शिवराय आणि रामदास स्वामी यांचे प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या हनुमंत स्वामी याची बखर उपलब्ध आहे. त्या बखरीत असा उल्लेख आहे कि समर्थ सज्जन गडावर (परळीचा किल्ला )वास्तव्याला असताना त्यांनी कल्याण स्वामी यांना दासबोधाची प्रत शिवरायांना भेट देण्यास सांगितले होते.सुदैवाने बखरीतील लिहिलेल्या या घटनेला शिव चरित्रकार पाठींबा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दक्षिण दिग्विजय आटोपताच प्रताप गडावर श्री भवानीच्या दर्शना साठी गेले होते.त्या पूर्वी त्यांनी सज्जन गडावर समर्थांची भेट घेतली होती.सज्जन गडावर या शिव -समर्थ भेटीची वेळ वैशाख शुद्ध २ शके १६०० अर्थात १३ एप्रिल १६७८ अशी आहे.समर्थ श्रावण महिन्यात शिवथर घळीतून सज्जन गडावर वास्तव्याला आले.शिवथर घळ ते सज्जन गड हा पायी मार्ग असा आहे—–शिवथर घळ –कुम्भे शिवथर –ढालकाठी–कांगोरी किल्ला–महादेवाचा मुरा–नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव उमरठ–महाबळेश्वर मठ–तापोळा –बामणोली–शेंबडी वाघाली–नवरणवारीची खिंड –जुमडी–जळकेवाडी–वाघापूर सड्याचा उत्तर भाग –मोरवाडी –मोर घळ परसावडे –पांगरी –परळी –सज्जनगड.या पैकी तापोळा ते वाघरी हा मार्ग कोयनेच्या धरणात बुडालेला आहे.त्या ठिकाणी नौकेने प्रवास करावा लागतो.
मोरघळीच्या माथ्यावरून सज्जन गडाचे विलोभनीय दृश्य दिसते त्यामुळे शिवरायांनी मुक्कामासाठी कोणता किल्ला हवा असे समर्थांना विचारताच समर्थांनी परळीचा किल्ला देणे असे सांगितले.
शिवरायांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरच्या नायक राजांचा पराभव केला आणि दक्षिणेला मराठा साम्राज्य स्थापन केले.व्यंकोजी महाराजांनी समर्थ शिष्य भीमस्वामी यांना तंजावर मध्ये समर्थांचा मठ स्थापन करण्यासाठी जागा दिली.त्या ठिकाणी समर्थांचा मठ निर्माण झाला.व्यंकोजी राजांनी तारो गोपाल या नावाच्या अत्यंत धार्मिक अशा कारकुनास अनेक धार्मिक ग्रंथांच्या नकली करण्याची आज्ञा केली त्यात दासबोधाची प्रत सरस्वती महाल या ग्रंथालयात अजूनही जशीच्या तशी जतन केली आहे.अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे भोसल्यांचे सध्याचे वंशज जे तंजावरला राहतात त्यांच्या देवघरात आज तागायत दासबोध आहे आणि तो सोनेरी अक्षरांनी लिहिलेला असून त्याची दररोज पूजा होते.
शिवरायांच्या वंशाजापैकी नागपूरकर भोसले हे देखील समर्थांना पुज्य मानत होते. त्यांच्या देवघरात समर्थांची पंच धातूची मूर्ती आहे .त्या मूर्तीची दररोज पूजा होते.सातारा गादीचे वंशज सुद्धा दरवर्षी “गुरु गादी” म्हणून न चुकता सज्जन गडावर जातात आणि समर्थांच्या समाधि समोर डोके टेकवून या महान राष्ट्र संता समोर नतमस्तक होतात.
सदर लेखातील हा भाग हा नागपूरच्या म.रा. जोशी या संत साहित्य अभ्यासक यांच्या दासबोधाच्या प्रस्थावानेतून साभार घेतला आहे.श्री जोशी यांनी दासबोधाच्या १५० हस्त लिखित प्रतींचा अभ्यास केलेला असून त्यांनी ‘दत्तात्रय स्वामी ‘ या नावाची प्रत प्रसिद्ध केली आहे.श्री जोशी यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांची गाथा सुद्धा संपादित करून प्रसिद्ध केलेली आहे. संत तुकाराम आणि समर्थ यांचा जीवन कालखंड एकच आहे.आणि ज्या ज्या ठिकाणी दासबोधाचा अभ्यास होतो त्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि तुकारामंची गाथा सुद्धा अभ्यासली जाते.त्यामुळे समर्थांचे मठ हे संत साहित्याची विद्यापिठेच आहेत .
–चिंतामणी कारखानीस
Leave a Reply