देशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना कुतुहल असते. अनेक उद्योजकांची वाटचाल संघर्षमय होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आणि देशातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्थान मिळवले.
अशा काही आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधून ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या लेखणीतून ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक साकारलं आहे.
`उद्योगपतींचे चरित्रलेख साधारणत: बिझनेस-पत्रकारच लिहितात. ते त्यांना किंमत व मिळकतीच्या गुणोत्तरांसंबंधी प्रश्न विचारतात, त्यांच्या समूहाच्या वार्षिक उलाढालीविषयी चर्चा करतात… यातून, आकड्यांच्या जंजाळातून खराखुरा माणूस क्वचितच प्रकटतो… मी या बिझनेस नेतृत्वांची मुलाखत, मी इतर कुणाही यक्तीची म्हणजे राजकारणी, चित्रपट तारा, लेखक किंवा इतर कुणी जशी घेतली असती, त्याच पद्धतीनं घेतली. या उद्योगपतींना बोलतं करणं आश्चर्यकारक सोपं गेलं… या लेखांच्या मांडणीचं मी निवडलेलं स्वरूप यशस्वी ठरलं. या चरित्रलेखांत आकडेवारी, नफा-तोटा, किंमत-मिळकत यासंबंधी फारसं आढळणार नाही; तर या लोकांविषयी व त्यांचं नशीब घडवणा-या परिस्थितीविषयी अधिक वाचायला मिळेल.
— वीर संघवी `
`होय, मी खूप श्रीमंतीत वाढलो आहे… पण मी अमेरिकेतली ती दहा वर्ष विसरू शकत नाही. मी तिथं रिझर्व बँकेच्या भत्त्यावर जगत होतो, ते पैसे कधीच पुरेसे नसत. त्यामुळं मला जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी बशा विसळण्यासह सगळ्या प्रकारची कामं करावी लागायची. अशा प्रकारच्या गोष्टींमुळं तुमचं कुटुंब श्रीमंत आहे ही गोष्ट झटकन विसरली जाते.”
— रतन टाटा `
`आम्ही आमच्या यशाचं श्रेय कशाला द्यायचं? ते श्रमशक्तीला व यंत्रसामग्रीला नसून कल्पनांना आहे आणि आता मला असं जाणवतं की, माझ्या कल्पना मला कधी न भेटलेल्या माणसांवरसुद्धा प्रभाव टाकत आहेत. मला या गोष्टीचा आनंद होणार नाही का?”
— नंदन निलेकणी
Leave a Reply