आज हिंदी चित्रपटसृष्टीतील २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी सर्वाधिक ३,४०० गाणी लिहिल्याबद्दल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदले गेलेले ख्यातनाम गीतकार समीर अंजान पांडे ऊर्फ शीतल पांडे ऊर्फ समीर यांचा जन्म दि. २४ फेब्रुवारी १९५८रोजी झाला.
आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे उर्फ समीर यांची ओळख. ज्येष्ठ गीतकार अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने अंजान यांनी समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा पिंड कवी मनाचाच असल्याने घरच्या विरोधाला जुमानता तो प्रकट होत राहिला. बँक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि सिनेक्षेत्रात गीतकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली. ‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, अशा अनेक चित्रपटांसाठी समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. या आधीचे रेकॉर्ड गीतकार आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती. समीर यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply