नवीन लेखन...

संभ्रम

गेल्या आठवड्यापासून पाहते दोन-तीन दिवस दुकानाबाहेर माणसांची ही लांबलचक रांग…एकीला विचारले कसली रांग आहे.. सेल-बिल आहे की काय? तशी म्हणाली.. आहात कुठे तुम्ही..अहो प्लास्टिक बंदी आहे ना…स्टीलच्या वस्तु घेण्यासाठी रांग आहे ही.. आणि माझी ट्यूब पेटली… स्टीलच्या दुकानाबाहेर रांग पहिल्यांदाच पाहिली आणि जाणीव झाली की पर्यावरण आणि मानव-पशूच्या आरोग्यासाठी हानिकारक प्लास्टिकला आपल्या घरातून हटवायला हवं…शनिवार-रविवारची सुट्टी कारणी लावायचं मनोमन ठरवलं…

सकाळी जाहीर करून टाकलं.. आज नो स्वयंपाक… आज आपलं घर प्लास्टिक मुक्त करायचं… तुम्ही सगळे जा बाहेर जेवायला आणि माझ्यासाठी पार्सल आणा…सगळ्यांनी चक्क लगेच मान्य केलं.. आता 5000 रुपये दंड म्हटल्यावर कुणीही आडकाठी केली नाही…

श्रीगणेशा कुठून करायचा कळेना..स्वयंपाक घरात दोन-चार बिसलेरीच्या बाटल्या दिसल्या तशी तिकडे वळले..एक जंबो प्लास्टिक पिशवी घेतली (आता प्लास्टिक कचरा टाकायला काय घेणार!!) आणि धडाधड बाटल्या, श्रीखंडाचे रिकामे डबे, चमचे, फ्रीजमध्ये ठेवायच्या बाटल्या दिल्या टाकून..पिशवी गच्च भरली…टपरवेयरचे लंचचे डबे, चांगल्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या..सगळ्यांच्या किमती आठवल्या आणि उरात धडधडायला लागलं…किती पैसे वेस्ट झाले!!…फ्रीजमध्ये पाहिलं..अरेरे कितीतरी गोष्टी छोट्या-मोठ्या प्लास्टिक डब्यात..आता ठेवणार कशात? पण आज निकाल लावायचा होता नं…ठेवणीतल्या वाट्या काढल्या आणि एक-एक करून वस्तूंची रवानगी केली.. नक्की कोणतं प्लास्टिक टाकायचं कोणतं चालेल याचा अंदाज येणं…काय करू नि कसं समजेना….एव्हाना 3 पिशव्या भरल्या… आता मोर्चा वळवला शेल्फकडे.. रांगेने सगळे डबे प्लास्टिकचे.. ओह! नो… पारदर्शक असतात..जिन्नस संपत आला की लगेच लक्षात येईल म्हणून आणलेले डझनावारी डबे… आता हे डाळ, तांदूळ, चहा-साखर ठेवणार तरी कशात? स्टीलचे डबे उघडले पण त्यात ही प्लॅस्टिकच्या पिशवीत काहीबाही ठेवलेले..प्लास्टिकची बादली, मग, हे आणि ते यादी लांबतच गेली..संभ्रम वाढला तशी तूर्तास या बाबतीत स्थगिती घेतली…पहिल्यांदा स्टीलचे डबे आणि इतर पर्याय शोधावे लागतील मग आवरूया असा विचार केला…स्टीलच्या दुकानासमोरची ती रांग आठवली आणि विचारांनी दमणूक झाली आणि मरगळ झटकण्यासाठी मस्त चहा प्यायची हुक्की आली…आलं घालून कडक चहा केला आणि लक्षात आलं गाळणी पण प्लास्टिकची..आजचा दिवस बरं का तुझा… असं म्हणत चहा ओतला…

जरा तरतरी आली तशी हॉलमधे गेले.. प्लास्टिक फ्लॉवरपॉट, फुलं, प्लॅस्टिकच्या पिशव्या..कचकडे आणि प्लास्टिक यातील फरक ही कळेना पण दिलं टाकून…पुस्तकांच्या शेल्फ मधे काय असणार असा विचार करत होते तर पुस्तकावर प्लास्टिक कव्हर..प्लास्टिक फोल्डर मधली मार्क्सशीट्स, एफडी आणि महत्वाची कागदपत्रे ठेवायची कशात…अबब! काही इकडे-तिकडे झालं तर मलाच ओरडा खावा लागेल म्हणून हॉलमधून काढता पाय घेतला… आता बेडरूम मधे कपाट आवरायला घेतलं..आणि एक-एक करून पिशव्या उघडून पाहिल्या..अरे बापरे.. आता या कपड्यांसाठी पण पर्यायी व्यवस्था करायला हवी हे लक्षात आलं… आधीच साडी-ब्लाऊज, पंजाबी ड्रेस आणि ओढणी शोधता-शोधता नाकी नऊ येतात.. एकत्र ठेवले तर काय होईल!! कल्पना करवेना…घड्याळाकडे पाहिलं..दुपारचे दोन वाजले.. पोटात कावळे ओरडायला लागले होते आणि अजून मंडळी घरी आली नव्हती…मस्त हादडत असतील…असा विचार केला आणि पटकन आठवण झाली..दो मिंनट में मॅगी…अरे पण यात पण प्लास्टिकचा अंश आहे असे कुठेतरी वाचल्याचं आठवलं…बेत कॅन्सल केला…पार्सल कधी येणार याचा विचार करता-करता ट्यूब पेटली.. अरे देवा…पार्सल आणण्यासाठी स्टीलचे डबे कुठे दिले त्यांच्याकडे…. आणि अंगातलं उरलं-सुरलं त्राणच गेलं…

अरे देवा…म्हणून देवबाप्पाच्या तसबीरीकडे पाहिलं…तसबीरीला प्लास्टिकमय मोगर्‍याचा हार लटकत होता…

— सपना जकातदार
22.06.2018

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..