नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामी – भाग १०

सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो सत्व गुणी असे समर्थ म्हणतात .समर्थांनी या समासात सत्व गुणी माणसांचे वर्णन केले आहे.

भगवान श्रीकृष्ण जरी अर्जुनास युद्धाला तयार हो म्हणून जरी युद्धभूमी वर सांगत असले तरी त्यांना कुणी तमो गुणी म्हणणार नाही याचे कारण जो सन्मार्ग दाखवतो,अज्ञानी लोकांना ज्ञान देतो तो सत्व गुणी असतो.ज्या ज्ञान दानात स्वार्थ नसतो तर समाजाचेच हित असते त्या ज्ञान दानाला सत्व गुणी म्हणावे लागेल.

देशाच्या रक्षणासाठी रणात युद्ध करणारा योद्धा सुद्धा सत्व गुणीच म्हणावा लागेल. स्वतःचे दुखः पचवून जो निदकांवर सुद्धा उपकार करतो, जो इंद्रिय दमन करतो,ईश्वराच्या अस्तित्वावर ज्याचा विश्वास आहे,जो संत आणि विद्वान यांना शरण जातो,ज्यास लोकांना शहाणे करण्याची सवय असते.जो सतत ज्ञानोपासना करण्यासाठी प्रयत्न करतो,दुस-याला दुःख झालेले ज्यास सहन होत नाही आणि त्याचे दुखः निवारण करण्यासाठी जो सतत प्रयत्नशील असतो तो सत्व गुणी.

दानधर्म करावा,रुग्णांची सेवा करावी ,विहिरी खोदून लोकांच्या पाण्याची सोय करावी.समाजाच्या कल्याणासाठी उत्सव साजरे करावे.मंदिरे बांधावी,संतांची सेवा करावी अशी सत्व गुणी माणसास आवड असते.

लांड्या लबाड्या ज्यास आवडत नाहीत , समाजाची फसवणूक होणार नाही यासाठी जो सगज असतो तो सत्व गुणी असतो.म्हणून प्रामाणिक व्यापारी,प्रामाणिक पोलिस,सैनिक,आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना सत्व गुणीच म्हणावे लागेल.मी पहिल्या लेखात सांगितल्या प्रमाणे समर्थ परामानस शास्त्रात पारंगत होते.समाज कसा असावा याचे ज्ञान त्याच मूळे समर्थ देऊ शकले.

दासबोधाची व्याप्ती प्रचंड आहे.त्यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही परंतु मला समर्थ मनापासून आवडतात.जगात वाचण्या सारखे पुष्कळ आहे.परंतु जे ज्ञान सहज उपलब्ध आहे तो दासबोध,ज्ञानेश्वरी , गाथा,आणि एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत अथवा आनंद लहरी सोडून आपण इतर सगळे वाचतो पण ज्यात खरे ” विज्ञान ” आहे ते ज्ञान मात्र आपण अभ्यासत नाही.संतांचे ग्रंथ एकदा तरी मनापासून वाचावे खूप फरक पडतो.

॥श्रीराम॥

मागां बोलिला तमोगुण | जो दुःखदायक दारुण |
आतां ऐका सत्वगुण | परम दुल्लभ ||१||
जो भजनाचा आधार | जो योगियांची थार |
जो निरसी संसार | दुःखमूळ जो ||२||
जेणें होये उत्तम गती | मार्ग फुटे भगवंतीं |
जेणें पाविजे मुक्ती | सायोज्यता ते ||३||
जो भक्तांचा कोंवसा | जो भवार्णवींचा भर्वसा |
मोक्षलक्ष्मीची दशा | तो सत्वगुण ||४||
जो परमार्थाचें मंडण | जो महंतांचें भूषण |
रजतमाचें निर्शन | जयाचेनि ||५||
जो परम सुखकारी | जो आनंदाची लहरी |
देऊनियां निवारी- | जन्ममृत्य ||६||
जो अज्ञानाचा सेवट | जो पुण्याचें मूळपीठ |
जयाचेनि सांपडे वाट | परलोकाची ||७||
ऐसा हा सत्वगुण | देहीं उमटतां आपण |
तये क्रियेचें लक्षण | ऐसें असे ||८||
ईश्वरीं प्रेमा अधिक | प्रपंच संपादणे लोकिक |
सदा सन्निध विवेक | तो सत्वगुण ||९||
संसारदुःख विसरवी | भक्तिमार्ग विमळ दावी |
भजनक्रिया उपजवी | तो सत्वगुण ||१०||
परमार्थाची आवडी | उठे भावार्थाची गोडी |
परोपकारीं तांतडी | तो सत्वगुण ||११||
स्नानसंध्या पुण्यसीळ | अभ्यांतरींचा निर्मळ |
शरीर वस्त्रें सोज्वळ | तो सत्वगुण ||१२||
येजन आणी याजन | आधेन आणी अध्यापन |
स्वयें करी दानपुण्य | तो सत्वगुण ||१३||
निरूपणाची आवडी | जया हरिकथेची गोडी |
क्रिया पालटे रोकडी | तो सत्वगुण ||१४||
अश्वदानें गजदानें | गोदानें भूमिदानें |
नाना रत्नांचीं दानें | करी तो सत्वगुण ||१५||
धनदान वस्त्रदान | अन्नदान उदकदान |
करी ब्राह्मणसंतर्पण | तो सत्वगुण ||१६||
कार्तिकस्नानें माघस्नानें | व्रतें उद्यापनें दानें |
निःकाम तीर्थें उपोषणे | तो सत्वगुण ||१७||
सहस्रभोजनें लक्षभोजनें | विविध प्रकारींचीं दानें |
निष्काम करी सत्वगुण | कामना रजोगुण ||१८||
तीर्थीं अर्पी जो अग्रारें | बांधे वापी सरोवरें |
बांधे देवाळयें सिखरें | तो सत्वगुण ||१९||
देवद्वारीं पडशाळा | पाईरीया दीपमाळा |
वृंदावनें पार पिंपळा | बांधे तो सत्वगुण ||२०||
लावीं वनें उपवनें | पुष्प वाटिका जीवनें |
निववी तापस्यांचीं मनें | तो सत्वगुण ||२१||
संध्यामठ आणी भूयेरीं | पाईरीया नदीतीरीं |
भांडारगृहें देवद्वारीं | बांधें, तो सत्वगुण ||२२||
नाना देवांचीं जे स्थानें | तेथें नंदादीप घालणें |
वाहे आळंकार भूषणें | तो सत्वगुण ||२३||
जेंगट मृदांग टाळ | दमामे नगारे काहळ |
नाना वाद्यांचे कल्लोळ | सुस्वरादिक ||२४||
नाना सामग्री सुंदर | देवाळईं घाली नर |
हरिभजनीं जो तत्पर | तो सत्वगुण ||२५||
छेत्रें आणी सुखासनें | दिंड्या पताका निशाणें |
वाहे चामरें सूर्यापानें | तो सत्वगुण ||२६||
वृंदावनें तुळसीवने | रंगमाळा समार्जनें |
ऐसी प्रीति घेतली मनें | तो सत्वगुण ||२७||
सुंदरें नाना उपकर्णें | मंडप चांदवे आसनें |
देवाळईं समर्पणें | तो सत्वगुण ||२८||
देवाकारणें खाद्य | नाना प्रकारीं नैवेद्य |
अपूर्व फळें अर्पी सद्य | तो सत्वगुण ||२९||
ऐसी भक्तीची आवडी | नीच दास्यत्वाची गोडी |
स्वयें देवद्वार झाडी | तो सत्वगुण ||३०||
तिथी पर्व मोहोत्साव | तेथें ज्याचा अंतर्भाव |
कायावाचामनें सर्व | अर्पी, तो सत्वगुण ||३१||
हरिकथेसी तत्पर | गंधें माळा आणी धुशर |
घेऊन उभीं निरंतर | तो सत्वगुण ||३२||
नर अथवा नारी | येथानुशक्ति सामग्री |
घेऊन उभीं देवद्वारीं | तो सत्वगुण ||३३||
महत्कृत्य सांडून मागें | देवास ये लागवेगें |
भक्ति निकट अंतरंगें | तो सत्वगुण ||३४||
थोरपण सांडून दुरी | नीच कृत्य आंगीकारी |
तिष्ठत उभी देवद्वारीं | तो सत्वगुण ||३५||
देवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन |
नित्य नेम जप ध्यान | करी, तो सत्वगुण ||३६||
शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले |
योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||
सांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन |
श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||
अंतरीं देवाचें ध्यान | तेणें निडारले नयन |
पडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||
हरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती |
आदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||
मुखीं नाम हातीं टाळी | नाचत बोले ब्रीदावळी |
घेऊन लावी पायधुळी | तो सत्वगुण ||४१||
देहाभिमान गळे | विषईं वैराग्य प्रबळे |
मिथ्या माया ऐसें कळे | तो सत्वगुण ||४२||
कांहीं करावा उपाये | संसारीं गुंतोन काये |
उकलवी ऐसें हृदये | तो सत्वगुण ||४३||
संसारासी त्रासे मन | कांहीं करावें भजन |
ऐसें मनीं उठे ज्ञान | तो सत्वगुण ||४४||
असतां आपुले आश्रमीं | अत्यादरें नित्यनेमी |
सदा प्रीती लागे रामीं | तो सत्वगुण ||४५||
सकळांचा आला वीट | परमार्थीं जो निकट |
आघातीं उपजे धारिष्ट | तो सत्वगुण ||४६||
सर्वकाळ उदासीन | नाना भोगीं विटे मन |
आठवे भगवद्भजन | तो सत्वगुण ||४७||
पदार्थीं न बैसे चित्त | मनीं आठवे भगवंत |
ऐसा दृढ भावार्थ | तो सत्वगुण ||४८||
लोक बोलती विकारी | तरी आदिक प्रेमा धरी |
निश्चय बाणे अंतरीं | तो सत्वगुण ||४९||
अंतरीं स्फूर्ती स्फुरे | सस्वरूपीं तर्क भरे |
नष्ट संदेह निवारे | तो सत्वगुण ||५०||
शरीर लावावें कारणीं | साक्षेप उठे अंतःकर्णी |
सत्वगुणाची करणी | ऐसी असे ||५१||
शांति क्ष्मा आणि दया | निश्चय उपजे जया |
सत्वगुण जाणावा तया | अंतरीं आला ||५२||
आले आतीत अभ्यागत | जाऊं नेदी जो भुकिस्त |
येथानशक्ती दान देत | तो सत्वगुण ||५३||
तडितापडी दैन्यवाणें | आलें आश्रमाचेनि गुणें |
तयालागीं स्थळ देणें | तो सत्वगुण ||५४||
आश्रमीं अन्नाची आपदा | परी विमुख नव्हे कदा |
शक्तिनुसार दे सर्वदा | तो सत्वगुण ||५५||
जेणें जिंकिली रसना | तृप्त जयाची वासना |
जयास नाहीं कामना | तो सत्वगुण ||५६||
होणार तैसें होत जात | प्रपंचीं जाला आघात |
डळमळिना ज्याचें चित्त | तो सत्वगुण ||५७||
येका भगवंताकारणें | सर्व सुख सोडिलें जेणें |
केलें देहाचें सांडणें | तो सत्वगुण ||५८||
विषईं धांवे वासना | परी तो कदा डळमळिना |
ज्याचें धारिष्ट चळेना | तो सत्वगुण ||५९||
देह आपदेनें पीडला | क्षुधे तृषेनें वोसावला |
तरी निश्चयो राहिला | तो सत्वगुण ||६०||
श्रवण आणी मनन | निजध्यासें समाधान |
शुद्ध जालें आत्मज्ञान | तो सत्वगुण ||६१||
जयास अहंकार नसे | नैराशता विलसे |
जयापासीं कृपा वसे | तो सत्वगुण ||६२||
सकळांसीं नम्र बोले | मर्यादा धरून चाले |
सर्व जन तोषविले | तो सत्वगुण ||६३||
सकळ जनासीं आर्जव | नाहीं विरोधास ठाव |
परोपकारीं वेची जीव | तो सत्वगुण ||६४||
आपकार्याहून जीवीं | परकार्यसिद्धी करावी |
मरोन कीर्ती उरवावी | तो सत्वगुण ||६५||
पराव्याचे दोषगुण | दृष्टीस देखे आपण |
समुद्रा ऐसी साठवण | तो सत्वगुण ||६६||
नीच उत्तर साहाणें | प्रत्योत्तर न देणें |
आला क्रोध सावरणें | तो सत्वगुण ||६७||
अन्यायेंवीण गांजिती | नानापरी पीडा करिती |
तितुकेंहि साठवी चित्तीं | तो सत्वगुण ||६८||
शरीरें घीस साहाणें | दुर्जनासीं मिळोन जाणें |
निंदकास उपकार करणें | हा सत्वगुण ||६९||
मन भलतीकडे धावें | तें विवेकें आवरावें |
इंद्रियें दमन करावें | तो सत्वगुण ||७०||
सत्क्रिया आचरावी | असत्क्रिया त्यागावी |
वाट भक्तीची धरावी | तो सत्वगुण ||७१||
जया आवडे प्रातःस्नान | आवडे पुराणश्रवण |
नाना मंत्रीं देवतार्चन | करी, तो सत्वगुण ||७२||
पर्वकाळीं अतिसादर | वसंतपूजेस तत्पर |
जयंत्याची प्रीती थोर | तो सत्वगुण ||७३||
विदेसिं मेलें मरणें | तयास संस्कार देणें |
अथवा सादर होणें | तो सत्वगुण ||७४||
कोणी येकास मारी | तयास जाऊन वारी |
जीव बंधनमुक्त करी | तो सत्वगुण ||७५||
लिंगें लाखोलीं अभिशेष | नामस्मरणीं विस्वास |
देवदर्शनीं अवकाश | तो सत्वगुण ||७६||
संत देखोनि धावें | परमसुखें हेलावे |
नमस्कारी सर्वभावें | तो सत्वगुण ||७७||
संतकृपा होय जयास | तेणें उद्धरिला वंश |
तो ईश्वराचा अंश | सत्वगुणें ||७८||
सन्मार्ग दाखवी जना | जो लावी हरिभजना |
ज्ञान सिकवी अज्ञाना | तो सत्वगुण ||७९||
आवडे पुण्य संस्कार | प्रदक्षणा नमस्कार |
जया राहे पाठांतर | तो सत्वगुण ||८०||
भक्तीचा हव्यास भारी | ग्रंथसामग्री जो करी |
धातुमूर्ति नानापरी | पूजी, तो सत्वगुण ||८१||
झळफळित उपकर्णें | माळा गवाळी आसनें |
पवित्रे सोज्वळें वसनें | तो सत्वगुण ||८२||
परपीडेचें वाहे दुःख | परसंतोषाचें सुख |
वैराग्य देखोन हरिख | मानी,तो सत्वगुण ||८३||
परभूषणें भूषण | परदूषणें दूषण |
परदुःखें सिणे जाण | तो सत्वगुण ||८४||
आतां असों हें बहुत | देवीं धर्मीं ज्यांचें चित्त |
भजे कामनारहित | तो सत्वगुण ||८५||
ऐसा हा सत्वगुण सात्विक | संसारसागरीं तारक |
येणें उपजे विवेक | ज्ञानमार्गाचा ||८६||
सत्वगुणें भगवद्भक्ती | सत्वगुणें ज्ञानप्राप्ती |
सत्वगुणें सायोज्यमुक्ती | पाविजेते ||८७||
ऐसी सत्वगुणाची स्थिती | स्वल्प बोलिलें येथामती |
सावध होऊन श्रोतीं | पुढें अवधान द्यावें ||८८||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
*सत्वगुणलक्षणनाम समास सातवा || २.७ ||
॥श्रीराम॥
लेखनसीमा …… संपूर्ण

–चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..