समर्थांनी मनावर भाष्य करणारे २०५ श्लोक लिहिले त्यांनाच मनाचे श्लोक असे म्हणतात.मानवाच्या अशांतीचे मूळ म्हणजे त्याचे मन ! या मनापासून मुक्त होण्यासाठी मनच कसे उपयोगी पडते याचे विवेचन समर्थांनी मनाच्या श्लोकात केले आहे.संत एकनाथांनी ‘जोशी’ या नावाचे भारुड लिहिले आहे.त्यात भारुडात ते मनाचा उल्लेख करताना म्हणतात —
” मानाजी पाटील देहागावीचा
विश्वास धरू नका त्याचा. ”
मन हे असे विश्वास न ठेवण्या सारखे चंचल आहे.मानवी जीवनात मन हे वासना धरते,ज्ञान मिळवते,परमेश्वराची भक्ती करते किंवा परमेश्वरा सगट सर्वांची घृणा सुद्धा करते. मन आणि हृदय यांत फरक आहे.मन विचार , तर्क आणि विवेकाचे अधिष्ठान आहे तर हृदय भावना , अन्तः प्रेरणा ,आणि नैसर्गिक प्रवृत्ती यांत प्रेम आणि तिरस्कार सुद्धा येतो यांचे मूळ आहे. म्हणून मनापासून बोलताना कुणी डोक्यावर ( ज्या मेंदूत विचार उत्पन्न होतात तिथे हात न ठेवता ) स्वतःच्या छातीवर डावीकडे म्हणजेच हृदयावर हात ठेवतो. प्रेमाचे स्वरूप दाखवताना याच साठी हृदयाचे चित्र असते.
ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, तुकारामांचे अभंग आणि समर्थांचे मनाचे श्लोक हि सामान्य माणसांच्या अध्यात्म साधनेची प्रस्थानत्रयीच आहे.लोकांचे कल्याण व्हावे म्हणून अत्यंत तळमळीने केलेली हि जणू आकाशवाणीच आहे.विज्ञानात शरीराचे शास्त्र आहे तर अध्यात्मात मनाचे शास्त्र आहे, अध्यात्म शास्त्राने मन शुद्ध,प्रसन्न,आणि निकोप करावे लागते.मनाच्या श्लोकांनी मनाचे शुद्धीकरण होते.म्हणूनच मनाच्या श्लोकांचे पठण ,मनन,चिंतन आणि आचरण हे अध्यात्माच्या अभ्यासाची सुरवात आहे.मन जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा ते विवेकाचा विचार करते आणि मन जेव्हा अविवेकाचा ध्यास घेते तेव्हा ते वासनामय होते. याच मनाला समर्थ बोध करून त्याला राघवाच्या दिशेनी घेऊन जातात. मनाच्या श्लोकांचे पठण बालवयात करणे अत्यंत फायदेशीर आहे. मी ब्राह्मण विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतले.वर्गात मनाचे श्लोक म्हंटले जात असत.त्या वयात त्याचे महत्व लक्षात आले नव्हते पण आता त्याची आठवण झाली तरी मन कासावीस होते. शालेय शिक्षणात मनाचे श्लोक शिकवणे हि काळाची गरज आहे.मनाचे श्लोक हेच अत्यंत प्रगत नागरिक शास्त्र आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.
–चिंतामणी कारखानीस
Leave a Reply