नवीन लेखन...

समर्थांनी विचारांची क्रांती घडविली

समर्थांनी विचारांची क्रांती घडविली विषय : ‘समर्थांचे सामर्थ्य योग’ वक्त्या : डॉ. सौ. रसिका ताम्हणकर कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था, सीवूड, नवी मुंबई या संस्थेने, शनिवार दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी, या वर्षअखेरीस समर्थ भक्त डॉ. सौ. रसिका ताम्हणकर यांचे समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘समर्थांचे सामर्थ्ययोग’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले. सौ. रसिकाताईनी सुरुवातीपासूनच चतुराईने श्रोत्यांना बहुश्रुत असे संबोधून, त्यांचे मन वश करून घेतले. पुढे संत शांत असतात. षड्रीपुवर संतांचे पूर्ण नियंत्रण असते, संत क्षमाशील असतात असे सांगून, महाराष्ट्रातील संतांची वैशिष्ट्ये सांगताना, ज्ञानेश्वरांची प्रतिभा, नामदेवांचे प्रचार, प्रसारकार्य, तर एकनाथांचे एकत्रित प्रपंच आणि परमार्थ, तुकारामांचे प्रपत्ती म्हणजे पांडुरंगा प्रती संपूर्ण शरणागती, आणि सोळाव्या शतकातील समकालीन संत ‘समर्थ रामदास स्वामी’ यांचा प्रतिकार अशी ओळख करून दिली.

बालपणी धाडशी असलेले समर्थ आठव्या वर्षी ‘चिंता करितो विश्वाची’ असे आईस म्हणाले. पुढे त्यांनी संसाराचा मोहत्याग करून तापी नदीकाठी बारा वर्ष श्री ‘राम मंत्र आणि गायत्री पुरश्चरण’ कठोर तपस्या करून, आसेतु हिमाचल पायी प्रवास केला असे सांगितले. शिखांचे गुरु गोविंद सिंग यांची भेट झाल्यानंतर समर्थांचे विचार पालटले व धर्मकार्याचा उपयोग प्रतिकाराच्या मार्गाने धर्मरक्षणासाठी करता येईल अशी खूणगाठ बांधली.

निवृत्तीवादी रामदास स्वामी प्रवृत्तीवादी झाले आणि खऱ्या अर्थाने धर्मरक्षण आणि स्त्रियांचे शील रक्षण करण्याची शिकवण देत समर्थांनी विचारांची क्रांती घडविली. तुकारामांच्या पांडुरंग जयघोषात समाज भक्तिरसात डुंबला होता. रयतेवर पाच-पाच परकीय शाही राजवटी राज्य करीत होत्या. सर्वत्र अनाचार, अनागोंदी, गोंधळ, बजबजपुरी माजली होती.

अशा मरगळलेल्या, विकलांग, गलितगात्र रयतेला स्वत्वाची, सामर्थ्याची, प्रतिकाराची जाणीव करून देत समाजाला लढवय्या बनविण्यासाठी प्रभू श्रीरामाच्या शूरतेची, एकपत्नीत्वाची, एकबाणी सद्गुणाची उपासना आणि बलदंड मारुतीरायाची बलाची उपासना आणि जगदंबेच्या रूपाने शक्तीची उपासना अशी त्रिसूत्री समर्थांनी रुजविली. समर्थांनी मारुतीची मंदिरे आणि आखाडा एकत्रित बांधून अशक्त समाजाला सशक्त बनविले. संपूर्ण भारतभर अकराशेच्यावर मठ स्थापन केले. त्यावर सक्षम असे मठाधीपती महंत नेमले आणि त्याचे चाफळ येथे प्रमुख केंद्र होते, असे सांगितले. समर्थांनी महन्तासाठीच्या कठोर नियम बनविले. ‘काही उपाधी करू नये क केली तरी धरू नये,’ असे खडसावले.  या कार्यासाठी ‘पहिले ते हरीकथा निरुपण’ दुसरे ते राजकारण’ असा दंडक समर्थांनी घालून दिला होता.

समर्थांच्या विपुल ग्रंथ निर्मितीत, देवाच्या आरत्या, मनाचे श्लोक, मुकुटमणी ‘सार्थ दासबोध’, यांच्या बरोबर संत ज्ञानेश्वरांचे ‘अमृतानुभव’ हे तत्त्वज्ञानाशी नाते सांगणाऱ्या तोडीचे ‘आत्माराम’ हे एकशेऐंशी ओव्यांचे पूर्ण पाच समासी तत्त्वज्ञान समर्थांनी लिहिले.  दैविक, भौतिक, आध्यात्मिक ताप, नवविधा भक्ती, बाग प्रकरण, संगीताचा अभ्यास, स्वयंपाक, भोजनाच्या ताटातील बारकावे, स्फुरण देणाऱ्या ‘सवया’, करुणेने ओथंबलेली ‘करुणाष्ट्रे’, व्यवस्थापन कौशल्य, उत्तमगुण इत्यादी बऱ्याच विषयांवर समर्थांची लेखणी चालली. सामर्थ्याची व्याख्या ‘अंतस्थ सामर्थ्य-ज्याने आपल्या इच्छेने काम करणे किंवा होणे’ असे सांगितले. इच्छाशक्ती आणि कार्यशक्तीच्या संयोगाने हे शक्य आहे असे रसिकाताईनी सांगितले.

पुढे समर्थांनी सांगितलेल्या सामर्थ्यांपेकी दोन सामर्थ्यांवर सौ. रसिका तार्इंनी विस्तृत विवेचन केले. ‘शरीर सामर्थ्य’ आणि ‘व्यवहार सामर्थ्य’ हे विषय हाताळताना शरीर, मन, बुद्धी, युक्ती, शक्ती यांच्या योग्य समन्वयाने अद्भुत कार्य घडते, असे उद्धृत केले. ‘आळसाचे फळ ते रोकडे.’ आळस, दुश्चितपण यामुळे करंटेपण येते. कष्टाने फलप्राप्ती होते. समर्थ दररोज बाराशे सूर्य नमस्कार घालीत. सुदृढ समाजासाठी शरीर सामर्थ्य, सात्त्विक, चौरस पौष्टिक आहार, योग्य व्यायाम, राम भक्तीमय मन:शांती अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. आजच्या काळातही हे विचार प्रेरक असून शहान्नव वर्षांचे आबा महाजन आजही दहा किलोमीटर चालणे आणि पुरेसा व्यायाम, रात्रौ आठ वाजता निद्रा आणि सकाळी साडे पाच वाजता उठणे असा दिनक्रम चालू ठेवतात; याकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले. अशक्त माणूस रोगी समाज घडवतो आणि गुंड त्यांच्यावर अत्याचार करून बजबजपुरी माजवतो. सुदृढ आहार विहारासाठी पिज़्झा, पास्ता पासून दूर राहण्याचा सल्ला तरुणाईला दिला. बळासाठी मारुतीचे आणि शक्तीसाठी तुळजा भवानीचे स्तोत्र पठणाचा सल्ला दिला. व्यवहार सामर्थ्यासाठी ‘आधी प्रपंच करावा नेटका, मग पाहावा परमार्थ विवेका’ अशी समर्थांची उक्ती उद्धृत करून संसारात, व्यवहारात, काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक अलिप्तपणे ‘योग तो सुकृताचा’ म्हणजे गृहस्थाश्रम हा महत्त्वाचा धर्म, त्याग, त्रास सोसणे, अशा वागण्यातून आपले घर म्हणजे गोकुळ होऊ द्या असे सुचविले. कर्माला ईश्वर मानून, आळस सोडा, अचूक प्रयत्न करा. नेमकेपणा, दीर्घ सूचना, खबरदार, ‘प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पांची कारण’ आगंतुक गुणांची संगत धरा, अविवेक सोडा. विवेकी व्हा. विवेक वैराग्य, अखंड सावधानता, दक्ष, एकाग्रचित्त, हजरजबाबीपणा, क्रियाशीलता, संवाद कौशल्य, श्रवण कला, मूर्खपणा, पढ़त मूर्खपणा, लेखन, वाचन, मनन, चिंतन इत्यादी गुण अवगुण यावर विस्तृत विवेचन केले.  निरीक्षण, आकलन, विवेचन, विश्लेषण, आणि   आत्मप्रचीती, अनुभूतीच्या प्रभावाने आपल्याला द्रष्टेपणा प्राप्त होईल असे सांगून, सौ. रसिकातार्इंनी प्रभू श्रीराम प्रार्थनेने आपले निरुपण संपन्न केले.

आजमितीच्या वाचनालायातील कार्यक्रमात अत्यंत यशस्वी अशा या निरुपणाच्या श्रवणासाठी मोठ्या संख्येनी सुजाण श्रोते लाभले आणि त्यांनी ते अतिशय तल्लीन होऊन शांत चित्ताने ऐकले. डॉक्टर सौ. रसिका ताम्हणकारांच्या ओजस्वी, प्रासादिक वाणीतील ज्ञानगंगेत श्रोतृवर्ग अक्षरश: डुंबत होता. प्रतिभावंत व्याख्यात्यांकडून वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान मिळाल्याचे समाधान प्रत्येक श्रोत्याच्या चेहऱ्यावर विलसत होते. सुरुवातीस प्रास्ताविक सौ. प्रज्ञा लळींगकर यांनी केले, तर श्री. घनश्याम परकाळे यांनी सर्वांचे आभार मानले.

इदं न मम

(समर्थ निरूपणाचा हा कार्यक्रम श्री. घनश्याम आणि सौ. अनुराधा घनश्याम परकाळे, यांनी विवाहाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाप्रित्यर्थ प्रायोजित केला होता.)

श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/

किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..