समर्थ रामदासा ,
प्रेरणेच्या स्रोता – तुला दंडवत !
मला शक्ती दे, सामर्थ्य दे !
मानवजातीवर तुझा कृपाप्रसाद अविरत असू दे !
हे गुरु समर्था, मला तुझ्या समीप ठेव !
उत्तम पुरुषांचे गुण आत्मसात करू दे !
सत्याच्या पथावर प्रकाश दाखव !
माझ्या अंतर्मनातील दिव्यत्व उजळू दे !
हे थोर समर्था, मला आणी सर्वांना
मार्गदर्शन कर- जीवनाची वाटचाल अर्थपूर्ण कर !
प्रत्येकाला शाश्वत वाट दाखव !
सत्कार्याचा परिमळ कायम दरवळू दे !
हे स्वामी समर्था, स्वत्व जागू दे सर्वांभूती !
त्यासाठीचे माध्यम मला बनू दे !
उदात्त जीवनध्येयासाठी माझे
आणि माझ्या बांधवांचे उन्नयन कर !
हे समर्था, दोषांपेक्षा गुण वरचढ ठरू दे !
प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तमाचा ध्यास दे !
ध्येयसिद्धीचे प्रयत्न सतत असू दे !
सोहं ची अनुभूती सर्वांना येऊ दे !
हे सद्गुरू,
स्वतःला जाणण्याचे भान मला दे !
स्वस्वरूपा बद्दलच्या शंका विरु दे !
आत्मज्ञानाचा सूर्यप्रकाश पसरू दे !
त्या उजेडात अज्ञान अदृश्य होऊ दे !
हे स्वामी समर्था,
मला गंतव्य स्थानापर्यंत ने !
वाटेतील मोहसागर ओलांडत
तुझे शुभाशीष आम्हाला नेवोत
आध्यात्मिक शिखरावर !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply