सु शि (सुहास शिरवळकर) यांनी खूप पूर्वी एक चमत्कृतीपूर्ण प्रश्न विचारला होता एका कादंबरीत – ” महाराष्ट्रात डी. वी. कुळकर्णी नांवाचे एक महान संत होऊन गेलेत. ओळखा पाहू? ”
आणि त्यांनीच पुढे उत्तर दिले होते- ज्ञानेश्वर विठ्ठल कुळकर्णी !
कार्तिक कृष्ण त्रयोदशीला त्यांचा समाधी सोहोळा संपन्न झाला.
दोन आर्त गीते आहेत विव्हळ करणारी-
१) समाधी घेऊन जाई ज्ञानदेव (सुमन ताईंचे) आणि
२) आता लावा लावा शिळा (उषाताईंचे)
पहिल्या गीतात वैष्णवांच्या मेळाव्यात समाधीस्थळाकडे निघालेल्या माउलींना बघून साऱ्यांच्या मनात उमटलेले हलकल्लोळ आहेत. उपस्थित समाजाच्या भावभावनांचा उदगार आहे. भावंडांचे कढ आहेत. आणि योगीराजाच्या समाधीच्या निर्णयाचा मूक स्वीकार आहे. पण हे त्रयस्थाचे निवेदन (आँखो देखा टाईप)आहे.
दुसरे गीत खुद्द माऊलींचे आर्जव आहे. तेथे स्थिरभाव आणि समाजाप्रती कणव आहे. पूर्वनियोजित अवतार समाप्तीची घोषणा केल्यावर तिच्या अंमलबजावणीचा कठोर निर्धार आहे तरीही शब्द मृदू आहेत.
दोन्ही गाण्यांमध्ये एकसमान रिक्त पोकळी आहे. ती भरून काढण्यासाठीच बहुधा वारकरी आषाढी-कार्तिकी वारी करीत असतील. आणि माउलींच्या कुशीत जीवनसार शोधत असतील.
गेली दहा वर्षे (कोरोना कालावधीचा अपवाद वगळता) आळंदी जवळच्या मरकळ येथील एका कंपनीत मी सल्लागार म्हणून जातो. न चुकता पुलावरून कळसाला जात-येता हात जोडतो. शांत वाटते. आताही मागील शुक्रवारी त्या कंपनीत जाताना खंड भरून काढला. आणि लवकरच नवा अध्याय सुरु होईल अशी लक्षणे आहेत.
त्र्यंबकेश्वर (सीएट नाशिक मुळे) बरेचदा झाले. मुक्ताई तर घरचीच म्हणून लहानपणापासून एदलाबादला जाणे झालेय. सासवडला सोपानकाकांच्या भेटीला फक्त एकदाच गेलोय. आणि हो, या भावंडांच्या वास्तव्याच्या खुणा बाळगणारे पैठण आणि नेवासे अजून राहिलेय. नुसते नियोजन सुरु असते पण——
के एस बी त असताना आमच्या एका चेन्नई स्थित सहकाऱ्याला मी आळंदीला घेऊन गेलो होतो, त्याला उत्सुकता होती म्हणून ! समाधी मंडपातील पायरीजवळ तो थबकला. म्हणाला- ” मला इथे कंपने (VIBRATIONS) जाणवताहेत.” मी त्याला संजीवन समाधीची संकल्पना समजावून सांगितली. आजतागायत दरवेळी आळंदीला माउलींच्या दर्शनाला गेलो की मला ते जागृतपण जाणवते. हीच स्पंदनं मला भगूरच्या सावरकर वाड्यात जाणवली होती. आणि खात्री आहे की जेव्हा केव्हा मी अंदमानची कोठडी बघायला जाईन आणि कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक बघायला जाईन तेव्हाही असेच रोमांच जाणवतील.
या चारही भावंडांनी आपलं जीवन संपन्न करून टाकलंय. त्यांच्या आशीर्वादांची पाखरं सातशेहून अधिक वर्षे आपली आभाळं व्यापून आहेत.अजून काय हवं ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply