नमस्कार मित्रहो,
भरतभूमी ही देवदेवतांची संतमुनी ऋषि यांची जन्मभूमी आहे. हा प्राचीन इतिहास आहे. वेदकालीन प्राचीन पारंपारिक ग्रन्थसंपदेमधुन याचा उल्लेख आपल्या निदर्शनास येतो.प्राचीन भारतिय संस्कृतिचे,संस्कारांचे, अध्ययनाचे, मानवी जीवनाचे यथार्थ वर्णन या प्राचीन प्रातिधिनिक ग्रन्थामधुन दृष्टोतपत्तीस येते…याचे विवेचन करणे म्हणजे एक ग्रँथनिर्मितिच!
असो…..
महाभारतातील पांडव श्रेष्ठ ” युधिष्ठिरयाला यक्षाने एक प्रश्न विचारला धर्मराज..का दिक ? म्हणजे दिशा कोणती ? या प्रश्नाला अत्यंत नम्रतेने धर्मराजाने यक्षाला अत्यंत सुंदर मननिय असे उत्तर दिले आहे, ते म्हणजे….” संतो दिक म्हणजे सर्व संतमुनीऋषी यांनी दाखविलेली जी दिशा आहे,तीच खरी मानवी जीवनकल्याणप्रदी अशी दिशा आहे…या उत्तरातूनच संतमुनीऋषी यांचे सारे वाङ्गमय म्हणजे समाजातील जडणघडणीतील अनमोल योगदान आहे,असे म्हणावे लागेल.
विविध धर्मग्रन्थ, रामायण, महाभारत, भागवत, गीता,ज्ञानेश्वरी, सर्व संत वाङ्गमय, सर्व संतचरित्र, यामधुन धार्मिक, पारमार्थीक,सामाजिक, वैयक्तिक, अशा पातळीवर विविधअंगानी कल्याणकारी दिशात्मक मार्गदर्शन केलेले आढळून येते.
वेदकालीन भारतीय संस्कृती व सांस्कृतिक जीवनाचे मुळ हे अतीप्राचीन वेदकालीन वैदिक वाङ्गमय असल्याचे जाणवते. जैन,बौद्ध या धर्मांच्या सकारात्मक उपदेशातही मोठ्या प्रमाणात वैदिक विचार साधना आहे असे प्रत्ययास येते. आणी ती वाङ्गमय संपदा ही त्या त्या काळातील प्रचलित लोकभाषेतच वर्णीलेली दिसते. संतपरंपरेतील निर्माण झालेले सारे साहित्य वाङ्गमय हे मनुस्मृति,रामायण, महाभारत, भगवतगीता, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा इत्यादी साहित्यसंपदेतून वैदिक विचारांचाच प्रकर्षाने प्रभाव जाणवतो…..संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या वांगमयात वेदनिष्ठाच वर्णन केली आहे…..
प्राचीन युगात अवतरलेल्या संतऋषीमुनींनी मानवी जीवनातील शाश्वत, चिरंजीवी अशी ईश्वरविषयक भावना जागृत करता येते. आणी प्रत्येक जीवात्मा हा दिव्यस्वरूपअसून त्यामध्ये भगवंताचा वास आहे,अंश आहे सिद्ध केले आहे..भारतीय संस्कृतिचा सात्विक प्रभाव हा संत वाङमयातून दिसून येतो. त्या त्या कालावधीतील पारंपारिक प्रचलित विविध लोकभाषामधुनच सर्व संतांनी प्रापंचिक व पारमार्थिक दृष्टीने संस्कृतिला अनुसरून संस्कार सुलभ अशा शाश्वत भक्तीमार्गाचा उपदेश समजावून सांगण्यासाठी वैचारिक असे दृष्टांतप्रणीत तसेच सत्यसिद्धांत वाङ्गमय निर्माण करून सकल संतांनी सर्व समाजाला प्रबोधन करून सावरलेले आहे..अत्यंत बिकट व विपरीत परिस्थितीत समाजाच्या मनोबलाचे धैर्य व मानसिक संतुलन टिकविण्याचे कार्य संतांनी केले असुन आपल्या भारतीय मुळ संस्कृतिला घट्ट बांधून ठेवण्याचे कार्य केले आहे.
सर्वच संतांच्या कडून म्हणजे “ज्ञानेश्वर माउली, एकनाथ,तुलसीदास, नामदेव तुकाराम,रामदास, गुरुनानक, नरसी मेहता, चोखामेळा, नरहरी सोनार,गोराकुंभार, साईबाबा, दासगणू, स्वामिसमर्थ, गोंदावलेकर महाराज, गाडगेमहाराज, अशा कित्येक संतांनी समाजजागृतीचे महनीय कार्य केले आहे. भारतीय प्राचीन संकृतीपरंपरेचे आपल्या वाङमयीन उपदेश प्रणालीतून प्रबोधन केले आहे. संत म्हणजे सद्गुणांचा महासागर, संतत्व म्हणजे निर्मोही तत्व, सन्त म्हणजे मानवी रूपातील भगवंत की जो सकल समाजाचा पुत्रपद कल्याणाचाच विचार करतो. हे सर्व संतांच्या वांग्मयातून जाणवते. भक्ती,श्रद्धा, ज्ञान, विज्ञान या साऱ्याच गोष्टि जीवसृष्टिच्या कल्याणासाठीच आहेत, विध्वंसासाठी नाहीत. ईश्वराने मानवाला सर्व सद्गुणांसोबत विवेक बुद्धि दिली आहे….म्हणून तो सकल जीवसृष्टित श्रेष्ठ आहे. त्यामुळे विवेकाधिष्टित विचार प्रणालीचे यथायोग्य अर्थपूर्ण विवेचन, तर्कशुद्ध दृष्टांत या संत वांग्मयाद्वारे केलेले दिसून येते आणी त्यातून संतपरंपरचे समाजातील जडणघड़णीला संस्कारित करणारे वांग्मयीन प्रबोधात्मक कार्य प्रकर्षाने नजरेत भरते.
भरतभूमीमध्ये अनेक पारमार्थिक संप्रदाय निर्माण झाले! परंतु समाजावर सर्वात मोठा प्रभाव हा भागवत धर्माच्या वारकरी संप्रदायाचा दिसून येतो. तेथे पूर्णत्वाने मानवीय एकत्वाची अनुभूती येते…मनु,मानव हीच एकमेव ईश्वरीय निर्मित जात आहे. अशी अद्वितीय मनुतत्वाची जाणीव या भागवत संप्रदायातून होते.
परंपरेने चालत आलेली ही अखंड संतपरंपरा लोकमनाला अत्यंत सरळ,सोप्या,संस्कारित,..सदविवेकी भक्तीभावनांनी लोकभाषेतीलच पारमार्थिक साहित्यवांगमयाने सदाचाराच्या मार्गावर सातत्याने पुढे नेत राहिली आहे..!
जगतगुरु आदिशंकराचार्यान्चे अद्वैत तत्वज्ञान, गीता,भागवत, ज्ञानेश्वरी,गाथा अशा अनेक वंदनीय ग्रन्थामधून थोर संतमहात्मयांची विचारधारा अखंड वहात राहिली आहे.हेच तर भरतभूमिचे सदभाग्य असून विलोभनिय भूषण आहे…..
प्राचीन ग्रन्थ म्हणजे रामायण महाभारत हे एक सुंदर कमळ आहे तर श्रीमत भगवत गीता म्हणजे त्या कमळाच्या सर्वाथाने विलोभनिय संस्कारित पाकळया आहेत. आणी त्या पाकळयातील जो मधुर मकरंद आहे तो म्हणजे ” *ज्ञानेश्वरी आहे. आणी ज्ञानेश्वर माऊलीने तो मकरंद कसा सेवन करावा याचे सखोल मार्गदर्शन समाजाला अत्यंत सुलभ भाषेत ज्ञानेश्वरी मद्धये केलेले आहे.
भागवत धर्माचा मुळ पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरआपल्या विलक्षण अलंकारित प्रतिभा सामर्थ्यात सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांचा ज्ञानेश्वरी ग्रन्थ हा जगातील सर्व भाषेतील श्रेष्ठ असा साहित्यकौस्तुभ मुकुटमणी आहे. ज्ञानेश्वरांचे भक्त संत नामदेव महाराज यांचे प्रचार सामर्थ्य अलौकिक आहे. त्यांनी त्यांचे विचार रुजविणयाचे सामाजिक प्रबोधनाचे कार्य.. पंजाब,राजस्थान,हरियाणा, उत्तरप्रदेश या ठिकाणी केले आहे हा इतिहास आहे. शिखांच्या गुरुग्रन्थ साहिब या अनमोल ग्रन्थामध्ये संत नामदेवांचे चौसष्ठ अभंग आहेत….ज्ञान,कर्मकांड, भक्ती व योग,श्रद्धा,प्रचिती या सर्वांगी विचारधारांनी परिपूर्ण असे परमार्थ साधण्यास सुलभ असे लोककल्याणकारी संत वांग्मय संतांनीच निर्माण केले आहे…विशेष म्हणजे कृपाळू भगवंताविषयी अंतरिक तळमळीची शरणागत मनस्वी प्रार्थना हे जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील पुण्यप्रदी बलस्थान आहे.प्रपंचातील दयनीय दुरावस्था, शास्त्राध्यापनाचा अभाव,कुणीही मार्गदर्शक गुरु नाही, पण भगवंतावरील असीम निष्ठा, अत्यंत सात्विकता,पराकाष्ठेचा निःस्वार्थीपणा, निर्मोही जींवन,परोपकारी वृत्ती, आणी आत्मानुभूतितुन संत तुकारामांनी ईश्वर साक्षात्कार करून घेतला..आणी आत्मिक भक्ती तळमळीतून आपल्या प्रासादिक अभंगवाणीतुन गाथा लिहिली, आणी भागवत धर्माचा सर्वश्रेष्ठ असा तुका झालासे कळस हा बहुमान प्राप्त केला आहे…!
साऱ्या संतांचे समग्र वाङ्गमय म्हणजे आजच्या या कलियुगात सर्व समाजाला ” प्रचंड अशा जीवनमहासागरातील एका शाश्वत दीपस्तंभा सारखे मार्गदर्शक आहे हे निर्विवाद….!!!
ज्ञानेश्वर माउलींची प्रतिभा..!
नामदेवांचा प्रचार….!
संत एकनाथांचा प्रपंच…!
संत तुकारामांची तळमळ भक्ती…!
संत रामदासांची तपश्चर्या…!
या सर्वातूनच संतसाहित्यवाङमयनिश्चितच सामाजिक स्तरावर, समाजाच्या जडणघडणीवर तसेच समाज कल्याणाच्या विचारांनी प्रेरित असून सत्य मानवी धर्माची! मानवी नीतिमूल्यांची.! जाणीव करून देणारी अवीट अविरत प्रवाही वांग्मयीन गंगोत्री आहे..असे मला वाटते……!!!!!
याचाच अर्थ समाजाच्या जडण घड़णी मद्धये सर्व संतसाहित्य वांग्मयाचे मौलिक वरदान आहे. प्रत्येकाने हे संतसाहित्य खरे तर अवश्य वाचले पाहिजे. ते आत्ममुख करणारे आहे. सर्वच प्राचीन ग्रंथ, साहित्य हे नवोदित साहित्यिकांना वैचारिक प्रगल्भतेने अधिक सुंदर घडविणारे आहेत.माणुस हा वाचन,अभ्यास, मनन, चिंतन आणी लिखाणातून अधिक प्रगल्भ,समृद्ध होतो…आणी माणुस बनतो..घड़तो.!
साहित्यिकांनी लेखन करताना स्वानंदी निर्मिती असली तरी..परमानंदासोबत सर्वानंद निर्मिती कशी होईल याचाही विचार करावा.संतांचे साहित्य वाचल्यावर…ज्ञान,विज्ञान, धर्म, मोक्ष,मुक्ती, सद्गुणांची अनुभूति येते. निंद्य असणारे दुर्गुण कोणते यांचीही जाणीव सहज होते. आणी,निर्मोही,सत्यसाक्षी प्रसन्न परिपूर्ण जीवनाचा अर्थ समजल्या शिवाय राहणार नाही…..
सकल संत साहित्य वांग्मयाचे परिपूर्ण दर्शन हे अनादिकाळा पासून अखंड सुरु असलेल्या पंढरपुरच्या वारीतील..निर्मोही संतत्वाची,एकात्मतेचे दर्शन घड़विणारी आहे.त्या वारीतील दैनंदिन दिंडीउपासना ही संत मार्गदर्शक आहे. भजन,किर्तन, टाळ,मृदङ्ग, नामस्मरण, ओव्या,भारुडे, निरूपणे, अशा संत साहित्याचा आनंदोत्सव आहे..एक मानसिक मोक्षमुक्ती आहे..हेच समाजातील जडण घडणीचे मौलिक असे संतसाहित्याचे योगदान आहे…..
इतिश्री……
— वि.ग.सातपुते.
पुणे.
Leave a Reply