पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेतील रहिवासी असताना आम्हाला शेजार फार आपुलकीचा मिळाला. जोशी वाड्याच्या पलीकडे बाबुलाल शेठजींचे ‘जय भारत स्टोअर्स’ हे किराणा मालाचे दुकान होतं. शेठजींनी दुकानाचा जम बसल्यावर राजस्थानवरुन आपला थोरला मुलगा, संपतलाल याला पुण्यात आणलं. त्यावेळी त्याचं वय होतं चौदा वर्षांचं. पाचवीपर्यंत त्याचं गावी शिक्षण झालेलं होतं. तो शेठजींबरोबर दुकानात बसू लागला.
शेठजींची दिवसांतून एकदा तरी आमच्या घरी चक्कर होत असे. माझे वडील शिक्षक आहेत, हे त्यांना माहीत होते. त्यांनी वडिलांना विनंती केली की, संपतची तुम्ही शिकवणी घ्या. त्याला व्यावहारिक गणित शिकवा. फीची काळजी करू नका. वडिलांनी त्याला चार महिन्यांत शिकवून तयार केले.
संपतच्या घरी येण्यामुळे त्याच्याशी माझी मैत्री झाली. दिवसभरात मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी दुकानात जाऊन स्टुलावर बसत असे. येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकांचं निरीक्षण करत असे. संपतला सिनेमाचं आकर्षण होतं. त्याला फडकेंच्या पेपर स्टाॅलवर सिने साप्ताहिक ‘मायापुरी’, ‘माधुरी’चा नवीन अंक आल्याची खबर मी देत असे. मग त्याने दोन रुपये दिले की, मी अंक आणून त्याला देत असे. संध्याकाळी दुकान बंद केल्यावर शेठजी व संपत दोघे मिळून स्वयंपाक करायचे. जेवण झाल्यावर रमेश व मी त्यांच्याकडे जायचो. आमच्या घरी पाहुणे आले तर दुकानातील माळ्यावर संपत व आम्ही दोघे झोपत असू. सकाळी उठल्यावर झोपेतच दुकानाचं शटर वरती घेवून बाहेर पडायचो व शटर पुन्हा लावून घरी जायचो.
कधी संपतला मूड आला तर आम्ही दोघं पिक्चर बघायला जायचो. जेवण करून निघायला उशीर झालेला असायचा. मिनर्व्हा टाॅकीजला ‘मेमसाब’ चित्रपट पहायला गेलो तेव्हा तो सुरू होऊन पंधरा मिनिटं झालेली होती. थिएटरमध्ये फारशी गर्दी नव्हती. थोड्याच वेळात संपतने पुढच्या खुर्चीवर पाय टाकून घोरायला सुरुवात केली. मी उरलेला चित्रपट संपूर्ण पाहिला. थिएटरमध्ये लाईट लागल्यावर संपतला उठवले व घरी आलो.
संपतचे लग्न ठरले. माझा मोठा भाऊ, अण्णाशी समवयस्क असल्यामुळे संपतची घनिष्ट मैत्री होती. संपतच्या लग्नासाठी तो राजस्थानला गेला होता. लग्नानंतर संपतमध्ये बदल झाला. तो व्यवहारी वागू लागला. शेठजींना ते पटत नव्हतं मात्र आता दुकान संपतच्या ताब्यात होते.
शेठजींनी आपल्या नंबर दोनच्या मुलाला, अमृतला पुण्यास आणले. त्याचे येथील शाळेत शिक्षण सुरू झाले. अमृत माझ्याच वयाचा असल्याने आमची छान मैत्री जमली. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला शेठजींनी कापडाचे दुकान सुरु करुन दिले. किराणा आणि कापड दोन्ही दुकानं शेजारी शेजारी उत्तम चालू लागली.
संपतला मुलगा झाला आणि शेठजी आजोबांच्या भूमिकेत रममाण झाले. संपत प्रमाणेच अमृत बरोबरही मी चित्रपट, आॅर्केस्ट्राचे कार्यक्रम पाहिले. अमृतचा कापड व्यवसायात जम बसल्यावर शेठजींनी त्याचे गावी नेऊन लग्न लावले. येताना ते तीन नंबरच्या मुलाला, ज्ञानूला घेऊन आले.
ज्ञानू हा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. अतिशय चंचल स्वभावाचा ज्ञानू व्यवहारात दोघांपेक्षा काकणभर सरस होता. अमृत व ज्ञानू दोघेही कापड व्यवसायात रमले.
एकदा ज्ञानूचे घरच्यांशी भांडण झाले. त्याने मला बरोबर घेऊन महाबळेश्वर गाठले. तिथे दोन दिवस आम्ही मनसोक्त भटकलो. पांचगणीला फिरुन आलो. पुण्याला परतताना ज्ञानूचं डोकं शांत झालेलं होतं. एकदा आम्ही टु व्हिलरवरुन जेजुरीला जाऊन आलो. चित्रपट, नाटकं, आॅर्केस्ट्राचे अनेक कार्यक्रम पाहिले.
शेठजींनी पुण्यातीलच मुलगी पाहून ज्ञानूचं शुभमंगल केले. शेठजींचं वय झालं होतं, ते राजस्थानला निघून गेले. ज्ञानूनं होलसेल व्यापार सुरु केला.
जोशी मालकाने बिल्डींग पाडायचे ठरविले. जय भारत स्टोअर्स बंद झाले. दिलेल्या पर्यायी जागेत अमृतने दुकान सुरु केले. संपतने निंबाळकर तालमी जवळ किराणा मालाचे दुकान थाटले. त्याची दोन मुलं त्याच्या हाताशी आलेली होती. तिकडे राजस्थानला वार्धक्याने शेठजींचं निधन झालं. संपतच्या सिगारेटच्या व्यसनाने तो आजारी पडू लागला. काही वर्षांनी त्याची स्मरणशक्ती कमी होऊ लागली. त्याने दुकान बंद केले. दोन्ही मुलांचे होलसेल बिझनेस सुरू झाले होते.
मी बालाजी नगरला रहायला आल्यापासून आमचा संपर्क कमी होऊ लागला. दरम्यान तीस वर्षांचा काळ लोटला. आता संपतची तिसरी पिढी व्यवसायात आलेली आहे. अमृतलालचा मुलगा आता साडीचा मोठा होलसेल व्यापार सांभाळतो आहे. त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने झालेली आहेत. ज्ञानूचा मुलगा माझ्या मुलाबरोबरच शिकून आता कापड व्यवसायात स्थिरावला आहे. सर्वजण आनंदात आहेत. शेठजींनी लावलेल्या रोपट्याचा विस्तार आता गगनचुंबी झालाय.
आजही पावन मारुती चौकातून टिळक रोडकडे जाताना ज्ञानू दुकानाबाहेर खुर्चीवर बसलेला दिसतो. ‘काय सुरेश, कसं चाललंय?’ असं मला हटकतो. मला बसायला खुर्ची देतो. दुकानातील माणसाला चहा आणायला पाठवतो. चहा येईपर्यंत ज्ञानू घरातील सर्वांची चौकशी करतो. चहा घेतल्यावर मी निघतो….
मनात येतं.. राजस्थानमधील एका खेड्यातून आलेल्या शेठजींनी महाराष्ट्रात येऊन व्यवसाय केला. आपल्या मुलांना त्यांच्या पायावर उभंही केलं आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांना माणुसकीची शिकवण दिली. म्हणूनच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मनोहर कोलते सरांच्या कार्यक्रमात ज्ञानूचा खारीचा तरी वाटा असतोच….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१२-९-२०.
Leave a Reply