली बंद केली जाते. ओकांचा आम्हाला एक शेजारी म्हणून जिवंत आधार होता, तिथं आता निर्जीव वस्तूंचे गठ्ठे रचलेले आहेत.
परवा फिरायला बाहेर पडल्यावर एक मोटर सायकल कच्चकन ब्रेक दाबून माझ्यासमोर उभी राहिली. मी गडबडलो. त्या मोटरसायकलवरील तरुणाने मला विचारले, ‘काका,ओळखलंत का मला?’ मला गुणगौरव मधील बाथरूमला बाहेरुन कडी लावून काकांना सतावणारा माधव आठवला. ‘अरे माधव, किती मोठा झालास तू? कसा आहेस?’ असं मी विचारल्यावर तो आनंदला. ‘बी.इ. करुन एका कंपनीत नोकरीला आहे.’ असं त्यानं सांगितलं. मला फार आनंद झाला. एवढासा माधव किती मोठा झाला…काळ कुणासाठी न थांबता वेगाने धावत असतो. आपण मात्र जुन्या आठवणींमध्ये लांब मागे राहतो…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१९-८-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..