नवीन लेखन...

संवाद.. की द्विवाद..?

जुळी म्हटल्यावर डोळ्यासमोर पट्कन जे चित्र येईल, साधारण तसंच, आम्हीही आमची दोन्ही बाळं जवळजवळ ठेवून बघायचो..की दोघी खेळतात का, एकमेकींशी काही संवाद साधायचा प्रयत्न करतात का, ही रडल्यावर ती रडते का, आपणहून एकमेकींचा हात वगैरे धरतात का.. पण असलं फिल्मी खरंच काही होत नसतं 😀 ते आपल्या समाधानासाठी आपण मुद्दाम् एकीच्या हातात काही द्यावं, दुसरीलाही त्यावेळी तिच्या जवळ चिकटून झोपवावं, किंवा त्या वस्तूचं दुसरं टोक हातात द्यावं, हिचा फ्रॉक तिच्या हातात द्या, तिच्या टोपऱ्याचा दोरा हिच्या हाताला बांधा आणि मग मजा बघत बसा.. हे असले उद्योग करूच शकतो.. पण यात आपल्या मजेमधे त्यांची चिडचिड होईल असं करू नये, हे माझं मत आहे.

तर आजचा आपला विषय आहे, ‘जुळ्या मुलांचा एकमेकांसोबतचा संवाद’. एका अभ्यासाप्रमाणे जुळी मुलं गर्भधारणेच्या चौदाव्या आठवड्यापासून एकमेकांशी संवाद साधू लागतात. मानसशास्त्र सांगतं की, मुलांची सामाजिक जाणीव एक ते तीन वर्षांच्या दरम्यान सुरू होते. प्रत्येक मुलाची ही समज, आणि जाणिवेची पातळी वेगवेगळी असते, आणि तशीच ती identical जुळ्यांचीसुद्धा असते. त्यामुळे संवाद किंवा इतर माणसांशी वागण्याबाबतीतल्या जाणिवेसंबंधीचा gene जरी identical मुलांचा समान असला, तरी तो जागृत होण्याचा काळ आणि विकसित होण्याची गती, ही जुळ्यांमधे वेगळी असू शकते. आणि हे प्रत्येक बाबतीतल्या विकासासाठी खरं आहे. त्यामुळे जुळ्यांना बघताना साहजिकरित्या comparison होतं. इथे मात्र सर्व पालकांनी आणि मुलांच्या संगोपनात सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला ‘tagging’ पासून आवरलं पाहिजे! भरपूर मोह होतो, की ‘ही स्लो आहे, तिला जरा पट्कन कळतं’, ‘ही लगेच आणून देते, तो नुसता बघत बसतो’, ‘दोघांमध्ये जो बोबडा आहे ना, तो अमुक आणि दुसरा तमुक..’ आपल्याला अशा कमेंटस् करून चालतं व्हायला दोन सेकंद पुरे असतात; पण त्या मुलांसाठी ती त्यांची ओळख बनत असते! कदाचित आपण अगदी तेवढ्या पुरतं, अनावधानाने, तर कधी चार लोकांत काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेलेलो असतो, पण ही त्यांची ओळख तुम्ही त्यांना करून दिलेली असते, आणि जगाच्या बऱ्या-वाईटाच्या (समाज मान्यतेसंबंधितल्या) व्याख्या या शब्दांतून तुम्ही करून देत असता! त्यामुळे मुलांसमोर शब्द खूपच जपून वापरायचे असतात. बरेच वर्षांपूर्वी आमच्या अपार्टमेंटमधे दोन identical मुलगे राहायला आले होते. ते खाली खेळायला गेले की बाकीची मुलं गोळा व्हायची नि विचारायची, “Ok, which one of you has the tilted eye? ..ok, that means you are Ashish and the other one is Aveesh.” मुलांसाठी तो identifier होता, पण पुढे तो थोडा वाकडा डोळा असणारा मुलगा खेळायला जायचा बंद झाला. दुसरा मित्रांसोबत खेळायचा आणि हा वेगवेगळ्या क्लासेसना जाऊन बसायचा. हे आपण घरात आणि अगदी बालवयात किमान होऊ द्यायचं नाही. पुढे त्यांना त्यांच्यातला जो काही तो फरक घेऊनच, पुढे सकारात्मकरित्या जगायला नि वागायला शिकवायचं काम आपण करायचं आहे.

यांच्याशी संवाद साधण्यामधे पण एक गंमत असायची. “हे करा, असं हातात धरा, धावू नका, सावकाश खा” अशा सूचना देताना दोन्ही मुलांशी एकत्रितपणे बोललं जातं नं.. क्वचितच एखादिशी बोलताना एकवचनी शब्द वापरले जात. यामुळे गंमत अशी झाली की, सुरुवातीला त्यांनी बरेच शब्द अनेकवचनी उचलले. बोलायला नव्याने शिकताना मी कधी म्हणायचं नि आम्ही कधी, तू नि तुम्ही कुणासाठी वापरायचं, असे कित्येक गोंधळ त्यांचे व्हायचे. तसंच मी काही सांगत असेन तर ते एकीसाठी आहे की दोघींसाठी आहे, यातही गफलत व्हायची. चार वर्षांपर्यंत अशा गमती बरेचदा व्हायच्या. नंतर त्यांना प्रतिप्रश्न करता येऊ लागले. एक साधा प्रसंग सांगते. दोघींना भांड्यात दूध प्यायला दिलेलं आहे. मध्येच इकडे तिकडे बघताना, एकीच्या हातातलं भांडं कललेलं बघून मी पट्कन ओरडते, “अगं, हात वाकडा होतोय..!” आणि हे ऐकून घाबरून दोघी हात हलवतात..! त्याने.. व्हायचं ते होतंच!

या दोघी ८-९ महिन्यांच्या होताहोता एकमेकींशी खेळू लागल्या. एकमेकींच्या हातातली वस्तू घेणं, आपली देणं, एकमेकींच्या पाठोपाठ जाणं, दुसरी करते ते करू पाहणं, हे या वयापासून हळूहळू सुरू झालं. चांगलं उठून बसून अगदी चालायला लागेपर्यंत दोघींचं फारसं एकमेकींकडे लक्ष जात नसे. त्या वयातही जाम धमाल असायची. उभं राहताना दोघी जवळ असल्या तर, आधाराला एकमेकींना धरूही जायच्या, आणि धडपडायच्या.. हे करताना दुसरीच्या डोक्यावर हात दाबून/ धरून उभं राहणं, चुकून नाका-डोळ्यात-कानात बोट घालणं, स्वतःचा तोल जाऊन दुसरीवर पडणं, अशी काय काय मज्जा असायची.. आता वाढीच्या वयातल्या अनेक गोष्टींमधे हे दिसत राहातं. वाचताना अर्थ, लिहिताना स्पेलिंग आधी बहिणीला विचारायचं, तिला नाही आलं तरच आईला विचारायला यायचं. पण भांडणं झाली की समेट घडवायला बरोब्बर आई आठवते! म्हणजे लहानपणी एकेकट्या माझ्याकडे तक्रार घेऊन आल्या, की जी आलीये तिची मी आधी समजूत घालत असे की, “ती ढकलते ना, मग तूच थोडी दूर बस. किंवा तिने मारलं, तर तू त्याआधी तिच्याशी कशी वागलीस..?” पुढे दोघींना जसं भरपूर बोलता येऊ लागलं, तसं दोघीही आपापल्या justificationची लांबलचक लिस्ट देऊन माझ्याच डोक्याचं भरीत करू लागल्या. त्यामुळे आता जास्तीत जास्त वेळेस “तुम्ही आपापलं बघून घ्या” हाच पवित्रा घ्यावा लागतो. पण एकमेकींची बाजू घेण्यात मात्र या हमखास पटाईत असतात बरं! आणि हे मी सगळ्या पालकांकडून ऐकलंय, की भले दोघे एकमेकांशी भांडतील, मारामारी करतील, पण मोठे मध्ये पडले तर आधी एकमेकांना वाचवतील! आमच्या घरचा एक प्रसंग सांगते. तीन-साडेतीन वर्षांच्या असतील, एक बिस्कीट मागायला आली तेव्हा मी दोघींना रागावले की, “अजून एकही बिस्कीट मिळणार नाहीये दोघींना, चार चार खाऊन झालीयेत” तर एकीने दुसरीकडे बोट दाखवत सांगितलं, की “हिने तीनच खालीयेत पण..! तिच्यासाठी मागतेय मी..” आता यावर रागवायचं की कौतुक करायचं तेच कळत नाही! कधीकधी दोघी मिळून मला ब्लॅकमेलही करतात हां! मध्यंतरी गाणं शिकवायला घेतलेलं दोघींना.. पहिल्या दिवशी अगदी उत्साहाने बसून गायल्या. दुसऱ्या दिवशी एकीने आज नको, आत्ता नको, थोड्या वेळाने, करताना बघून मी मग जबरदस्तीने बसवलं. तशी ती पूर्ण तासभर हुप्प करून बसून राहिली. गायली नाही तरी चालेल, समोर बसून ऐकत तरी राहू दे, म्हणून मी तिला सोडून दिलं. तिसऱ्या दिवशी दुसरीने जोरात गळा काढला. हातपाय आपटत लोळत राहिली, पण मी लक्ष नाही दिलं, बसवून ठेवलं तिकडे. चौथ्या दिवशी दोघी मिळून अखंड रडू लागल्या आणि त्या दिवसापासून आमचा गायन क्लास थांबला. तसंच lockdown सुरू झाला तेव्हा माझाच हट्ट होता, की दोघींना नाचता आलं पाहिजे; त्याची सुरुवात म्हणून youtubeवर विडिओ लावून मी स्वतः त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस सुरू केली होती. दोन दिवस त्या घाबरून, रडत कुढत करत होत्या, तिसऱ्या दिवसापासून पुढचा आठवडाभर मी youtube लावून नाचत असे, आणि त्या बसून कार्यक्रम पाहायच्या..!

अशा प्रकारे दोघींच्या teamwork मुळे या बिचाऱ्या आईच्या अनेक प्रयत्नांवर पाणी पडत असतं.. काय करा.. आपल्या मुलांच्या असल्या उद्योगांचं कौतुक करावं की मनसोक्त रागवावं, या द्विधेत मुलं जुळी असोत वा नसोत, प्रत्येक आई मात्र आनंदाने फसत असते.. हो की नाही?

— प्रज्ञा वझे घारपुरे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..