बुध्दीला चालना देणाऱ्या प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम चालू होता. प्रशिक्षक तिथे जमलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळे नुस्खे समजावून सांगत होता. संवाद कसा महत्वाचा आहे हे पटवून देत होता.
उदाहरणादाखल त्याने या मंडळींना एक खेळ खेळायला दिला. पाच मिनिटात प्रत्येकाने जमलेल्या लोकांपैकी जास्तीत जास्त लोकांना भेटायचे. कमीत कमी पंचवीस लोकांची भेट घेतली पाहिजे असा त्याचा आग्रह होता.
त्याने शिटी मारल्यावर खेळाला सुरुवात झाली. प्रत्येकाने तेथे जमलेल्या लोकांना मिठी मारायला किंवा त्यांच्याशी हस्तांदोलन करायला सुरुवात केली. पाच मिनिटात बऱ्याच लोकांनी पंचवीस माणसांशी संपर्क साधला होता.
प्रशिक्षकाने खेळाची वेळ संपल्यावर त्या लोकांना एक धडा शिकविला. तो म्हणाला “तुम्ही जास्तीत जास्त लोकांना भेटायचा प्रयत्न केलात परंतु मला भेटायला कोणीच आले नाही. दुसरी गोष्ट तुमच्यापैकी कोणीही स्वतःची भेट घेतली नाही.” हे आवश्यक आहे की आपण प्रत्येक संवादाची किंवा संपर्काची सुरुवात स्वतःपासून करायची असते. प्रशिक्षकाला त्या मंडळींनी गृहित धरल्यामुळे कोणी त्याच्याकडे गेले नाही. वास्तविक हा खेळ त्यानेच तर जमलेल्या अधिकाऱ्यांना दिला होता.
त्यानंतर त्याने संवादाची किमया सांगण्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगितली. एका बर्फाच्या लाद्या बनविणाऱ्या कंपनीतला मॅनेजर रोजच्याप्रमाणे एका संध्याकाळी त्याचे काम आवरल्यावर घरी जायला निघाला. त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्याने एकदा बर्फ जेथे बनते तेथे जाऊन सगळे ठीक आहे ना याची खात्री करुन घ्यायची ठरविले.
बर्फाच्या खोलीत गेल्यावर चुकून त्याच्या हातून खोलीचा दरवाजा बंद झाला. हा दरवाजा फक्त बाहेरुन उघडता येणारा होता. मॅनेजरला कळले की तो आत अडकला आहे. त्याने दरवाजावर खूप ठोकले. लोकांना हाका मारल्या परंतु सगळेच एव्हाना घरी निघून गेले होते. त्याला कळेना की काय करावे. थोडया वेळाने बर्फाच्या गारव्यात तो निपचीत पडला. त्याचे हातपाय गार पडले. अजून थोडी शुध्द बाकी होती. तेवढयात कोणीतरी त्याला हलवत आहे असे त्याला जाणवले.
काही वेळानंतर त्याच्या लक्षात आले की त्याला तेथून सोडवायला कोणीतरी आले होते. तो एवढा थिजला होता की त्याला कोण आले आहे ते कळेना. त्याने त्या माणसाला विचारले की तू कोण आहेस आणि मला सोडवायला इथे कसा आलास?
तो माणूस म्हणाला “साहेब, मी तुमच्या कंपनीचा रखवालदार आहे. तुम्ही मला रोज सकाळी आलात की गुड मॉर्निंग म्हणता आणि संध्याकाळी परत जाताना गुड नाईट करता. आज सकाळी तुम्ही मला गुड मॉर्निंग म्हणालात मात्र संध्याकाळी तुमची माझी भेट झाली नाही. सगळे कामगार घरी गेले तरी तुम्ही बाहेर आला नाहीत. मला शंका आली. मी ‘ तुम्हाला शोधायला घालो. शोधता शोधता मला तुम्ही बर्फाच्या खोलीत बेशुध्द पडलेले दिसलात. बरे झाले, मला तुम्ही सापडलात. जास्त वेळ राहिला असतात तर कदाचित जिवंत राहिला नसतात.”
मॅनेजरने त्या माणसाचे आभार मानले. त्याच्या केवळ संवाद साधण्याच्या सवयीने आज त्याचे प्राण वाचविले होते. प्रशिक्षकाने हा धडा अधिकाऱ्यांच्या मनावर बिंबविला. खरोखर परस्पर संवाद आणि संपर्क याने कित्येकदा आपल्याला संकटात मदत मिळते हे नि:संशय. आजपासून आपणही असा छोटासा का होईना, परस्परांशी संवाद साधायला शिकू या.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply