नवीन लेखन...

सामूहिक दायत्वाची गरज!

कोरोना विषाणुचे महासंकट देशावर कोसळले असून सर्वाधिक संसर्ग झालेले रूग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत..करोना विषाणूविरोधातले हे एक प्रकारचे युद्धच असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. त्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजनाही केल्या जात आहेत. परंतु हे युद्ध फक्त एकट्या सरकारला, सरकारच्या चारदोन यंत्रणांना लढता येणारे नाही. यामध्ये प्रत्येक नागरिकाला सहभागी व्हावे लागेल..

लस किंवा औषध उपलब्ध नसलेल्या करोना संसर्गाला थोपवण्यासाठी आज तरी केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचेचं शस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या कसोटीच्या काळात आपण सगळ्यांनी शहाणपणाने, समजुतदारपणे वागण्याची आवश्यकता आहे. सरकार आणि आरोग्य यंत्रणेकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे आपण तंतोतंत पालन केले पाहिजे.

गर्दी टाळणे, अनावश्यक प्रवास टाळणे, स्वच्छता पाळणे यासह काही बंधने लोकांनी आपण होऊन पाळली आणि प्रशासनाने घातलेले निर्बंध गांभीर्याने घेतले तर करोनो हद्दपार करणे सोपे जाईल. आज सरकार, प्रशासन, आरोग्य यंत्रणा पोलिस यंत्रणा हातावरील घड्याळाच्या वेळा न बघता कोरोना विरूध्दच्या युध्दात स्वत:च्या जिवाची जोखीम घेऊन काम करते आहे. त्यामुळे आपणही आपली सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक दायित्वाची भूमिकेतून सामूहिकपणे या युद्धात सामील झालं पाहिजे.

एरवी दररोज आपण जगण्यासाठी धडपडत असतो.. मात्र, आज जगण्यासाठी आपल्याला घरात बसण्याची वेळ आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आपण ते स्वीकारायला हवं. मात्र दुर्दैवाने काही लोक अजूनही समंजसपणे वागताना दिसत नाहीत. करोना विषाणूचा संसर्ग गर्दीच्या ठिकाणाहून अधिक प्रमाणात होऊ शकतो.. त्यामुळे गर्दी टाळा, असं आहवान विविध यंत्रणांकडून सातत्याने केलं जातंय. पण तरीही शहरातील गर्दी कमी झालेली नाही. लोकांचा अनावश्यक प्रवास सुरूच आहे.. सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले असले तरी वैयक्तिक समारंभ अद्याप थांबलेले नाहीत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुट्ट्या जाहीर केल्या, परीक्षा रद्द केल्या,शाळा, महाविद्यालये, चित्रपट आणि नाट्यगृहे, मॉल्स, जिम, तरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले, जमावबंदीचे आदेश जारी केले. परंतु तरीही अनावश्यक गर्दी ओसरलेली नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे लागेल. सार्वजनिक जीवनात थोड्याही जबाबदारीने आपण का वागत नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.सरकार कळकळीने सांगतेय त्याचे कारण जगभरात या विषाणूने जो हाहाकार उडवलाय त्याचे भीषण चित्र नजरेसमोर आहे. आपल्याकडे पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाताना साधारण तशीच परिस्थिती आहे. तिसऱ्या टप्प्यात नेमके काय वाढून ठेवलेले असेल याचा कुणालाच अंदाज नाही. त्यामुळे आता तरी आपण बेफिकीरपणा सोडून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. संपर्क टाळणे, संसर्ग टाळणे या खेरीज कोणतेही शस्त्र या लढाईसाठी आपल्याकडे नाही.. म्हणूनच सरकार पोटतिडकीने सावधगिरीच्या सूचना करत आहे.. त्या आपण गंभीरपणे घेतल्या नाहीत तर येणाऱ्या परिस्थितीला जबाबदार आपणच असू..!

जनतेचा सार्वजनिक वावर मर्यादित व्हावा यासाठी राज्य सरकार रोज काही ना काही उपाय जनतेला सुचवत आहे. साथीचा फैलाव रोखण्यासाठी यंत्रणा चोवीस तास राबत आहे. रस्त्यांवरील व बाजारपेठांमधील गर्दी कमी होत असली तरी तेवढेच पुरेसे नाही. अजूनही विवाहसोहळे साजरे होतच आहेत. परवा पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा उठली आणि पेट्रोलपंपावर एकच गर्दी उसळली. सरकार बाजारपेठा बंद करील की काय या शंकेने जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोक गर्दी करीत आहेत.. या अफवा आणि हा निष्काळजीपणा आपल्याला आणि आपल्या देशाला जीवघेण्या संकटात घेऊन जाऊ शकतो, याचेही भान आपल्याला असू नये का? संकटाच्या काळातही आपण सुजाणपणाशी फारकत घेऊन वागणार आहोत का? यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवत असते. करोना संसर्गाचे उभं राहिलेलं संकटही त्याला अपवाद नाही. माणसाच्या माणूसपणाची ही परीक्षा आहे. संकटं येतात जातात..अशी अनेक संकटं आली आणि गेली..याही संकटाचे सावट लवकरच दूर होईल! पण, या अटीतटीच्या काळात आपण माणूसपणाला पारखे न होण्याची काळजी घेतली पाहिजे. करोनाचा संसर्ग जितका धोकादायक आहे त्यापेक्षा कितीतरी अफवांचा व्हायरस कितीतरी भयानक आहे. करोनाचा विषाणू दहा वीस लोकांना बाधा करू शकेल. मात्र अफवांचा जंतू सगळ्या मानवी समाजाला पोखरून टाकेल! त्यामुळे आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.

कोरोना व्हायरस नावाचा विषाणू सैतान धुमाकूळ घालतो आहे.. सगळ्या मानवजातीवर संकट उभे ठाकले आहे.. खरंतर या आपत्तीच्या प्रसंगी आपण हजारो पटींनी समजूतदार व्हायला हवं..! अजूनही वेळ गेलेली नाही..उद्या 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीकरोना संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू ची घोषणा केली आहे. संसर्गाची शृंखला तोडण्यासाठी आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हायला हवं.

करोना संसर्ग रोखण्यासाठी आता आपल्याला एकजुटीने उभं राहायचं आहे..करोना विषाणू सोबत युद्धाचा बिगुल वाजला आहे.. सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा धीरोदत्तपणे मुकाबल्यासाठी उभी आहे. मात्र, लोकसहभागाशिवाय हे युद्ध जिंकताचं येणार नाही.. त्यामुळे, आपण सगळे या लढाईतील सैनिक आहोत.. ही लढाई आपल्याला रणांगणावर नाही तर घरात बसून प्रतिबंधात्मक उपायांच्या शास्त्राने लढावी लागणार आहे..‘एकमेका साह्य करू…’ या भूमिकेतून करोना संसर्गाचा मुकाबला केला करोनाची आपल्यासमोर काय ‘औकात’ आहे?

कविवर्य रणजितसिंग राजपूत यांच्या शब्दात सांगायचं झालं तर..

“ तू हो वूहान से या बीजिंगसे
ऐ व्हायरस तेरी बात ही क्या
हम मिलकर तुझे हराएंगे
कोरोना ‘तेरी औकात ही क्या !!”

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

2 Comments on सामूहिक दायत्वाची गरज!

  1. खुपच छान! सर तुमच्या लेखांमध्ये १ वास्तविकता, व आपलेपणा आहे. व सद्यःस्थितीवर आपण सामंजस्याचा परिचय करुन दिला आहे. वाचक रसिक जेव्हा तुमचे साहित्य वाचतील, तर ते नक्कीच चांगले वर्तन करतील.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..